9
सर्वांसाठी सारखेच विधिलिखित
1मी या सर्वांवर मनन केले आणि हा निष्कर्ष काढला की नीतिमान व सुज्ञ आणि ते जे काही करतात ते सर्व परमेश्वराच्या हाती आहे, परंतु त्याच्यासाठी पुढे प्रेम किंवा द्वेष यापैकी काय ठेवले आहे हे कोणा मनुष्याला माहीत नसते. 2सर्वांची नियती एकच आहे—नीतिमान आणि दुष्ट, चांगला आणि वाईट, शुद्ध आणि अशुद्ध, जे यज्ञार्पण करतात व जे करीत नाहीत.
जसे चांगल्या व्यक्तीबरोबर,
तसेच पापी व्यक्तीबरोबर;
जसे शपथ घेणार्यांशी,
तसेच जे ती शपथ घ्यायला घाबरतात त्यांच्याशी.
3सूर्याखाली घडत असलेल्या प्रत्येक गोष्टीत हे वाईट आहे: एकसमान नियती सर्वांवर मात करते. शिवाय, लोकांची अंतःकरणे दुष्टाईने भरलेली आहेत आणि जिवंत असताना त्यांच्या अंतःकरणात वेडेपणा आहे आणि नंतर ते मृतांमध्ये सामील होतात. 4जिवंत लोकांमध्ये असलेल्या प्रत्येकाला ही आशा आहे—जिवंत कुत्रा सुद्धा मृत सिंहांपेक्षा बरा!
5जिवंतांना आपण मरणार हे माहीत असते,
पण मेलेल्यांना काहीच माहीत नसते;
त्यांना पुढे काही मोबदला नाही
आणि त्यांच्या नावाचे सुद्धा स्मरण नाही.
6त्यांचे प्रेम, त्यांचा द्वेष
आणि त्यांचा हेवा हे सर्व फार पूर्वीच नाहीसे झाले आहे;
सूर्याखाली घडत असलेल्या कोणत्याही गोष्टीत
पुन्हा त्यांचा वाटा नसेल.
7जा, आनंदाने तुझे भोजन कर, आणि हर्षित हृदयाने आपला द्राक्षारस पी, कारण तू जे करतो ते परमेश्वराने आधी मान्य केले आहे. 8तुमची वस्त्रे सर्वदा शुभ्र असावीत व तुमच्या डोक्याला नेहमी तेलाभिषेक असावा. 9सूर्याखाली परमेश्वराने तुला देऊ केलेल्या अर्थहीन जीवनाच्या आपल्या सर्व दिवसांत आपली पत्नी, जिच्यावर तू प्रेम करतो, तिच्याबरोबर या निरर्थक जीवनाचा आनंद उपभोग. कारण सूर्याखाली तुझ्या जीवनाचा व श्रमाचा हाच वाटा आहे. 10जे काम तुझ्या हाताला सापडते, ते तुझ्या सर्व शक्तीने कर, कारण मृतलोकामध्ये, जिथे तुला जायचे आहे, तिथे ना काम आहे, ना योजना, ना विद्या, ना सुज्ञान.
11मी सूर्याखाली आणखी काहीतरी वेगळे पाहिले:
शर्यत वेगवानांसाठी नाही,
किंवा युद्ध बलवानाचे नाही,
सुज्ञानी लोकांनाच भोजन मिळते असे नाही
किंवा बुद्धिमानाला धन मिळते असे ही नाही
किंवा कुशल कारागिरांवरच अनुग्रह होईल, असे नाही;
परंतु समय व प्रसंग सर्वांनाच येतो.
12आपल्यावर कधी वेळ येणार हे कोणालाही ठाऊक नाही:
जसा मासा त्या क्रूर जाळ्यात सापडतो,
किंवा पक्षी फासात अडकला जातो,
तसेच लोकसुद्धा त्यांच्यावर अचानक पडलेल्या
वाईट समयात अडकले जातात.
मूर्खतेपेक्षा सुज्ञान बरे
13सुज्ञानाचे हे उदाहरण मी सूर्याखाली पाहून फार प्रभावित झालो: 14एक छोटेसे शहर होते. त्यात थोडेच लोक राहत होते आणि एक अतिशय पराक्रमी राजा त्यांच्या विरोधात सैन्य घेऊन आला व त्या शहराला त्याने वेढा दिला आणि गराडा घातला. 15त्या शहरात एक गरीब पण सुज्ञ मनुष्य होता, आणि आपल्या सुज्ञानाने त्याने शहर वाचविले. पण त्या गरीब माणसाची कोणी आठवण केली नाही. 16म्हणून मी म्हणालो, “सुज्ञान बळापेक्षा बरे आहे.” परंतु गरीब मनुष्याचे ज्ञान तुच्छ लेखले गेले आणि त्याचा शब्द कोणी मानला नाही.
17सुज्ञानी मनुष्याच्या शांत शब्दांकडे लक्ष देणे
हे मूर्खांच्या राजाचे ओरडणे ऐकण्यापेक्षा बरे.
18युद्धाच्या शस्त्रांपेक्षा सुज्ञान बरे,
पण एक पापी पुष्कळ चांगल्या गोष्टींचा नाश करतो.