प्रेषित 26
26
1अग्रिप्पा राजा पौलास म्हणाला, “तुला स्वतःविषयी बोलण्यास परवानगी देण्यात आली आहे.”
तेव्हा पौलाने आपल्या हाताने खूण करून बचावाचे भाषण करण्यास सुरुवात केली: 2तो म्हणाला “महाराज अग्रिप्पा, यहूदी लोक माझ्याविरुद्ध जे आरोप करीत आहेत, त्या सर्व आरोपांना मला माझे प्रत्युत्तर आपणापुढे सादर करता येत आहे याबद्दल मी स्वतःस धन्य समजतो, 3कारण मला माहीत आहे की आपण यहूदी लोकांच्या रूढी व मतभेद यांचे तज्ञ आहात. आता कृपया माझे म्हणणे शांतचित्ताने ऐकून घ्या.
4“मी लहानपणापासून स्वतःच्या देशात आणि यरुशलेममध्ये माझ्या आयुष्याच्या सुरुवातीपासून आतापर्यंत कसे जगलो हे सर्व यहूदीयांस चांगले माहीत आहे. 5ते मला बर्याच काळापासून ओळखतात आणि त्यांना मान्य असेल तर माझ्याबद्दल साक्षही देऊ शकतील, की आपल्या धर्माच्या पंथाबाबतीत मी नेहमीच कट्टर परूशी म्हणून जीवन जगलो. 6परमेश्वराने आपल्या पूर्वजांना दिलेल्या अभिवचनांवर माझी आशा आहे म्हणून माझी आज चौकशी होत आहे व मी येथे उभा आहे. 7आमचे बारा वंश अभिवचन पूर्ण होण्याची आशा बाळगत परमेश्वराची सेवा मनःपूर्वक रात्रंदिवस करीत आहेत. तरी महाराज अग्रिप्पा, त्याच आशेमुळे मजवर यहूद्यांनी आरोप ठेवला आहे. 8परंतु मृतांचे पुनरुत्थान हे तुम्हापैकी कोणालाही अविश्वसनीय का वाटावे?
9“मला वाटत होते की नासरेथकर येशूंच्या नावाविरुद्ध जितके काही शक्य होईल तितके करावे. 10आणि त्याप्रकारे मी यरुशलेममध्ये केले होते. तिथे प्रभूच्या अनेक लोकांना महायाजकाच्या अधिकाराने तुरुंगात डांबले आणि त्यांचा वध करण्याकरिता मी संमती देत असे. 11अनेकदा मी एका सभागृहातून दुसर्या सभागृहात जात असे व त्यांना शिक्षा करून, बळजबरीने ईश्वरनिंदा करावयास भाग पाडीत असे. त्यांचा छळ करण्यास मी इतका झपाटलेला होतो की परकीय शहरात देखील मी त्यांचा पाठलाग करीत असे.
12“मी अशाच एका प्रवासात असताना दिमिष्कमधून महायाजकांचे अधिकारपत्र व नियुक्तपत्र बरोबर घेऊन जात होतो. 13महाराज अग्रिप्पा, मी वाटेने जात असताना दुपारच्या सुमारास, सूर्यप्रकाशाहून अधिक तेजस्वी प्रकाश माझ्या आणि माझ्या सोबत्यांच्या भोवती आकाशातून तळपताना मी पाहिला. 14आम्ही सर्वजण जमिनीवर पडलो, तेव्हा अरामी भाषेत बोलणारी वाणी मी ऐकली. ‘शौला, शौला, तू माझा छळ का करीत आहेस? पराणीवर लाथ मारणे तुला हानिकारक आहे.’
15“मी विचारले, ‘प्रभूजी, आपण कोण आहात?’
“प्रभूने त्याला उत्तर दिले, ‘ज्याचा तू छळ करीत आहेस, तो मी येशू आहे, 16आता उठून आपल्या पायांवर उभा राहा. मी तुला यासाठी दर्शन दिले आहे की जे तू माझ्याविषयी पाहिले व जे प्रकट होणार आहे त्याविषयी तुला सेवक व साक्षी नेमावे. 17मी तुझे लोक व गैरयहूदी लोक यांच्यापासून तुझी सुटका करेन. मी तुला त्यांच्याकडे पाठवित आहे 18यासाठी की त्यांचे डोळे उघडावेत आणि त्यांनी अंधकारातून प्रकाशाकडे, सैतानाच्या अधिकाराऐवजी परमेश्वराच्या सत्याकडे यावे, म्हणजे त्यांना पापक्षमा मिळेल आणि माझ्यावरील विश्वासामुळे जे पवित्र केलेले आहेत त्यांच्याबरोबर त्यांना वतन मिळावे.’
19“अशा रीतीने, महाराज अग्रिप्पा, मी त्या स्वर्गीय दृष्टान्ताचा अव्हेर केला नाही आणि सांगितल्याप्रमाणे केले. 20तर मी प्रथम दिमिष्क, यरुशलेम आणि यहूदीया प्रांतातील लोकांना व गैरयहूदी लोकांना असा प्रचार केला की त्या सर्वांनी पश्चात्ताप करून परमेश्वराकडे वळावे व पश्चात्तापास योग्य अशी फळे द्यावी. 21या कारणामुळे काही यहूद्यांनी मला मंदिराच्या अंगणात धरले आणि जिवे मारण्याचा प्रयत्न केला. 22परंतु परमेश्वराने आजपर्यंत मला साहाय्य केले; म्हणूनच प्रत्येक लहानथोरास या गोष्टींची साक्ष सांगण्यास मी येथे उभा आहे व ज्यागोष्टी घडतील असे संदेष्टे व मोशे यांनी सांगितले होते, त्यापलीकडे मी दुसरे काहीही सांगितले नाही. 23त्यांनी सांगितले होते की ख्रिस्त दुःख सहन करतील आणि यहूदी व गैरयहूदी अशा दोघांनाही प्रकाशाचा संदेश मिळावा म्हणून तेच प्रथम मरणातून पुन्हा उठतील.”
24हे ऐकताच फेस्त मध्येच म्हणाला, “पौला, तुझे मन ठिकाण्यावर नाही. तुझ्या दीर्घकाळाच्या अभ्यासाने तुझे मन भ्रमिष्ट झाले आहे.”
25परंतु पौलाने उत्तर केले, “अत्यंत थोर फेस्त महाराज, मी वेडा नाही, मी सत्य व वैचारिकदृष्ट्या योग्य तेच सांगत आहे. 26महाराजांना या गोष्टी माहीत आहेत आणि या गोष्टी मोकळेपणाने मी तुमच्याबरोबर बोलू शकतो. कारण माझी खात्री आहे की या सर्व घटना आपल्या परिचयाच्या आहेत, कारण या गोष्टी कुठे जगाच्या कानाकोपर्यात घडलेल्या नाहीत. 27अग्रिप्पा महाराज, संदेष्ट्यांवर आपला विश्वास आहे ना? आपण विश्वास ठेवता हे मला माहीत आहे.”
28अग्रिप्पा मध्येच पौलास म्हणाला, “एवढ्या थोड्या वेळात माझे मन वळवून मला ख्रिस्ती करता येईल असे तुला वाटते का?”
29पौलाने उत्तर दिले, “पुष्कळ अथवा थोड्या वेळात—परंतु मी परमेश्वराजवळ अशी प्रार्थना करतो की आज माझे बोलणे जे सर्वजण ऐकत आहेत व आपण सुद्धा या बेड्यांशिवाय माझ्यासारखे व्हावे.”
30तेव्हा राजा, राज्यपाल, बर्णीका व इतर सर्वजण जाण्यासाठी उभे राहिले. 31आणि त्या दालनातून निघून गेल्यावर, त्यांचे एकमेकाशी असे एकमत झाले, “या मनुष्याला मरणदंडाची अथवा तुरुंगवासाची शिक्षा द्यावी, असे त्याने काहीही केलेले नाही.”
32अग्रिप्पा फेस्तास म्हणाला, “त्याने कैसराजवळ न्याय मागितला नसता, तर त्याची सुटका करता आली असती.”
सध्या निवडलेले:
प्रेषित 26: MRCV
ठळक
सामायिक करा
कॉपी करा
तुमचे हायलाइट तुमच्या सर्व डिव्हाइसेसवर सेव्ह करायचे आहेत? साइन अप किंवा साइन इन
पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती™
ग्रंथाची मालकी © 1978, 1982, 2008, 2021, 2022, 2024 Biblica, Inc.
यांची परवानगी घेऊन केले गेले आहे.
सर्व अधिकार जगभरात राखीव.
Holy Bible, Marathi Contemporary Version™
Copyright © 1978, 1982, 2008, 2021, 2022, 2024 by Biblica, Inc.
Used with permission.
All rights reserved worldwide.