YouVersion लोगो
सर्च आयकॉन

अनुवाद 29

29
कराराचे नवीनीकरण
1याहवेहने मोआब देशात इस्राएली लोकांबरोबर जो करार करण्याची मोशेला आज्ञा दिली होती त्याच्या या अटी आहेत, त्यांनी होरेब पर्वतावर जो करार केला होता तो विस्तारित असा आहे.
2मोशेने सर्व इस्राएली लोकांना बोलाविले आणि सांगितले:
इजिप्त देशात फारोह, त्याच्या अधिकार्‍यांशी आणि त्याच्या देशात याहवेहने जे काही केले ते तुम्ही तुमच्या डोळ्यांनी पाहिले आहे. 3तिथे ज्या महान पीडा आणि ते चिन्ह आणि जे महान चमत्कार केले, ते सर्व तुम्ही स्वतःच्या डोळ्यांनी पाहिले आहेत. 4पण याहवेहने आजपर्यंत तुम्हाला समजणारी अंतःकरणे किंवा पाहू शकणारे डोळे किंवा ऐकू शकणारे कान दिलेले नाहीत. 5तरी देखील याहवेह म्हणतात, “चाळीस वर्षे तुम्हाला त्या रानात चालविले, तरी तुमचे कपडे जीर्ण झाले नाहीत ना तुमची पायतणे झिजली. 6खाण्यासाठी तुमच्याजवळ भाकर नव्हती अथवा पिण्यासाठी तुमच्याजवळ द्राक्षारस किंवा मद्य नव्हते. हे मी यासाठी केले की मीच याहवेह तुमचा परमेश्वर आहे, हे तुम्ही ओळखावे.”
7जेव्हा तुम्ही येथे आला, तेव्हा हेशबोनचा राजा सीहोन व बाशानचा राजा ओग लढाई करण्यासाठी आपल्यावर चालून आले, पण आपण त्यांचा पराभव केला. 8त्यांचा प्रदेश जिंकून आपण तो रऊबेन आणि गाद यांच्या गोत्रांना आणि मनश्शेहच्या अर्ध्या गोत्राला वतन म्हणून दिला.
9म्हणून या कराराच्या अटींचे काळजीपूर्वक पालन करा, म्हणजे तुम्ही जे सर्वकाही कराल त्यात तुम्ही समृद्ध व्हाल. 10आज तुम्ही सर्वजण याहवेह तुमच्या परमेश्वराच्या उपस्थितीत उभे आहात—म्हणजे तुमचे पुढारी व तुमचे गोत्र, तुमचे वडील आणि अधिकारी आणि इस्राएलमधील इतर सर्व पुरुष, 11तुमचे लेकरे आणि तुमच्या स्त्रिया व मुलेबाळे आणि तुमच्या छावणीमध्ये राहणारे परदेशी, जे तुमच्यासाठी लाकूड तोडतात आणि तुमच्यासाठी पाणी भरतात. 12याहवेह तुमच्या परमेश्वराशी करार करण्यासाठी येथे तुम्ही उभे आहात, तो करार याहवेह आज तुमच्यासोबत करीत आहेत आणि शपथपूर्वक त्यावर अशी मोहोर लावत आहेत की, 13तुम्ही त्यांचे लोक आहात आणि तुमचे पूर्वज अब्राहाम, इसहाक व याकोब यांना प्रतिज्ञापूर्वक वचन दिल्याप्रमाणे याहवेहच तुमचे परमेश्वर आहेत याची आज तुम्हाला खात्री करून द्यावयाची आहे. 14हा करार मी शपथपूर्वक करीत आहे, केवळ तुमच्याशीच नव्हे, 15तर आज याहवेह तुमच्या परमेश्वरासमोर जे इस्राएली उभे आहेत व जे आज येथे नाहीत त्यांच्यासोबत देखील ते आहेत.
16तुम्हाला माहीत आहे की, आपण इजिप्त देशामध्ये कसे राहिलो आणि आपण इतर देशातून प्रवास करीत येथपर्यंत कसे आलो. 17तुम्ही त्यांच्यामध्ये घृणास्पद वस्तू आणि लाकडाच्या आणि दगडाच्या, चांदीच्या आणि सोन्याच्या अमंगळ मूर्ती पाहिल्या आहेत. 18आज येथे उभा असणारा तुमच्यातील कोणताही पुरुष किंवा स्त्री, कूळ किंवा गोत्राचे हृदय याहवेह तुमच्या परमेश्वराला सोडून इतर राष्ट्रांच्या दैवतांची उपासना करण्यासाठी त्यांच्याकडे वळणार नाही याबद्दल खबरदारी घ्या; हे कडू विषारी फळ आणि कडू दवणा देणार्‍या रोपट्याचे मूळ तुम्हामध्ये उगविणार नाही याबद्दल खबरदारी घ्या.
19जो कोणी अशी महत्त्वाची आणि गंभीर स्वरुपाची शपथ आपल्या कानांनी ऐकतो आणि स्वतःला आशीर्वाद देऊन म्हणतो, “माझ्या स्वतःच्याच इच्छेने मी चाललो तरी माझे काही बिघडणार नाही, मी सुरक्षित राहीन;” असे म्हणणारी माणसे सिंचित भूमी आणि कोरड्या भूमीवर नाश ओढवून घेतील. 20याहवेह अशा लोकांना क्षमा करण्यास कधीही तयार होणार नाहीत; त्यांचा कोप व क्रोधाग्नी त्यांच्याविरुद्ध भडकेल. या ग्रंथात लिहिलेले सर्व शाप त्यांच्यावर कोसळतील आणि याहवेह त्यांचे नाव देखील या आकाशाच्या खालून नामशेष करून टाकतील. 21याहवेह या मनुष्याला सर्व इस्राएली गोत्रातून वेगळे काढतील आणि कराराच्या या नियमशास्त्राच्या ग्रंथात नमूद केलेले सर्व शाप त्याच्यावर कोसळतील.
22मग तुमची भावी पिढी, तुमची मुलेबाळे आणि दूरदेशातील परदेशी लोक, तुमच्या देशावर याहवेहने पाठविलेली पीडा आणि रोगराई पाहतील. 23तुमचा संपूर्ण देश गंधक आणि क्षारयुक्त होऊन—पूर्णपणे जळून गेल्यामुळे ती एक निरुपयोगी भूमी झाली आहे असे त्यांना आढळून येईल आणि याहवेहने क्रोधाविष्ट होऊन त्याचा सदोम, गमोरा, अदमाह व सबोईम या देशांसारखाच नाश केला आहे हे त्यांना दिसेल. 24सर्व राष्ट्रे विचारतील: “याहवेहने या देशाचे असे का केले? हा एवढा कोप व क्रोधाग्नी कशाला?”
25आणि त्याचे उत्तर असेल: “ज्यावेळी याहवेह त्यांच्या पूर्वजांच्या परमेश्वराने इस्राएली लोकांना इजिप्त देशातून बाहेर आणले होते, त्यावेळी त्यांच्याशी जो करार केला होता तो या लोकांनी मोडला म्हणून असे झाले. 26सक्त मनाई असतानाही, ते ओळखत नसलेली दैवते, जी त्यांना देण्यात आली नाहीत, त्या दैवतांची त्यांनी उपासना केली आणि त्यांना नमन केले. 27म्हणूनच याहवेहचा क्रोध या देशाविरुद्ध इतका भडकला की, या पुस्तकात नमूद केलेले सर्व शाप त्यांनी त्यांच्यावर आणले. 28तेव्हा याहवेहने रागाने आणि मोठ्या क्रोधाने त्यांचे या देशातून उच्चाटन केले आणि त्यांना दूरच्या देशात घालवून दिले, जिथे ते आज देखील राहत आहेत.”
29रहस्यमय बाबी याहवेह आमच्या परमेश्वराच्या आहेत; परंतु त्यांनी ज्यागोष्टी उघड रीतीने सांगितल्या, त्या आपल्यासाठी आणि आपल्या लेकरांसाठी आहेत, यासाठी की आपण या नियमशास्त्राच्या सर्व शब्दांचे पालन करावे.

सध्या निवडलेले:

अनुवाद 29: MRCV

ठळक

सामायिक करा

कॉपी करा

None

तुमचे हायलाइट तुमच्या सर्व डिव्हाइसेसवर सेव्ह करायचे आहेत? साइन अप किंवा साइन इन