YouVersion लोगो
सर्च आयकॉन

अनुवाद 22

22
1आपल्यापैकी एखाद्या इस्राएली मनुष्याचा बैल अथवा मेंढरू दूरवर भटकलेला तुम्ही पाहिला, तर त्याच्याकडे दुर्लक्ष करू नये; त्याला त्याच्या मालकाकडे घेऊन जावे. 2जर मालक तुमच्याजवळ राहत नसतील किंवा तो कोण आहे हे तुम्हाला ठाऊक नसेल, तर तो तुम्ही तुमच्या घरी न्यावा व त्याचा मालक त्याला शोधीत तिथे येईपर्यंत त्याला ठेवावे. मग त्याच्या मालकाला तो परत करावा. 3जर तुम्हाला त्यांचे गाढव किंवा झगा किंवा त्यांनी हरवलेले इतर काही सापडले तर असेच करा. त्याकडे दुर्लक्ष करू नका.
4जर तुमच्या इस्राएली बांधवाचे गाढव किंवा बैल मार्गात घसरून पडलेले दिसले तर त्याच्याकडे दुर्लक्ष करू नये. त्याला आपल्या पायांवर उभे करण्यास त्याच्या मालकाला मदत करावी.
5कोणत्याही स्त्रीने पुरुषाचा पोशाख घालू नये किंवा कोणत्याही पुरुषाने स्त्रीचा पोशाख घालू नये, कारण याहवेह तुमच्या परमेश्वराच्या दृष्टीने असे करणे घृणित आहे.
6जर तुम्हाला मार्गाच्या कडेला किंवा झाडावर किंवा जमिनीवर पक्ष्याचे घरटे आढळले आणि त्यात मादी पिलांवर किंवा अंड्यांवर बसलेली असेल, तर त्या मादीला पिलांसोबत धरू नये. 7तुम्हाला हवी असतील तर तुम्ही तिची पिल्ले घेऊ शकता, त्यांच्या आईस मात्र तुम्ही अवश्य जाऊ द्यावे; म्हणजे तुमचे कल्याण होईल व तुम्हाला दीर्घायुष्य लाभेल.
8जेव्हा तुम्ही नवीन घर बांधाल तेव्हा धाब्याला कठडा बांधवा, म्हणजे कोणीही धाब्यावरून पडल्यास मनुष्य हत्येचा दोष तुमच्या घरावर येऊ नये.
9तुमच्या द्राक्षमळ्यात तुम्ही दोन प्रकारचे बी पेरू नये; तसे केल्यास, दोन्हीही पिकेच नव्हे तर दोन्ही बीजे देखील दूषित समजल्या जातील.
10एकाच नांगराला बैल व गाढव यांना एकत्र जुंपून नांगरणी करू नये.
11लोकर व ताग यांचे मिश्रण असलेली वस्त्रे घालू नका.
12आपल्या अंगरख्याच्या चारही कोपर्‍यांना गोंडे लावावीत.
वैवाहिक नियमांचे उल्लंघन
13एखाद्या पुरुषाने पत्नी केली आणि तिच्याशी समागम केल्यानंतर ती त्याला आवडेनाशी झाली 14आणि तिची निंदा केली आणि तिच्या नावाची बदनामी करून म्हटले, “मी या स्त्रीसोबत लग्न केले, पण जेव्हा मी तिच्याजवळ गेलो तेव्हा तिच्यात मला कौमार्याबद्दलचा पुरावा आढळला नाही,” 15तर मुलीच्या आईवडिलांनी तिच्या कौमार्याबद्दलचा पुरावा, त्या नगराच्या वेशीत वडील मंडळीपुढे साजरा करावा. 16तिच्या वडिलांनी त्यांना असे सांगावे, “मी माझी कन्या या मनुष्याला त्याची पत्नी व्हावी म्हणून दिली, परंतु आता ती त्याला आवडत नाही. 17आता त्याने तिची निंदा केली आणि म्हणाला, ‘मला तुमच्या कन्येमध्ये कौमार्याबद्दलचे पुरावे आढळले नाही.’ पण हे पाहा आमच्या कन्येच्या कौमार्याबद्दलचा पुरावा.” मग तिच्या आईवडिलांनी ते वस्त्र नगराच्या वडीलांपुढे सादर करावे, 18आणि मग नगरातील वडील मंडळीने त्या पुरुषाला घ्यावे आणि त्याला शिक्षा द्यावी. 19शंभर चांदीची नाणी#22:19 अंदाजे 1.2 कि. ग्रॅ. दंडादाखल त्याच्याकडून वसूल करावी आणि मुलीच्या वडिलांना द्यावीत, कारण त्या तरुणाने एका इस्राएली कुमारिकेची बदनामी केली. ती त्याची पत्नी म्हणून राहील; तो जिवंत असेपर्यंत त्याने तिला कदापि घटस्फोट देऊ नये.
20परंतु आरोप सत्य असल्यास आणि तिच्या कौमार्याबद्दलचा पुरावा आढळला नाही, 21तर मात्र नगराच्या वडिलांनी त्या कन्येला तिच्या वडिलांच्या घराच्या दारापर्यंत न्यावे व तिथे नगरातील लोकांनी तिला मरेपर्यंत धोंडमार करावी. आपल्या आईवडिलांच्या घरात राहत असताना, व्यभिचारिणी होऊन तिने इस्राएलात घृणास्पद कृत्य केले आहे. अशा रीतीने तुमच्यामधील दोष काढून टाकण्यात यावे.
22एखादा पुरुष दुसर्‍या पुरुषाच्या स्त्रीबरोबर व्यभिचार करीत असताना आढळला, तर तिच्यासोबत झोपलेला पुरुष आणि स्त्री दोघांनाही जिवे मारावे. अशा रीतीने इस्राएलमधून कलंक दूर करून शुद्ध करावे.
23ज्या कुमारिकेचा वाङ्निश्चय झालेला आहे, अशा कुमारिकेला जर एखाद्या नगरात एखाद्या पुरुषाने भ्रष्ट केले, 24तर त्या दोघांनाही नगराच्या वेशीच्या बाहेर घेऊन जावे आणि मरेपर्यंत धोंडमार करावा—त्या कुमारिकेला अशासाठी की नगरात असताना तिने मदतीसाठी आरडाओरडा केला नाही आणि त्या पुरुषाला अशासाठी की त्याने दुसर्‍या पुरुषाच्या स्त्रीला भ्रष्ट केले. अशा रीतीने तुमच्यामधून कलंक दूर करून शुद्ध करावे.
25परंतु एखाद्या पुरुषाने वाङ्निश्चय झालेल्या कुमारिकेला बाहेर शेतात गाठून तिच्यावर बलात्कार केला, तर असे करणार्‍या पुरुषाला ठार मारावे. 26त्या कुमारिकेला काही करू नये; तिला मरणदंड मिळावा असे पाप तिने केले नाही. एखाद्याने आपल्या शेजार्‍यावर हल्ला करून त्याला ठार मारावे त्याप्रमाणे हे आहे, 27कारण त्या पुरुषाने त्या एकट्या कुमारिकेला शेतात शोधून काढली आणि मदतीसाठी ती ओरडलीच असेल, परंतु ते ऐकण्यासाठी आणि तिची सुटका करण्यासाठी त्या ठिकाणी कोणीही नव्हते.
28जर एखाद्या पुरुषाने जिचा वाङ्निश्चय झालेला नसेल, अशा कुमरिकेवर बलात्कार केला आणि ते करीत असताना तो आढळला, 29तर त्याने मुलीच्या वडिलांना पन्नास चांदीची नाणी#22:29 अंदाजे 575 ग्रॅ. दंड म्हणून दिली पाहिजेत आणि त्या कुमारिकेशी विवाह केला पाहिजे, कारण त्याने तिला भ्रष्ट केले. तो जिवंत असेपर्यंत तिला घटस्फोट देऊ शकत नाही.
30कोणाही पुरुषाने आपल्या पित्याच्या पत्नीशी विवाह करू नये; त्याने आपल्या पित्याच्या अंथरुणास भ्रष्ट करू नये.

सध्या निवडलेले:

अनुवाद 22: MRCV

ठळक

सामायिक करा

कॉपी करा

None

तुमचे हायलाइट तुमच्या सर्व डिव्हाइसेसवर सेव्ह करायचे आहेत? साइन अप किंवा साइन इन