अनुवाद 31
31
मोशेनंतर यहोशुआचा पदाधिकार
1मोशेने या गोष्टी सर्व इस्राएली लोकांना जाऊन सांगितल्या: 2“मी आता एकशेवीस वर्षांचा झालो आहे आणि मी येथून पुढे तुमचे नेतृत्व करू शकणार नाही. कारण ‘तू यार्देन नदी ओलांडू नये,’ असे याहवेहने मला सांगितले आहे. 3परंतु याहवेह तुमचे परमेश्वर स्वतःच तुमच्या आधी यार्देन नदी ओलांडतील. ते या राष्ट्रांचा तुमच्यापुढे नाश करतील आणि तुम्ही त्यांच्या भूमीचा ताबा घ्याल. याहवेहने म्हटल्याप्रमाणे यहोशुआ देखील यार्देन नदी ओलांडून तुमच्यापुढे जाईल. 4आणि ज्याप्रमाणे याहवेहने अमोर्यांचे राजे सीहोन आणि ओगचा नाश केला, त्याचप्रमाणे या देशातील राष्ट्रांचा ते नाश करतील. 5याहवेह त्यांना तुमच्या स्वाधीन करतील आणि त्यांच्याशी ते सर्व करावे ज्याची आज्ञा मी तुम्हाला दिलेली आहे. 6खंबीर व्हा आणि हिंमत धरा. त्यांना भिऊ नका वा घाबरू नका, कारण याहवेह तुमचे परमेश्वर तुमच्याबरोबर जातील; ते तुम्हाला कधीही सोडणार नाही किंवा त्यागणार नाही.”
7मग मोशेने यहोशुआला बोलाविले आणि सर्व इस्राएली लोकांसमक्ष त्याला सांगितले, “खंबीर हो आणि हिंमत धर, कारण या लोकांच्या पूर्वजांना याहवेहने वचनपूर्वक देऊ केलेल्या देशात तू त्यांच्यासह जावे आणि ती भूमी त्यांचे वतन म्हणून त्यांना विभागून द्यावी. 8याहवेह स्वतः तुझ्यापुढे चालतील आणि तुझ्याबरोबर राहतील; ते तुला कधीही सोडणार नाही किंवा त्यागणार नाहीत. भिऊ नकोस; निरुत्साही होऊ नकोस.”
नियमशास्त्राचे सार्वजनिक वाचन
9नंतर मोशेने हे संपूर्ण नियमशास्त्र लिहिले आणि याहवेहच्या कराराचे कोश वाहणाऱ्या लेवीय याजकांना आणि इस्राएली लोकांच्या वडीलजनांना दिले. 10मग मोशेने त्यांना आज्ञा दिली: “प्रत्येक सातव्या वर्षाच्या शेवटी, कर्ज माफीच्या वर्षी, मंडपांच्या उत्सवात, 11याहवेह तुमच्या परमेश्वराने निवडलेल्या ठिकाणी जेव्हा सर्व इस्राएली लोक उपस्थित होतील, तेव्हा हे नियमशास्त्र त्यांना ऐकू जाईल असे वाचावे. 12लोकांना एकत्र करा—पुरुष, स्त्रिया आणि मुले आणि तुमच्या नगरात राहत असलेले परदेशी—म्हणजे ते ऐकतील आणि याहवेह तुमच्या परमेश्वराचे भय बाळगण्यास शिकतील व या नियमशास्त्रामधील सर्व वचने काळजीपूर्वक पाळतील. 13त्यांची बालके, ज्यांना हे नियमशास्त्र ठाऊक नाही, त्यांनीही यार्देन नदी ओलांडून, त्या वचनदत्त देशात, जी भूमी ताब्यात घेण्यास तुम्ही जात आहात तिथे जोपर्यंत राहाल, तोपर्यंत हे ऐकावे आणि याहवेह तुमच्या परमेश्वराचे भय बाळगण्यास शिकावे.”
इस्राएलाच्या बंडाचे भाकीत
14मग याहवेह मोशेला म्हणाले, “तुझ्या मृत्यूचा दिवस जवळ आला आहे. यहोशुआला बोलव आणि तुम्ही दोघे सभामंडपात हजर व्हा म्हणजे मी तिथे त्याला नियुक्त करेन.” मग मोशे आणि यहोशुआ आले आणि सभामंडपात हजर झाले.
15तेव्हा याहवेह मंडपाच्या प्रवेशद्वाराशी मेघस्तंभाच्या रूपाने त्यांना प्रगट झाले आणि मेघस्तंभ द्वाराशी स्थिर राहिले. 16आणि याहवेह मोशेला म्हणाले: “तू आपल्या पूर्वजांसोबत विसावा घ्यावयास जाणार आहे आणि हे लोक ज्या देशात प्रवेश करणार आहेत, तिथे लवकरच परकीय दैवतांच्या समोर व्यभिचार करतील. ते माझा त्याग करतील आणि मी त्यांच्याबरोबर केलेला करार मोडतील. 17आणि म्हणून त्या दिवशी माझा क्रोध त्यांच्याविरुद्ध भडकेल आणि मी त्यांचा त्याग करेन; माझे मुख त्यांच्यापासून लपवेन आणि त्यांचा नाश होईल. त्यांच्यावर भयंकर संकटे व अरिष्ट येतील आणि त्या दिवशी ते म्हणतील, ‘आमचे परमेश्वर आता आम्हामध्ये नाहीत म्हणून ही संकटे आम्हावर आली आहेत का?’ 18आणि निश्चितच इतर दैवतांची उपासना करण्याच्या त्यांच्या पातकांमुळे मी माझे मुख त्यांच्यापासून लपवेन.
19“म्हणून आता हे गीत तुम्ही लिहून घ्या आणि ते इस्राएलाच्या सर्व लोकांना शिकव व त्यांना गावयास सांग, म्हणजे हे गीत त्यांच्याविरुद्ध माझ्याकरिता साक्ष असेल. 20जो देश मी त्यांच्या पूर्वजांना शपथ वाहून देऊ केला आहे, त्या दुधामधाचा प्रवाह वाहणार्या देशात, मी त्यांना आणेन आणि ते खाऊन पिऊन तृप्त व संपन्न होतील, तेव्हा ते इतर दैवतांकडे वळतील आणि त्यांची उपासना करू लागतील, माझी उपेक्षा करतील आणि माझा करार मोडतील. 21आणि जेव्हा त्यांच्यावर अनेक संकटे व अरिष्टे येतील, तेव्हा हे गीत त्यांच्याविरुद्ध साक्ष असे ठरेल, कारण त्यांचे वंशज हे गीत विसरू शकणार नाही. या वचनदत्त देशात प्रवेश करण्यापूर्वीच या लोकांची प्रवृत्ती कशी आहे हे मला माहीत आहे.” 22तेव्हा त्याच दिवशी मोशेने त्या गीताचे शब्द लिहून काढले आणि सर्व इस्राएली लोकांना ते शिकविले.
23नंतर याहवेहने नूनाचा पुत्र यहोशुआला ही आज्ञा दिली: “खंबीर हो व हिंमत धर, कारण तू सर्व इस्राएली लोकांना मी त्यांना देऊ केलेल्या वचनदत्त देशात आणशील आणि मी स्वतः तुझ्याबरोबर असेन.”
24त्या पुस्तकात नमूद केलेल्या नियमशास्त्राच्या सर्व शब्दांना प्रारंभापासून शेवटपर्यंत मोशेने लिहून पूर्ण केल्यानंतर, 25त्याने जे याहवेहच्या कराराचा कोश वाहतात त्या लेव्यांना आज्ञा केली: 26“तुम्ही नियमशास्त्राचा हा ग्रंथ घ्या आणि याहवेह तुमच्या परमेश्वराच्या कराराच्या कोशाजवळ नेऊन ठेवा. तिथे हा तुमच्याविरुद्ध साक्ष म्हणून राहील. 27कारण तुम्ही किती बंडखोर आणि ताठ मानेचे आहात हे मला माहीत आहे. मी तुम्हाबरोबर असताना, तुम्ही जर याहवेहविरुद्ध बंडखोरी करीत आहात, तर माझ्या मृत्यूनंतर तुम्ही किती अधिक बंडखोरी कराल! 28आता तुमच्या गोत्रांच्या सर्व वडीलजनास आणि अधिकार्यांस माझ्यासमोर एकत्र करा, म्हणजे मी हे वचने त्यांच्या कानावर पडतील असे बोलेन व आकाश आणि पृथ्वी यांना त्यांच्याविरुद्ध साक्ष बनवेल. 29कारण मला माहीत आहे की, माझ्या मृत्यूनंतर तुम्ही स्वतःला पूर्णपणे भ्रष्ट कराल आणि मी दिलेल्या आज्ञांपासून बहकून दूर जाल. भविष्यकाळात तुमच्यावर संकटे येतील, कारण याहवेहच्या दृष्टीने वाईट ते कराल व तुमच्या हस्तकृतीने त्यांना अतिशय संतप्त कराल.”
मोशेचे गीत
30आणि मोशेने या गीताचे शब्द प्रारंभापासून तर शेवटपर्यंत जमलेल्या इस्राएली लोकांच्या सर्व मंडळीच्या कानी पडतील असे सांगितले.
सध्या निवडलेले:
अनुवाद 31: MRCV
ठळक
सामायिक करा
कॉपी करा
तुमचे हायलाइट तुमच्या सर्व डिव्हाइसेसवर सेव्ह करायचे आहेत? साइन अप किंवा साइन इन
पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती™
ग्रंथाची मालकी © 1978, 1982, 2008, 2021, 2022, 2024 Biblica, Inc.
यांची परवानगी घेऊन केले गेले आहे.
सर्व अधिकार जगभरात राखीव.
Holy Bible, Marathi Contemporary Version™
Copyright © 1978, 1982, 2008, 2021, 2022, 2024 by Biblica, Inc.
Used with permission.
All rights reserved worldwide.