निर्गम 39
39
याजकीय वस्त्रे
1पवित्रस्थानातील सेवेसाठी त्यांनी निळे, जांभळे व किरमिजी रंगाच्या सुताची विणलेली वस्त्रे बनविली. याहवेहने मोशेला आज्ञापिल्याप्रमाणे अहरोनासाठी सुद्धा त्यांनी पवित्र वस्त्रे बनविली.
एफोद
2मग त्यांनी एफोद सोन्याचा, निळ्या, जांभळ्या व किरमिजी रंगाच्या सुताचा आणि बारीक कातलेल्या रेशमी तागाचा वापर करून बनविला. 3त्यांनी सोने ठोकून त्याचे पातळ पत्रे बनविले आणि निळ्या, जांभळ्या आणि किरमिजी रंगाच्या धाग्यात आणि रेशमी ताग कातून—कुशल कारागिराच्या हातांनी बनविले. 4एफोदासाठी त्यांनी दोन खांदेपट्ट्या बनविल्या, ज्या त्याच्या दोन कोपर्यांना बांधता येतील अशा जोडल्या. 5कुशलतेने विणलेला कमरबंद त्याच्यासारखाच होता; एफोदाशी अखंड असा तो सोन्याचा, निळ्या, जांभळ्या व किरमिजी रंगाच्या सुताचा व कातलेल्या रेशमी तागाचा, याहवेहने मोशेला आज्ञापिल्याप्रमाणे तो बनविला होता.
6त्यांनी गोमेद रत्ने सोन्याच्या कोंदणात बसविले आणि त्यावर मुद्रा कोरावी अशी इस्राएलाच्या पुत्रांची नावे कोरली. 7मग त्यांनी इस्राएलच्या पुत्रांचे स्मारक म्हणून ती रत्ने एफोदाच्या दोन खांदेपट्ट्यांवर लावली, याहवेहने मोशेला आज्ञापिल्याप्रमाणे त्यांनी हे केले.
ऊरपट
8कुशल कारागिरांच्या हस्तकृतीने त्यांनी ऊरपट बनविला. त्यांनी तो एफोदाप्रमाणेः सोन्याच्या जरीचा, निळ्या, जांभळ्या व किरमिजी रंगांचे सूत व कातलेल्या रेशमी तागाचा बनविला. 9तो चौकोनी असून दुहेरी दुमडलेला होता व त्याची लांबी एक वीत व रुंदी एक वीत#39:9 अंदाजे 23 सें.मी. होती. 10मग त्यांनी त्यात चार रांगेत मोलवान रत्ने लावली. पहिल्या रांगेत लाल, पुष्कराज, व माणिक 11दुसर्या रांगेत पाचू, नीलमणी व हिरे, 12तिसर्या रांगेत तृणमणी, सूर्यकांत व पद्मराग; 13आणि चौथ्या रांगेत लसणा, गोमेद व यास्फे. त्यांना नक्षीकाम केलेल्या सोन्याच्या कोंदणात लावले होते. 14इस्राएलाच्या पुत्रातील प्रत्येकाच्या नावाने एक अशी बारा रत्ने होती. प्रत्येक रत्नावर इस्राएलाच्या बारापैकी एका गोत्राचे नाव मुद्रेप्रमाणे कोरले.
15त्यांनी ऊरपटासाठी पीळ घातलेल्या दोरीप्रमाणे शुद्ध सोन्याच्या साखळ्या तयार केल्या. 16त्यांनी सोन्याची दोन कोंदणे व सोन्याच्या दोन कड्या बनविल्या, त्या दोन कोंदणांमध्ये घालून ऊरपटाच्या दोन्ही टोकास बसविल्या. 17त्यांनी त्या सोन्याच्या दोन साखळ्या ऊरपटाच्या टोकाला असलेल्या कड्यांमध्ये बसविल्या, 18आणि साखळीची दुसरी दोन टोके साच्यात घालून एफोदाच्या समोरील बाजूने त्याच्या खांदेपट्टीला जोडले. 19त्यांनी सोन्याच्या दोन कड्या तयार केल्या व त्या ऊरपटाच्या दुसर्या दोन कोपर्यांना म्हणजे एफोदा जवळील आतील बाजूच्या काठाला जोडल्या. 20मग त्यांनी सोन्याच्या आणखी दोन कड्या बनविल्या व त्या एफोदाच्या खांदेपट्टीच्या खालच्या बाजूने समोरून जोडल्या, एफोदाच्या कमरबंदाच्या अगदी वर असलेल्या काठाला जोडल्या. 21त्यांनी त्या ऊरपटाच्या कड्या एफोदाच्या कड्यांना निळ्या दोरीने कमरबंदाला अशा बांधाव्या की ऊरपट एफोदावरून सरकणार नाही; हे त्यांनी याहवेहने मोशेला आज्ञापिल्याप्रमाणे केले.
इतर याजकीय वस्त्रे
22त्यांनी एफोदाचा झगा संपूर्ण निळ्या कापडाने बनविला—विणकाम करणार्याच्या कामाप्रमाणे विणला. 23त्याच्या मधोमध चिलखताच्या गळ्याप्रमाणे त्या झग्याचे तोंड होते. तो फाटू नये म्हणून त्याच्या तोंडाला गळपट्टीप्रमाणे गोट होता. 24त्यांनी त्या झग्याच्या खालच्या घेर्यावर निळ्या, जांभळ्या व किरमिजी रंगाच्या सुताची व कातलेल्या सुताची डाळिंबे बनविली. 25डाळिंबांच्या मध्ये झग्याच्या घेरावर शुद्ध सोन्याच्या घंट्या बनवून लावल्या. 26याहवेहने मोशेला आज्ञापिल्याप्रमाणे सेवा करण्यासाठी घालावयाच्या झग्याच्या घेराच्या काठावर घंट्या व डाळिंबे एक सोडून एक असे आळीपाळीने लावले.
27यानंतर त्यांनी अहरोन व त्याचे पुत्र यांच्यासाठी रेशमी तागाचे विणलेले अंगरखे तयार केले. 28आणि रेशमी तागाचा फेटा व रेशमी तागाची टोपी आणि रेशमी तागाची अंतर्वस्त्रे केली. 29कातलेल्या रेशमी तागाचा आणि निळ्या, जांभळ्या व किरमिजी रंगाचे भरतकाम केलेला कमरबंद होता; जसे याहवेहने मोशेला आज्ञापिले होते.
30त्यांनी शुद्ध सोन्याची पवित्र मुद्रेची पाटी बनविली आणि तिच्यावर मुद्रा कोरावी तसे हे कोरले:
याहवेहसाठी पवित्र.
31ती जोडता यावी म्हणून त्यांनी ती निळ्या फेट्याला दोरीने बांधली, जसे याहवेहने मोशेला आज्ञापिले होते.
मोशे निवासमंडपाचे परीक्षण करतो
32याप्रकारे निवासमंडप व सभामंडप यांचे काम समाप्त झाले. इस्राएली लोकांनी जे काही याहवेहने मोशेला आज्ञापिले होते त्याप्रमाणेच केले. 33मग त्यांनी निवासमंडप मोशेकडे आणला:
तंबू व त्याचे सर्व सामान, त्याचे आकडे, फळ्या, अडसर, खांब व बैठका;
34मेंढ्याच्या लाल रंगवलेल्या कातड्यांचे आच्छादन आणि इतर प्रकारचे टिकाऊ चर्म, झाकण व त्याचा पडदा;
35कराराच्या नियमाचा कोश, त्याचे दांडे आणि प्रायश्चिताचे झाकण;
36मेज व त्याचे सर्व सामान आणि समक्षतेची भाकर;
37शुद्ध सोन्याचे दीपस्तंभ व त्याच्या दिव्यांची रांग व त्याची सर्व उपकरणे आणि प्रकाशासाठी जैतुनाचे तेल;
38सोन्याची धूपवेदी, अभिषेकाचे तेल, सुगंधी धूप व तंबूच्या प्रवेशद्वारासाठी पडदा;
39कास्याची वेदी व तिची कास्याची जाळी, तिचे दांडे व तिचे सर्व साहित्य;
गंगाळ व त्याची बैठक;
40अंगणाचे पडदे, खुंट्या व त्यांच्या बैठका आणि अंगणाच्या प्रवेशद्वारासाठी पडदे;
दोर्या व अंगणासाठी तंबूच्या मेखा;
निवासमंडप व सभामंडपा साठी लागणारे सर्व साहित्य;
41पवित्रस्थानात सेवा करताना घालावयाची विणलेली वस्त्रे आणि याजक म्हणून घालावयाची अहरोन याजकासाठी पवित्र वस्त्रे व त्याच्या पुत्रांची वस्त्रे.
42याहवेहने मोशेला आज्ञापिल्याप्रमाणेच इस्राएल लोकांनी सर्व कामे केली होती. 43मोशेने कामाचे परीक्षण केले व पाहिले की त्यांनी याहवेहने आज्ञापिल्याप्रमाणेच केले होते. म्हणून मोशेने त्यांना आशीर्वाद दिला.
सध्या निवडलेले:
निर्गम 39: MRCV
ठळक
सामायिक करा
कॉपी करा
तुमचे हायलाइट तुमच्या सर्व डिव्हाइसेसवर सेव्ह करायचे आहेत? साइन अप किंवा साइन इन
पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती™
ग्रंथाची मालकी © 1978, 1982, 2008, 2021, 2022, 2024 Biblica, Inc.
यांची परवानगी घेऊन केले गेले आहे.
सर्व अधिकार जगभरात राखीव.
Holy Bible, Marathi Contemporary Version™
Copyright © 1978, 1982, 2008, 2021, 2022, 2024 by Biblica, Inc.
Used with permission.
All rights reserved worldwide.