YouVersion लोगो
सर्च आयकॉन

उपदेशक 5

5
परमेश्वराला बोललेला नवस पूर्ण करा
1परमेश्वराच्या मंदिरात जाताना तू तुझी पावले सांभाळ. बोध ऐकण्यासाठी परमेश्वराच्या समीप जा, मूर्ख लोकांसारखे यज्ञबली देण्यापेक्षा बरे, कारण आपण चूक करीत आहोत, हे त्यांना कळत नाही.
2बोलण्यात उतावळा असू नको,
परमेश्वरासमोर काहीही उच्चारण्यास
आपल्या मनात घाई करू नकोस.
कारण परमेश्वर स्वर्गात आहे
आणि तू तर पृथ्वीवर आहेस,
म्हणून तुझे शब्द थोडकेच असू दे.
3अनेक चिंता असल्यास स्वप्न पडते,
आणि जास्त बडबड करण्याने मूर्ख ओळखला जातो.
4परमेश्वराशी तू नवस केला असेल, तर तो फेडण्यास उशीर करू नकोस, परमेश्वराला मूर्ख मनुष्यात प्रसन्नता वाटत नाही; तुझा नवस फेडून टाक. 5नवस करून न फेडण्यापेक्षा, तो न केलेला बरा. 6तुझ्या मुखाने तुला पाप करावयास लावू नये. “मी चुकून नवस केला” असे मंदिराच्या दूताला सांगून निषेध करू नकोस. तू जे बोलतो त्याबद्दल परमेश्वराने रागावून तुझ्या हाताचे कार्य नष्ट का करावे? 7पुष्कळ स्वप्ने बघणे व अधिक शब्द वापरणे व्यर्थ आहे. म्हणून परमेश्वराचे भय बाळग.
धनाची व्यर्थता
8आपल्या नगरात गरिबांवर अत्याचार होत असताना किंवा त्यांना न्याय आणि त्यांचे हक्क नाकारले जात असताना दिसल्यास त्याबद्दल आश्चर्य बाळगू नकोस; एक अधिकाऱ्याचे निरीक्षण करणारा वरिष्ठ अधिकारी आहे, आणि दोघांवर त्यांचा उच्चाधिकारी आहे. 9भूमीचे फळ तर सर्वांसाठी आहे; राजासुद्धा त्याद्वारे नफा मिळवितो.
10पैशावर प्रेम असणार्‍याला पैसा कधीच पुरेसा नसतो;
जो कोणी संपत्तीवर प्रेम करतो, तो कधीही आपल्या मिळकती मध्ये समाधानी नसतो,
हे सुद्धा व्यर्थच आहे.
11संपत्ती वाढली म्हणजे,
तिचा उपभोग घेणारे सुद्धा वाढतात.
आणि ती केवळ आपल्या दृष्टीने बघून आनंदित होण्या व्यतिरिक्त
त्या मालकाला काय लाभ?
12खाण्यास कमी किंवा भरपूर मिळो
कष्टकर्‍याला सुखाची झोप लागते.
परंतु श्रीमंताची विपुल संपत्ती
त्यांना रात्री झोप येऊ देत नाही.
13सूर्याखाली मी एक भयंकर गोष्ट पाहिली:
जसे मालकाची हानी होण्यासाठी साठविलेली संपत्ती,
14किंवा काही दुर्दैवी व्यवहारामध्ये तो सर्व पैसा गमावून बसतो
आणि शेवटी मुलाबाळांकडे
वारसाहक्काने मिळण्यास काहीही शिल्लक नसते.
15प्रत्येकजण आपल्या आईच्या उदरातून नग्न येतो,
आणि जसे सर्वजण येतात, तसेच ते परत जातात.
त्यांचे कष्टार्जित असे काहीही
त्यांच्या हातात घेऊन ते जाऊ शकत नाहीत.
16ही देखील अतिशय भयानक दुष्टता आहे:
सर्वजण जसे येतात, तसेच ते जातात,
आणि वार्‍यासाठी कष्ट करून
त्यांना काय मिळते?
17त्यांच्या सर्व दिवसांत ते अंधारात राहून
अत्यंत निराशा, यातना आणि क्रोधासह अन्न खातात,
18तरी एक चांगली गोष्ट मी पाहिली: मनुष्याने खावे, प्यावे व परमेश्वराने आपल्याला सूर्याखाली दिलेल्या या थोड्या दिवसाच्या कष्टमय जीवनात जे आहे, त्यात समाधान मानावे—हाच त्यांचा वाटा आहे. 19आणि याशिवाय परमेश्वराने जर कोणा मनुष्याला संपत्ती आणि तिचा उपभोग घेण्यासाठी आरोग्य दिले असेल, तर त्यांनी त्या परिश्रमात आनंद करावा—हे त्यांना परमेश्वराचे दान आहे. आनंदाने काम करणे व जीवनात जे वाट्याला येईल त्यात समाधान मानणे, ही खरोखर परमेश्वराची देणगी आहे. 20असे करणार्‍याला आपल्या भूतकाळाचे मनन करावे लागत नाही, कारण परमेश्वर त्याचे अंतःकरण आनंदाने भरून ठेवतो.

सध्या निवडलेले:

उपदेशक 5: MRCV

ठळक

सामायिक करा

कॉपी करा

None

तुमचे हायलाइट तुमच्या सर्व डिव्हाइसेसवर सेव्ह करायचे आहेत? साइन अप किंवा साइन इन