31
बसालेल आणि ओहोलियाब
1मग याहवेह मोशेला म्हणाले, 2“पाहा, मी यहूदाहच्या गोत्रातील, हूराचा पुत्र उरी याचा पुत्र बसालेल याला निवडले आहे. 3व मी त्याला परमेश्वराचा आत्मा, ज्ञान, समज, बुद्धी आणि सर्वप्रकारच्या कुशलतेने भरले आहे— 4सोने, चांदी आणि कास्याचे कलाकौशल्य करण्यासाठी; 5आणि पाषाण फोडून रत्ने घडवावी, लाकडाचे काम आणि सर्वप्रकारचे कलात्मक कारागिरीचे काम करण्यासाठी. 6त्याचप्रमाणे, त्याला मदत करण्यासाठी दान गोत्रातील अहीसामाक याचा पुत्र ओहोलियाब याला मी नेमले आहे.
“सर्व कुशल कामगारांना मी क्षमता दिली आहे, जेणेकरून तुला आज्ञापिलेले सर्वकाही त्यांनी करावे:
7“जसे सभामंडप,
कराराच्या नियमाचा कोश व त्यावरील प्रायश्चिताचे झाकण,
आणि तंबूचे इतर सर्व साहित्य:
8मेज व त्यावरील सर्व सामान,
शुद्ध सोन्याचा दीपस्तंभ व त्याची सर्व उपकरणे,
व धूपवेदी,
9होमार्पणाची वेदी व तिची सर्व पात्रे,
गंगाळ व त्याची बैठक.
10तसेच विणलेली वस्त्रे,
अहरोन याजकासाठी पवित्र वस्त्रे,
व याजक म्हणून सेवा करतात तेव्हा त्याच्या पुत्रांसाठी वस्त्रे,
11अभिषेकाचे तेल व पवित्रस्थानासाठी सुगंधी धूप.
“जसे मी तुला आज्ञापिले आहे, त्यानुसारच त्यांनी ते तयार करावे.”
शब्बाथ
12मग याहवेह मोशेला म्हणाले, 13“इस्राएली लोकांना सांग, ‘तुम्ही माझे शब्बाथ अवश्य पाळावेत. येणार्या पिढ्यांपर्यंत हे माझ्या व तुमच्यामध्ये चिन्ह राहील, यासाठी की तुम्ही जाणावे की जो तुम्हाला पवित्र करतो, तो मीच याहवेह आहे.
14“ ‘शब्बाथ दिवस पाळावा, कारण तो तुम्हासाठी पवित्र आहे; जो कोणी तो अपवित्र करेल त्याला जिवे मारावे; जे कोणी त्या दिवशी काम करतील, त्यांना त्यांच्या लोकांतून काढून टाकले जावे. 15सहा दिवस काम करावे, परंतु सातवा दिवस हा विसाव्याचा शब्बाथ आणि याहवेहसाठी पवित्र आहे; शब्बाथ दिवशी जो काम करेल त्याला जिवे मारावे. 16इस्राएली लोकांनी निरंतरचा करार म्हणून पिढ्यान् पिढ्या शब्बाथ पाळावा. 17तो माझ्यामध्ये व इस्राएली लोकांमध्ये सदासर्वकाळचे चिन्ह असेल, कारण याहवेहने सहा दिवसात आकाश व पृथ्वी निर्माण केली आणि सातव्या दिवशी त्यांनी स्वस्थ राहून विसावा घेतला.’ ”
18जेव्हा याहवेहने सीनाय पर्वतावर मोशेबरोबर आपले बोलणे संपविले, तेव्हा त्यांनी मोशेला कराराच्या नियमाच्या दोन दगडी पाट्या दिल्या, ज्या परमेश्वराच्या बोटाने कोरलेल्या होत्या.