30
याहवेहकडे वळल्याने होणारी भरभराट
1मी तुमच्यापुढे ठेवलेले हे सर्व आशीर्वाद आणि शाप तुम्हावर येतील, तेव्हा याहवेह तुमच्या परमेश्वराने तुम्हाला घालवून दिलेल्या देशात राहत असताना तुम्ही या गोष्टी आपल्या अंतःकरणात ठेवाव्या, 2आणि त्यावेळी जर तुम्ही व तुमची मुले याहवेह तुमच्या परमेश्वराकडे परत याल आणि संपूर्ण मनाने व संपूर्ण जिवाने आज मी तुम्हाला देत आहे त्या त्यांच्या आज्ञा पाळाल, 3तर याहवेह तुमचे परमेश्वर तुमची बंदिवासातून सुटका करतील आणि ते तुमच्यावर दया करतील आणि ज्या देशात त्यांनी तुम्हाला पांगवून टाकले असेल, त्या देशातून तुम्हाला एकत्र करतील. 4तुम्ही पृथ्वीच्या अगदी दिगंतापर्यंत विखुरलेले असला, तरी याहवेह तुमचे परमेश्वर तुम्हाला तिथून पुन्हा परत आणतील. 5याहवेह तुमचे परमेश्वर तुम्हाला तुमच्या पूर्वजांच्या देशात परत आणतील आणि तुम्ही तो ताब्यात घ्याल. ते तुमचे कल्याण करतील आणि तुमच्या पूर्वजांपेक्षा तुम्हाला अधिक संपन्न आणि बहुगुणित करतील. 6याहवेह तुमचे परमेश्वर तुमच्या व तुमच्या वंशजांच्या अंतःकरणाची सुंता करतील, तुम्ही त्यांच्यावर पूर्ण मनाने व आत्म्याने प्रीती कराल, मग याद्वारे तुम्ही जिवंत राहू शकाल. 7याहवेह तुमचे परमेश्वर हे सर्व शाप तुमच्या शत्रूंवर, म्हणजे जे तुमचा द्वेष करतात व तुमचा छळ करतात, त्यांच्यावर आणतील. 8तुम्ही परत याहवेहच्या आज्ञा पाळाल आणि मी आज तुम्हाला देत असलेल्या त्यांच्या सर्व आज्ञेचे तुम्ही पालन कराल. 9तेव्हा याहवेह तुमचे परमेश्वर तुमच्या हाताच्या प्रत्येक कार्यात तुम्हाला समृद्धी प्रदान करतील. ते तुम्हाला विपुल संतती, पुष्कळ गुरे आणि तुमच्या भूमीला अमाप पीक देतील. याहवेह तुमच्या पूर्वजांवर जसे प्रसन्न होते, तसेच तुमच्या कल्याणासाठी तुम्हावरही परत प्रसन्न होतील, 10जर तुम्ही याहवेह तुमच्या परमेश्वराच्या आज्ञा पाळाल आणि नियमशास्त्राच्या या ग्रंथात याहवेह तुमच्या परमेश्वराने जे नियम व विधी दिले आहेत, त्या तुम्ही पाळाल व पूर्ण मनाने व आत्म्याने याहवेह तुमच्या परमेश्वराकडे माघारी वळाल, तर हे होईल.
दोन पर्याय: जीवन अथवा मृत्यू
11आता मी ज्या आज्ञा आज तुम्हाला देत आहे, त्या अतिशय अवघड किंवा तुमच्या आवाक्याबाहेरच्या नाहीत. 12कारण त्या काही वर स्वर्गात नाहीत, की तुम्ही विचाराल, “आम्ही त्या पाळाव्या म्हणून आमच्यापर्यंत आणण्यासाठी आणि जाहीर करण्यासाठी स्वर्गात कोण चढेल?” 13तसेच त्या महासागरा पलीकडेही नाहीत, की तुम्ही विचाराल, “आम्ही त्या पाळाव्या म्हणून आमच्यापर्यंत आणण्यासाठी आणि जाहीर करण्यासाठी महासागर ओलांडून कोण जाईल?” 14नाही, वचन अगदी तुमच्याजवळ आहे; तुम्हाला त्यांचे पालन करता यावे म्हणून ते तुमच्या मुखात आहेत; ते तुमच्या अंतःकरणात आहे.
15पाहा मी आज तुमच्यापुढे जीवन व समृद्धी, मृत्यू व नाश ठेवले आहे. 16आज मी तुम्हाला आज्ञा देत आहे की तुम्ही याहवेह तुमच्या परमेश्वरावर प्रीती करावी, आज्ञापूर्वक त्यांच्या मार्गात चालावे, आणि त्यांच्या आज्ञा, विधी व नियम पाळावे; म्हणजे तुम्ही जिवंत राहाल व तुमची वृद्धी होईल आणि जी भूमी तुम्ही ताब्यात घेण्यासाठी जात आहात, तिथे याहवेह तुमचे परमेश्वर तुम्हाला आशीर्वादित करतील.
17परंतु तुमचे अंतःकरणे फिरले आणि तुम्ही आज्ञा न पाळणारे झालात आणि जर तुम्ही इतर दैवतांकडे बहकून जाऊन त्यांना नमन कराल आणि त्यांची उपासना कराल, 18तर मी आज तुम्हाला जाहीरपणे सांगतो की, तुम्ही निश्चितच नष्ट व्हाल. यार्देन ओलांडून ज्या भूमीत प्रवेश करण्यास आणि ताब्यात घेण्यासाठी तुम्ही जात आहात, त्यात तुम्हाला दीर्घायुष्य लाभणार नाही.
19आकाश आणि पृथ्वी यांना तुमच्याविरुद्ध साक्षीला ठेवून आज मी तुमच्यापुढे जीवन आणि मृत्यू, आशीर्वाद आणि शाप, ही ठेवली आहेत. म्हणून तुम्ही जीवन निवडून घ्यावे म्हणजे तुम्ही आणि तुमची मुले जिवंत राहतील, 20आणि तुम्ही याहवेह तुमच्या परमेश्वरावर प्रीती करावी, त्यांची वाणी ऐकावी आणि त्यांना बिलगून राहावे. कारण याहवेहच तुमचे जीवन आहेत आणि अब्राहाम, इसहाक आणि याकोब या तुमच्या पूर्वजांना वचन दिलेल्या देशात तेच तुम्हाला दीर्घायुष्य देतील.