8
1सुज्ञासारखा कोण आहे?
गोष्टींचे स्पष्टीकरण कोणाला माहीत आहे?
मनुष्यांचे सुज्ञान त्यांचे मुख उजळून टाकते
आणि त्यांचे कठोर स्वरूप बदलते.
राजाचे आज्ञापालन
2मी म्हणतो, राजाच्या आज्ञेचे पालन करा, कारण तशी तुम्ही परमेश्वरासमोर शपथ घेतली आहे. 3राजाची उपस्थिती सोडण्याची घाई करू नका. परंतु एखाद्या वाईट गोष्टींच्या बाजूने उभे राहू नका, कारण राजा त्याला योग्य वाटेल ते करतो. 4कारण राजाच्या वाणीत अधिकार आहे, “हे तू काय करतो” असे त्याला कोण म्हणणार?
5त्याच्या आज्ञांचे पालन करणार्यांना इजा होणार नाही,
आणि सुज्ञ माणसाच्या अंतःकरणाला योग्य वेळ आणि प्रक्रिया माहीत होईल.
6जरी त्या व्यक्तीला भारी यातना सोसाव्या लागतात,
तरी प्रत्येक गोष्टींसाठी योग्य वेळ आणि प्रक्रिया ठरलेली असते.
7जर कोणालाही आपले भविष्य माहीत नसते,
तर पुढे काय घडणार हे तो इतरांना कसे सांगणार?
8जसे कोणत्या मनुष्याला वार्यावर नियंत्रण करण्याचे सामर्थ्य नाही,
तसेच त्यांच्या मृत्यूच्या वेळेवरही कोणाला अधिकार नाही.
जसे कोणालाही युद्धाच्या वेळी सुट्टी नसते,
तसेच दुष्टता करणाऱ्यांना ती त्यातून सुटका देत नाही.
9मी हे सर्व पाहिले, सूर्याखाली होत असलेल्या प्रत्येक गोष्टींकडे माझे चित्त लावले. अशीही एक वेळ आहे, जेव्हा एखादा व्यक्ती दुसर्यावर स्वतःच्याच यातनेमुळे अधिकार चालवितो. 10जे पवित्रस्थानात येत-जात होते आणि या नगरीत त्यांची उगीच स्तुती केली जात असे, अशा दुष्टांना पुरले जात असताना सुद्धा मी पहिले; हे देखील अर्थहीन आहे.
11जर एखाद्या अपराधासाठी त्वरित शिक्षा करण्यात आली नाही, तर लोकांचे हृदय चुकीचे कार्य करण्याच्या योजनेने भरतात. 12जर एखादा दुष्ट मनुष्य शंभर गुन्हे करतो तरी तो दीर्घायुष्य जगतो, तरी मला माहीत आहे की जे परमेश्वराचे भय बाळगतात व जे त्यांचा आदर करतात त्यांचे अधिक हित होईल. 13दुष्ट परमेश्वराचे भय बाळगत नाहीत, म्हणून त्यांचे भले होणार नाही आणि संध्याकाळच्या सावलीप्रमाणे त्यांचे दिवस वाढणार नाही.
14पृथ्वीवर आणखी काही घडत आहे जे निरर्थक आहे: जे दुष्टासाठी निर्धारित असते ते नीतिमानाला मिळते व नीतिमानाच्या वाट्याचे दुष्टाला मिळते. मी म्हणतो हे सुद्धा अर्थहीन आहे. 15म्हणून मी जीवनाच्या आनंदाची प्रशंसा केली, कारण मनुष्याने खावे, प्यावे, व आनंद करावा, सूर्याखाली त्याहून अधिक चांगले काही नाही. तेव्हा सूर्याखाली परमेश्वराने दिलेल्या त्यांच्या कष्टदायक जीवनाच्या सर्व दिवसात, त्यांना आनंदाची साथ लाभेल.
16सुज्ञानाला जाणावे व पृथ्वीवर केलेले परिश्रम पाहावे—लोक जे अहोरात्र झोप न घेता करतात—म्हणून मी माझे चित्त लावले, 17तेव्हा मी परमेश्वराने केलेले सर्वकाही पाहिले. सूर्याखाली होणार्या कार्याला कोणीही समजू शकत नाही. शोध घेण्याचे कितीही प्रयत्न केले, तरीही त्याचा अर्थ कळू शकत नाही. जरी सुज्ञ लोक ते माहीत असल्याचा दावा करतात, तरी त्यांनाही ते खचितच समजू शकत नाही.