अनुवाद 27
27
एबाल डोंगरावरील वेदी
1नंतर मोशे व इस्राएलांच्या वडीलजनांनी लोकांना आज्ञापिले: “ज्या आज्ञा आज मी तुम्हाला सांगत आहे त्या तुम्ही पाळाव्या. 2जेव्हा तुम्ही यार्देन नदी पार करून याहवेह तुमच्या परमेश्वराने दिलेल्या वचनदत्त देशात जाल, तेव्हा काही मोठे धोंडे घेऊन त्यावर चुन्याचा लेप लावून स्थापित करावे. 3त्यावर या नियमशास्त्राचे सर्व शब्द लिहून काढावे जेव्हा तुम्ही यार्देन नदी पार करून याहवेह तुमचे परमेश्वर देत असलेल्या वचनदत्त देशात जाल म्हणजे दुधामधाचे प्रवाह वाहणार्या अशा देशात जाल, जसे याहवेह तुमच्या पूर्वजांच्या परमेश्वराने तुम्हाला वचन दिले होते. 4आणि जेव्हा तुम्ही यार्देन नदी पार करून याहवेह तुमच्या परमेश्वराने दिलेल्या वचनदत्त देशात जाल, तेव्हा हे धोंडे एबाल डोंगरावर स्थापित करावे, जसे मी आज तुम्हाला आज्ञा करीत आहे आणि त्यावर चुन्याचा लेप लावावा. 5याहवेह तुमच्या परमेश्वरासाठी तुम्ही तिथे एक वेदी बांधावी, धोंड्यांची वेदी बांधावी. त्यावर कोणतेही लोखंडी अवजार वापरू नये. 6याहवेह तुमच्या परमेश्वरासाठी तुम्ही तिथे न घडविलेल्या धोंड्यांची एक वेदी बांधावी आणि मग त्या वेदीवर याहवेह तुमच्या परमेश्वराला होमार्पणे अर्पावी. 7तसेच शांत्यर्पणही त्याच वेदीवर करून याहवेह तुमच्या परमेश्वरासमोर मोठ्या आनंदाने भोजन करावे. 8या धोंड्यावर नियमशास्त्राचा प्रत्येक शब्द स्पष्टपणे लिहून काढावा.”
एबाल डोंगरावरून शापवचने
9नंतर मोशे व लेवीय याजकांनी सर्व इस्राएली लोकांना म्हटले, “अहो इस्राएली लोकांनो, शांत व्हा व ऐका! आता तुम्ही याहवेह तुमच्या परमेश्वराचे लोक झाला आहात. 10याहवेह तुमच्या परमेश्वराच्या आज्ञेचे पालन करा आणि त्यांच्या ज्या आज्ञा आणि विधी आज मी तुम्हाला देत आहे, ते सर्व तुम्ही पाळावे.”
11त्याच दिवशी मोशेने लोकांना आज्ञापिले:
12तुम्ही यार्देन नदी पार करून जाल, तेव्हा शिमओन, लेवी, यहूदाह, इस्साखार, योसेफ व बिन्यामीनच्या गोत्रांनी लोकांना आशीर्वाद देण्यासाठी गरिज्जीम पर्वतावर उभे राहावे. 13आणि रऊबेन, गाद, आशेर, जबुलून, दान आणि नफताली यांच्या गोत्रांनी शापवचने उच्चारण्यासाठी एबाल डोंगरावर उभे राहावे.
14तेव्हा लेव्यांनी सर्व इस्राएली लोकांना पुढीलप्रमाणे मोठ्याने म्हणावे:
15“जो याहवेहला घृणास्पद अशी मूर्ती कुशल कारागिरांच्या हातांनी घडवितो आणि ती गुप्तपणे ठेवतो तो शापित आहे.”
तेव्हा सर्व लोकांनी “आमेन!” म्हणावे.
16“जो कोणी आपल्या पित्याचा अथवा मातेचा अनादर करतो, तो शापित होय.”
तेव्हा सर्व लोकांनी “आमेन!” म्हणावे.
17“जो कोणी आपल्या शेजार्याच्या सीमेची धोंड बदलतो, तो शापित होय.”
तेव्हा सर्व लोकांनी “आमेन!” म्हणावे.
18“जो कोणी आंधळ्याची वाट चुकवितो तो शापित होय!”
तेव्हा सर्व लोकांनी “आमेन!” म्हणावे.
19“जो कोणी परदेशी, अनाथ आणि विधवा यांचा न्याय विपरीत करतो तो शापित होय.”
तेव्हा सर्व लोकांनी “आमेन!” म्हणावे.
20“जो कोणी आपल्या पित्याच्या पत्नीबरोबर समागम करतो, तो शापित होय, कारण त्याने त्याच्या पित्याचे अंथरूण अपमानित केले आहे.”
तेव्हा सर्व लोकांनी “आमेन!” म्हणावे.
21“जो कोणी एखाद्या पशूबरोबर समागम करतो, तो शापित होय.”
तेव्हा सर्व लोकांनी “आमेन!” म्हणावे.
22“जो कोणी आपल्या बहिणीबरोबर, त्याच्या पित्याच्या कन्येबरोबर किंवा आपल्या मातेच्या कन्येबरोबर समागम करतो, तो शापित होय.”
तेव्हा सर्व लोकांनी “आमेन!” म्हणावे.
23“जो कोणी आपल्या सासूबरोबर समागम करतो, तो शापित होय.”
तेव्हा सर्व लोकांनी “आमेन!” म्हणावे.
24“जो कोणी आपल्या शेजार्याला गुप्तपणे ठार मारतो, तो शापित होय.”
तेव्हा सर्व लोकांनी “आमेन!” म्हणावे.
25“जो कोणी एखाद्या निरपराधी मनुष्याला जिवे मारण्यासाठी लाच घेतो, तो शापित होय.”
तेव्हा सर्व लोकांनी “आमेन!” म्हणावे.
26“जो कोणी या नियमशास्त्राचे शब्द अमान्य करून ते आचरणात आणत नाही, तो शापित होय.”
तेव्हा सर्व लोकांनी “आमेन!” म्हणावे.
सध्या निवडलेले:
अनुवाद 27: MRCV
ठळक
सामायिक करा
कॉपी करा
तुमचे हायलाइट तुमच्या सर्व डिव्हाइसेसवर सेव्ह करायचे आहेत? साइन अप किंवा साइन इन
पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती™
ग्रंथाची मालकी © 1978, 1982, 2008, 2021, 2022, 2024 Biblica, Inc.
यांची परवानगी घेऊन केले गेले आहे.
सर्व अधिकार जगभरात राखीव.
Holy Bible, Marathi Contemporary Version™
Copyright © 1978, 1982, 2008, 2021, 2022, 2024 by Biblica, Inc.
Used with permission.
All rights reserved worldwide.