YouVersion लोगो
सर्च आयकॉन

विलापगीत 5

5
1हे याहवेह, आम्हाला काय झाले आहे यांचे स्मरण करा;
आमच्या अपमानाकडे लक्ष द्या.
2आमचे वतन अपरिचितांना देण्यात आले आहे,
आमची घरे परकियांनी दिली आहेत.
3आम्ही पितृहीन झालो आहोत,
आमच्या माता विधवा झाल्या आहेत.
4पिण्याचे पाणीदेखील आम्हाला विकत घ्यावे लागते;
किंमत चुकविल्याशिवाय आम्हाला जळण मिळत नाही.
5पाठलाग करणारे आमच्या अगदी जवळ येऊन पोचले आहेत.
आम्ही अत्यंत थकलो आहोत व आम्हाला आराम असा नाहीच.
6पुरेशी भाकरी मिळण्याकरिता
आम्ही इजिप्तला आणि अश्शूरला स्वतःचे समर्पण केले आहे.
7आमच्या पूर्वजांनी पाप केले व ते आता हयात नाहीत.
आणि आम्ही त्यांची शिक्षा भोगत आहोत.
8गुलाम आता आमचे धनी झाले आहेत,
त्यांच्या हातातून आम्हाला सोडविणारा कोणीही नाही.
9भाकरी मिळविण्यासाठी आम्हाला आमचा जीव धोक्यात घालावा लागतो,
कारण निर्जन प्रदेशात तलवारीने वध होऊ शकतो.
10आमची त्वचा भट्टीप्रमाणे तप्त झाली आहे,
कारण भुकेमुळे आम्ही तापाळलेले आहोत.
11स्त्रियांना सीयोनात भ्रष्ट करण्यात आले आहे,
व कुमारिकांना यहूदीयातील नगरात.
12आमच्या अधिपतींना त्यांच्या हातांवर लटकविण्यात आले आहे;
आमच्या वडीलजनांचा मान राखला जात नाही.
13तरुण गिरणीवर काबाडकष्ट करतात;
तर किशोर लाकडाच्या भारी ओझ्यांखाली डळमळतात.
14वडीलजनांनी वेशीतील बैठकी सोडून दिल्या आहेत;
तरुणांनी त्यांचे संगीत बंद केले आहे.
15आमच्या हृदयातील आनंद निघून गेला आहे;
आमच्या नृत्यांचे रूपांतर विलापात झाले आहे.
16आमच्या मस्तकावरील मुकुट धुळीत पडला आहे.
धिक्कार असो आमचा, कारण आम्ही पाप केले आहे!
17याकारणास्तव आमची अंतःकरणे खचली आहेत,
या सर्व गोष्टींमुळे आमचे डोळे निस्तेज झाले आहेत.
18सीयोन पर्वत आता ओसाड झाला आहे,
तिथे आता लांडगे शिकारीसाठी संचार करतात.
19हे याहवेह, तुमचे शासन सदासर्वकाळचे आहे;
तुमचे राजासन पिढ्यान् पिढ्या स्थिर आहे.
20मग तुम्ही आम्हाला नेहमी का विसरता?
तुम्ही आमचा इतक्या दीर्घकालापर्यंत त्याग का केला?
21याहवेह, तुम्ही आमचा स्वतःशी पुनः संबंध स्थापित करा,
म्हणजे आम्ही तुमच्याकडे परत येऊ;
पूर्वीच्या दिवसांसारखे आमच्या दिवसांना नवनिर्मित करा,
22जर तुम्ही आमच्यावर मर्यादेपलिकडे क्रोधित झाला नसाल
आणि आमचा कायमचा त्याग केला नसेल तर.

सध्या निवडलेले:

विलापगीत 5: MRCV

ठळक

सामायिक करा

कॉपी करा

None

तुमचे हायलाइट तुमच्या सर्व डिव्हाइसेसवर सेव्ह करायचे आहेत? साइन अप किंवा साइन इन