3
प्रत्येक गोष्टींसाठी निर्धारित समय
1प्रत्येक गोष्टींसाठी निश्चित वेळ आहे,
आणि पृथ्वीवर प्रत्येक कामासाठी एक ऋतू ठरलेला असतो:
2जन्म होण्याची वेळ आणि मृत्यू येण्याची वेळ,
पेरणीची वेळ आणि कापणीची वेळ,
3ठार मारण्याची वेळ आणि बरे करण्याची वेळ आहे;
विध्वंसाची वेळ आणि बांधण्याची वेळ आहे;
4रडण्याची वेळ आणि हसण्याची वेळ आहे;
शोक करण्याची आणि नाचण्याची वेळ आहे;
5दगड पसरून टाकण्याची वेळ आणि दगड गोळा करण्याची वेळ;
आलिंगन देण्याची वेळ व आलिंगन टाळण्याची वेळ;
6शोधण्याची वेळ आणि सोडण्याची वेळ;
साठविण्याची वेळ व टाकून देण्याची वेळ;
7फाडण्याची वेळ व दुरुस्त करण्याची वेळ;
मौन धरण्याची वेळ व बोलण्याची वेळ;
8प्रेम करण्याची वेळ व द्वेष करण्याची वेळ;
युद्ध करण्याची वेळ आणि शांती राखण्याची वेळ.
9कामकर्यांना त्यांच्या कष्टापासून काय मोबदला मिळतो? 10परमेश्वराने मनुष्यावर लादलेले ओझे मी पाहिले आहे. 11त्यांनी प्रत्येक गोष्ट, त्याच्या समयात सुंदर अशी बनविली आहे. परमेश्वराने मनुष्याच्या अंतःकरणात अनंतकाळचे जीवन ठेवलेले आहे.#3:11 किंवा तरीसुद्धा मानवी अंतःकरणात असे ज्ञान ठेवले, जेणेकरून तरीसुद्धा परमेश्वराने आरंभापासून शेवटपर्यंत केलेली कृत्ये कोणीही समजू शकले नाहीत. 12मला ठाऊक आहे की जिवंत असेपर्यंत मनुष्याने सुखी राहावे आणि दुसर्याचे हित करावे, यापेक्षा काहीही उत्तम नाही. 13प्रत्येक मनुष्याने खावे, प्यावे व आपल्या कष्टाच्या कार्यात संतुष्ट राहावे—हे परमेश्वराने दिलेले दान आहे. 14मला हे माहीत आहे की परमेश्वराने जे केले ते सर्वकाळ टिकणारे आहे; त्यात काही भर घालता येणार नाही किंवा त्यातून काही काढून घेता येणार नाही. मनुष्याने त्यांचे भय धरावे म्हणून परमेश्वर हे सर्व करतात.
15जे आहे, ते सर्व यापूर्वी झालेलेच आहे;
जे होणार, तेही होऊन गेले आहे.
गतकाळात होऊन गेले तेच परमेश्वर पुन्हा घडवून आणतील.#3:15 3:15 किंवा परमेश्वर गतकाळात होऊन गेले
16मग मी सूर्याखाली आणखीही काही बघितले:
दुष्टाईने—न्यायाचे स्थान घेतले होते.
आणि न्यायीपणाच्या ठिकाणीसुद्धा—दुष्टताच होती.
17मी स्वतःला म्हटले,
“परमेश्वर नीतिमान आणि दुष्ट
या दोघांचाही न्याय करणार,
कारण प्रत्येक कृत्यांसाठी निर्धारित समय असणार,
प्रत्येक कृत्यांचे न्याय होण्याची विशिष्ट वेळ.”
18मी स्वतःशी हे सुद्धा म्हणालो, “परमेश्वर मानवाची परीक्षा यासाठी घेतात की त्यांना हे समजावे की ते पशुवत् आहेत. 19खरोखर मानवाचे नशीब हे इतर प्राण्यांप्रमाणे आहे; सारखेच नशीब हे दोघांसाठी वाट पाहत असते: जसा एक मरतो, तसाच दुसराही मरतो. सर्वांना सारखाच श्वास#3:19 किंवा श्वास आहे; इतर प्राण्यांपेक्षा मानवाला अधिक लाभ नाही. सर्वकाही व्यर्थ आहे. 20सर्वकाही एकाच ठिकाणी जाणार आहेत; सर्व मातीतून येतात आणि पुन्हा मातीत जाऊन मिळतात. 21मनुष्याचा आत्मा वर घेतल्या जातो आणि जनावराचा प्राण भूतलात जातो, हे कोणाला माहीत आहे?”
22मी हे पहिले की मानवांनी स्वतःच्या कामात आनंद मानावा, यापेक्षा त्यांच्यासाठी अधिक काही चांगले नाही, कारण हेच विधिलिखित आहे. ते गेल्यानंतर काय घडेल ते पाहण्यासाठी त्यांना कोण परत आणणार?