30
धूपवेदी
1“धूप जाळण्यासाठी बाभळीच्या लाकडाची एक वेदी तयार करावी. 2ती चौरस असावी आणि तिची लांबी एक हात, रुंदी एक हात व उंची दोन हात#30:2 अंदाजे 45 सें.मी. लांबी व रुंदी, 90 सें.मी. उंची असावी. तिची शिंगे तिच्याशी अखंड असावी. 3तिचा वरचा भाग, तिच्या सर्व बाजू व शिंगे यांना शुद्ध सोन्याचे आवरण द्यावे व त्याभोवती सोन्याचा काठ करावा. 4वेदीच्या खालच्या काठाला सोन्याच्या दोन कड्या कराव्या; वेदी वाहून नेण्यासाठी दांडे घालता येतील अशा समोरासमोर प्रत्येक बाजूला दोन कड्या असाव्या. 5दांडे बाभळीच्या लाकडाचे करून त्याला सोन्याचे आवरण द्यावे. 6कराराच्या कोशासमोर लावलेल्या पडद्याच्या बाहेरच्या बाजूस, प्रायश्चिताचे झाकण जे कराराच्या नियमाच्या पाटींवर आहे; तिथे वेदी ठेवावी; तिथेच मी तुला भेटत जाईन.
7“रोज सकाळी जेव्हा अहरोन दिव्याची तयारी करेल, त्यावेळी त्याने वेदीवर सुगंधी धूप जाळावा. 8पुन्हा सायंकाळी दिवे लावायला तो येईल तेव्हा त्याने धूप जाळावा म्हणजे याहवेहसमोर नित्याने येणार्या पिढ्यांपर्यंत धूप जळत असावा. 9या वेदीवर इतर कोणताही धूप, होमार्पण, अन्नार्पण किंवा पेयार्पण करू नये. 10अहरोनाने वर्षातून एकदा वेदीच्या शिंगांवर प्रायश्चित करावे. हे वार्षिक प्रायश्चित येणार्या पिढ्यांपर्यंत पापार्पणाच्या रक्ताने करावे. हे याहवेहसाठी परमपवित्र आहे.”
प्रायश्चिताचा कर
11मग याहवेह मोशेला म्हणाले, 12“तू इस्राएली लोकांना मोजण्यासाठी त्यांची जनगणना करशील, तेव्हा प्रत्येकाने आपली मोजणी झाल्यावर आपल्या जिवासाठी याहवेहस खंडणी द्यावी, म्हणजे तू त्यांची मोजणी करीत असताना त्यांच्यावर कोणतीही पीडा येणार नाही. 13प्रत्येकजण ज्यांची मोजणी होईल, त्यांनी पवित्रस्थानाच्या शेकेलानुसार अर्धा शेकेल#30:13 शेकेल अंदाजे 5.8 ग्रॅ. द्यावा, ज्याचे मोल वीस गेरे आहे. हा अर्धा शेकेल याहवेहसाठी अर्पण आहे. 14जे वीस वर्षांचे व त्याहून अधिक वयाचे आहेत त्या सर्वांनी याहवेहसाठी हे अर्पण द्यावे. 15जेव्हा आपल्या जिवासाठी खंडणी म्हणून तुम्ही याहवेहस अर्पण देता, तेव्हा श्रीमंताने अर्ध्या शेकेलापेक्षा अधिक देऊ नये व गरिबानेही कमी देऊ नये. 16इस्राएली लोकांकडून प्रायश्चिताचा पैसा घेऊन तो सभामंडपाच्या सेवेकरिता लावावा. तुमच्या जिवासाठी केलेले प्रायश्चित इस्राएली लोकांसाठी याहवेहसमोर स्मारक म्हणून राहील.”
धुण्याचे गंगाळ
17मग याहवेह मोशेला म्हणाले, 18“तू कास्याचे गंगाळ व त्याची कास्याची बैठक तयार करावी. ते सभामंडप व वेदीच्या मध्ये ठेवून त्यात पाणी भरावे 19अहरोन व त्याच्या पुत्रांनी त्यातील पाण्याने आपले हात व पाय धुवावे. 20जेव्हा ते सभामंडपात प्रवेश करतात, तेव्हा प्रत्येक वेळी त्यांनी आपले हात व पाय पाण्याने धुवावे म्हणजे ते मरणार नाहीत आणि जेव्हा ते याहवेहला अन्नार्पण करण्याची सेवा करण्यासाठी वेदीजवळ जातात, 21त्यांनी आपले हात व पाय धुवावे म्हणजे ते मरणार नाहीत. हा नियम अहरोन व त्याच्या येणार्या वंशाच्या प्रत्येक पिढीसाठी असावा.”
अभिषेकाचे तेल
22मग याहवेह मोशेला म्हणाले, 23“पवित्रस्थानाच्या शेकेलानुसार हे उत्तम मसाले घे: पाचशे शेकेल#30:23 म्हणजे5.8 कि.ग्रॅ. गंधरस, त्याच्या अर्धे म्हणजे दोनशे पन्नास शेकेल सुगंधी दालचिनी, दोनशे पन्नास शेकेल सुगंधी वेखंड, 24पाचशे शेकेल गोलाकार दालचिनी, सर्व पवित्रस्थानाच्या शेकेलानुसार, व एक हीन#30:24 हीन अंदाजे 3.8लीटर भरून जैतुनाचे तेल. 25यातून पवित्र अभिषेकाचे तेल, सुगंधी द्रव्ये तयार करणार्याच्या कुशलतेप्रमाणे तयार करावे. ते पवित्र अभिषेकाचे तेल असेल. 26त्या तेलाचा उपयोग सभामंडप, कराराच्या नियमाचा कोश, 27मेज व त्याचे सामान, दीपस्तंभ व त्याची उपकरणे, धूपवेदी, 28होमार्पणाची वेदी, तिची सर्व पात्रे, बैठकासह गंगाळ यांचा अभिषेक करण्यासाठी करावा. 29ते तू पवित्र करावे म्हणजे ते परमपवित्र होतील आणि ज्याला त्यांचा स्पर्श होईल ते पवित्र होईल.
30“याजक म्हणून माझी सेवा करावी म्हणून अहरोन व त्याच्या पुत्रांना अभिषेक करून त्यांना पवित्र कर. 31इस्राएली लोकांना सांग, ‘येणार्या पिढ्यांपर्यंत हे माझे पवित्र अभिषेकाचे तेल असावे. 32इतर कोणत्याही मनुष्याच्या शरीरावर ते ओतू नये आणि या मिश्रणाचा वापर करून दुसरे तेल बनवू नये. ते पवित्र आहे आणि तुम्ही त्याला पवित्र मानावे. 33जे कोणी याप्रकारे तेल तयार करेल आणि याजका व्यतिरिक्त इतर कोणाला लावेल, ते आपल्या लोकांतून काढून टाकले जातील.’ ”
धूप
34मग याहवेह मोशेला म्हणाले, “गंधरस, जटामांसी व गंधाबिरुजा व शुद्ध ऊद हे सुगंधी मसाले घे, हे सर्व समान प्रमाणात असावे, 35सुगंधी द्रव्ये तयार करणार्याच्या कुशलतेप्रमाणे सुगंधी धूप बनव. तो मीठ घातलेला, शुद्ध आणि पवित्र असावा. 36त्यातील काही कुटून त्याची बारीक भुकटी करावी व ती सभामंडपातील कराराच्या नियमाच्या कोशापुढे ठेवावी, जिथे मी तुला भेटत जाईन. ती तुमच्यासाठी परमपवित्र असावी. 37या मिश्रणाचा वापर करून स्वतःसाठी धूप तयार करू नये; याहवेहसाठी तो पवित्र मानला जावा. 38त्या सुगंधाचा आनंद घेण्यासाठी जो कोणी याप्रकारचा धूप बनवेल, त्याला आपल्या लोकांतून काढून टाकले जावे.”