इफिसकरांस 3
3
गैरयहूदीयांसाठी परमेश्वराची अद्भुत योजना
1या कारणास्तव, मी पौल, तुम्हा गैरयहूदीयांसाठी ख्रिस्त येशूंचा बंदिवान आहे.
2तुम्हाकरिता परमेश्वराच्या कृपेची व्यवस्था जी मला देण्यात आली आहे याबाबत तुम्ही ऐकले आहे. 3अर्थात् हे रहस्य मला प्रकटीकरणाद्वारे समजले, याबद्दल मी यापूर्वी थोडक्यात लिहिले आहे. 4ते वाचल्यानंतर, ख्रिस्ताचे जे रहस्य आहे, त्याबद्दल मला झालेले ज्ञान तुम्हाला समजेल. 5हे रहस्य इतर पिढींच्या लोकांना प्रकट केले गेले नव्हते, पण आता त्यांनी आपल्या पवित्र प्रेषित व संदेष्टे यांना परमेश्वराच्या आत्म्याद्वारे प्रकट केले आहे. 6हे रहस्य असे आहे: शुभवार्तेद्वारे गैरयहूदीही इस्राएली लोकांबरोबर सहवारस, एका शरीराचे अवयव, आणि ख्रिस्त येशूंमध्ये अभिवचनाचे सहभागी असे आहेत.
7परमेश्वराच्या कृपेच्या वरदानाने व सामर्थ्याच्या कृतीने मी या शुभवार्तेचा सेवक झालो आहे. 8मी जो प्रभुच्या लोकांमध्ये लहानात लहान, त्या मला गैरयहूदीयांना ख्रिस्ताच्या अगाध समृद्धीच्या शुभवार्तेचा प्रचार करण्याची कृपा देण्यात आली. 9ज्यांनी सर्वकाही निर्माण केले त्या परमेश्वरामध्ये युगानुयुगांपासून गुप्त ठेवलेले ते रहस्य प्रकट करण्याची व्यवस्था केली. 10यासाठी की आता मंडळीद्वारे, आकाशमंडळातील शासक आणि अधिकार्यांना परमेश्वराचे विविध ज्ञान कळावे हाच त्यांचा उद्देश होता, 11हा त्यांच्या युगानयुगाचा उद्देश ख्रिस्त येशू आपला प्रभू यामध्ये पूर्ण व्हावा. 12येशूंमध्ये आणि त्यांच्यावरील विश्वासाद्वारे आम्ही पूर्ण स्वातंत्र्याने आणि आत्मविश्वासाने परमेश्वराजवळ जाऊ शकतो. 13म्हणून तुमच्यासाठी जे दुःख मला सहन करावे लागत आहे यामुळे तुम्ही मुळीच निराश होऊ नका, कारण ते तुमचे गौरव आहे.
इफिसकरांसाठी प्रार्थना
14या कारणासाठी मी पित्यासमोर गुडघे टेकतो, 15स्वर्गातील व पृथ्वीवरील प्रत्येक कुटुंबाला त्यांच्याद्वारे नाव देण्यात आले आहे. 16मी प्रार्थना करतो की आपल्या गौरवशाली संपत्तीनुरूप आपल्या पवित्र आत्म्याचे सामर्थ्य देऊन त्यांनी तुम्हाला अंतर्यामी शक्तिसंपन्न करावे. 17ज्यामुळे ख्रिस्त विश्वासाद्वारे तुमच्या हृदयात राहतील व तुम्ही प्रीतीमध्ये खोल मूळावलेले व स्थिर व्हावे अशी मी प्रार्थना करतो, 18आणि तुम्हाला प्रभुच्या सर्व पवित्र लोकांबरोबर ख्रिस्ताच्या प्रेमाची लांबी, रुंदी, खोली व उंची किती आहे हे समजून घेण्यास समर्थ होता यावे, 19आणि ही प्रीती जी ज्ञानापलीकडे आहे, ती तुम्हाला समजावी, यासाठी की तुम्ही स्वतः परमेश्वराच्या सर्व पूर्णतेइतके परिपूर्ण व्हावे.
20आता जे आपल्या सामर्थ्यानुसार आमच्यामध्ये कार्य करीत आहेत आणि आमच्या मागण्या किंवा कल्पना यांच्या पलीकडे अधिक विपुलतेने करण्यास समर्थ आहेत, 21त्यांना मंडळीमध्ये आणि ख्रिस्त येशूंमध्ये सर्व पिढ्यानपिढ्या सदासर्वकाळ गौरव असो. आमेन.
सध्या निवडलेले:
इफिसकरांस 3: MRCV
ठळक
सामायिक करा
कॉपी करा
तुमचे हायलाइट तुमच्या सर्व डिव्हाइसेसवर सेव्ह करायचे आहेत? साइन अप किंवा साइन इन
मराठी समकालीन आवृत्ती™, नवीन करार
ग्रंथाची मालकी © 1978, 1982, 2008, 2022 Biblica, Inc.
यांची परवानगी घेऊन केले गेले आहे. सर्व अधिकार जगभरात राखीव.
Marathi Contemporary Version™, New Testament
Copyright © 1978, 1982, 2008, 2022 by Biblica, Inc.
Used with permission. All rights reserved worldwide.