1
यहेज्केलचा प्राथमिक दृष्टान्त
1माझ्या तिसाव्या वर्षी, चौथ्या महिन्याच्या पाचव्या दिवशी, खेबर नदीजवळ मी निर्वासित लोकांबरोबर असताना, स्वर्ग उघडले आणि मी परमेश्वराचा दृष्टान्त पाहिला.
2यहोयाकीन राजाच्या बंदिवासाच्या पाचव्या वर्षी; महिन्याच्या पाचव्या दिवशी; 3बूजीचा पुत्र यहेज्केल याजक बाबिलोनी लोकांच्या देशात, खेबर नदीच्या किनाऱ्याकडे असताना याहवेहचे वचन त्याच्याकडे आले; तिथे याहवेहचा हात त्याच्यावर होता.
4मी दृष्टी लावली आणि उत्तरेकडून तुफानी वारा, चकाकणार्या विजांसहित एक मोठा ढग प्रखर प्रकाशाने गुंडाळलेला असा मला दिसला. अग्नीचा मध्यभाग झळकत्या धातूसारखा होता, 5आणि त्या अग्नीमध्ये चार जिवंत प्राण्यांसारखे काही होते. त्यांचे रूप मनुष्यांसारखे होते, 6परंतु प्रत्येकाला चार मुखे व चार पंख होते. 7त्यांचे पाय सरळ होते; त्यांच्या पायाचे तळवे वासराच्या तळव्यांसारखे असून ते उजळत्या कास्यासारखे चमकत होते. 8त्यांच्या चारही बाजूच्या पंखांखाली त्यांना मानवी हात होते. त्या चौघांना मुखे व पंख होते. 9एकाचे पंख दुसर्याच्या पंखांना स्पर्श करीत होते. प्रत्येक सरळ पुढे जात असे व हालचाल करताना वळत नसे.
10त्यांची मुखे अशा प्रकारे दिसत होती: प्रत्येकाला एक मानवी मुख होते, प्रत्येकाच्या उजव्या बाजूचे मुख सिंहाचे होते, आणि डावीकडील मुख बैलाचे होते; प्रत्येकाला गरुडाचे मुख सुद्धा होते. 11अशाप्रकारे त्यांची मुखे होती. प्रत्येकाचे वरच्या बाजूने पसरलेले पंख होते जे त्यांच्या बाजूला असलेल्या प्राण्याच्या पंखाला स्पर्श करीत होते; आणि प्रत्येकाला आणखी दोन पंख होते ज्यांनी त्यांचे अंग झाकले जाई. 12आत्मा जाईल तिथे ते प्रत्येक सरळ पुढे जात असत आणि जात असताना ते अजिबात वळत नसत. 13त्या जिवंत प्राण्यांचे रूप जळत्या निखार्यासारखे किंवा मशालीसारखे होते. अग्नी त्या प्राण्यांमधून पुढे मागे जात असे; तो प्रखर होता आणि त्यातून विजा चमकत होत्या. 14ते प्राणी विजेच्या गतीने इकडून तिकडे धावत असे.
15जेव्हा मी त्या जिवंत प्राण्यांकडे पाहात होतो, तेव्हा मला दिसले प्रत्येक प्राण्याजवळ त्यांच्या चार मुखांच्या बाजूला भूमीवर एकएक चाक होते. 16त्या चाकांचे रूप व घडण अशाप्रकारे होते: ते पुष्कराजसारखे चमकत होते आणि चारही चाके सारखीच दिसत होती. ते असे दिसत होते की जसे एका चाकात दुसरे चाक आहे. 17ते चालत असताना, ज्या दिशेकडे त्यांच्यापैकी एकाचे मुख आहे त्या कोणत्याही एका दिशेने चालत असत; आणि ते प्राणी जात असता चाकांनी आपली दिशा बदलली नाही. 18त्यांच्या काठा उंच व भयावह होत्या आणि चारही कडांना सर्वत्र डोळे होते.
19ते जिवंत प्राणी जसे पुढे जात, त्यांच्या बाजूला असलेली चाकेसुद्धा पुढे जात असत; आणि जेव्हा जिवंत प्राणी भूमीवरून उठत, चाकेही उठत असत. 20जिथे कुठे आत्मा जाईल, तिथे ते जाई, आणि त्यांच्याबरोबर चाकेसुद्धा उठत असत, कारण त्या जिवंत प्राण्यांचा आत्मा त्या चाकांमध्ये होता. 21जेव्हा प्राणी पुढे जात, तेव्हा ते देखील पुढे जात; जेव्हा प्राणी स्थिर उभे राहत, ते देखील स्थिर उभे राहत असत; आणि जेव्हा प्राणी भूमीवरून उठत, चाकेसुद्धा त्यांच्याबरोबर उठत असत, कारण त्या जिवंत प्राण्यांचा आत्मा त्या चाकांमध्ये होता.
22त्या जिवंत प्राण्यांच्या डोक्यावर घुमटासारखे दिसणारे, स्फटिकासारखे चमकणारे अद्भुत असे काहीतरी होते. 23त्या घुमटाखाली त्यांचे पंख एकमेकांकडे पसरलेले होते आणि प्रत्येकाचे दोन पंख त्यांचे अंग झाकीत होते. 24ते प्राणी पुढे चालत, तेव्हा मी त्यांच्या पंखांचा आवाज ऐकला, तो जोरात वाहणार्या जलाशयासारखा, सर्वसमर्थाच्या#1:24 इब्री भाषेत शद्दाय वाणीसारखा, लष्करी सेनेच्या घोषणेसारखा होता. जेव्हा ते स्थिर उभे राहत, तेव्हा ते त्यांची पंखे खाली करीत असत.
25ते त्यांचे पंख खाली करून उभे असताना त्यांच्या डोक्यावरील घुमटामधून एक वाणी आली. 26त्यांच्या डोक्यावर असलेल्या घुमटावर नीलमणी रत्नाच्या सिंहासनासारखे काहीतरी होते आणि त्या सिंहासनावर उंच मनुष्याच्या आकृतिसारखा कोणी होता. 27त्याचा कमरेसारखा दिसणारा वरचा भाग चकाकत्या धातूसारखा, जणू काही अग्नीने प्रज्वलित झाला होता आणि कमरेपासून खालचा भाग अग्नीसारखा होता; आणि त्याच्याभोवती अप्रतिम प्रकाश झळकत होता. 28पावसाच्या दिवशी मेघांत दिसणार्या मेघधनुष्यासारखे त्याच्या सभोवती तेज होते.
याहवेहच्या वैभवासारखे त्याचे रूप होते. जेव्हा मी ते पाहिले, तेव्हा मी उपडा पडलो आणि बोलणार्याची वाणी मी ऐकली.