12
बंदिवासाचे चिन्ह
1याहवेहचे वचन माझ्याकडे आले: 2“हे मानवपुत्रा, तू बंडखोर लोकांमध्ये राहत आहेस. पाहण्यासाठी त्यांना डोळे आहेत परंतु ते पाहत नाहीत, ऐकण्यासाठी त्यांना कान आहेत परंतु ते ऐकत नाहीत, कारण ते बंडखोर लोक आहेत.
3“म्हणून, हे मानवपुत्रा, निर्वासित होऊन जाण्यास तू आपले सामान बांध आणि दिवसाच्या प्रकाशात ते तुला पाहत असताच तू जिथे आहेस तिथून नीघ आणि दुसर्या ठिकाणाकडे जा. जरी ते बंडखोर लोक आहेत, तरी कदाचित ते समजतील. 4दिवसाच्या प्रकाशात, ते तुला पाहत असता निर्वासित म्हणून जाण्यास तू बांधलेले आपले सामान आण आणि संध्याकाळी ते पाहत असता, निर्वासित जाण्यास निघतात त्यांच्यासारखा तू बाहेर जा. 5ते पाहत असताच भिंत खण व त्यातून आपले सामान बाहेर काढ. 6ते पाहत असताच ते सामान आपल्या खांद्यावर घे आणि अंधार पडायला लागताच नीघ. तुला भूमी दिसू नये म्हणून आपला चेहरा झाक, कारण मी तुला इस्राएलसाठी एक चिन्ह केले आहे.”
7मग मला आज्ञा दिली त्याप्रमाणे मी केले. निर्वासित म्हणून जाण्यासाठी दिवसाच्या वेळी मी माझे सामान बाहेर आणले. मग संध्याकाळी माझ्या हाताने मी भिंत खोदली. अंधार पडायला लागला तेव्हा लोक पाहत असता माझ्या खांद्यावर मी माझे सामान वाहून घेतले.
8सकाळी याहवेहचे वचन माझ्याकडे आले: 9“हे मानवपुत्रा, इस्राएलच्या लोकांनी, त्या बंडखोर लोकांनी, ‘तू काय करीत आहेस’ असे विचारले नाही काय?
10“त्यांना सांग, ‘सार्वभौम याहवेह असे म्हणतात: ही भविष्यवाणी यरुशलेमातील राजपुत्र व तिथे राहत असलेल्या सर्व इस्राएली लोकांसाठी आहे.’ 11त्यांना सांग, ‘तुमच्यासाठी मी चिन्ह आहे.’
“मी जसे केले आहे, तसेच त्यांचेही करण्यात येईल. ते निर्वासित कैद करून नेले जातील.
12“त्यांच्यातील राजपुत्र आपले सामान आपल्या खांद्यावर घेऊन संध्याकाळच्या वेळी निघेल आणि त्याला जाण्यासाठी भिंतीत खोदून एक खिंडार खोदले जाईल. भूमी दिसू नये म्हणून तो आपला चेहरा झाकून घेईल. 13त्याच्यासाठी मी माझे जाळे पसरवीन आणि तो माझ्या पाशात अकडला जाईल; मी त्याला बाबेलमध्ये, खास्द्यांच्या देशात आणेन, पण तो त्याला दिसणार नाही, तो तिथे मरून जाईल. 14त्याच्या सभोवती असलेले; त्याचे कामकरी व त्याचे सैन्य मी वार्यावर पसरवीन; आणि उपसलेल्या तलवारीने मी त्यांचा पाठलाग करेन.
15“जेव्हा मी त्यांना राष्ट्रांमध्ये पांगून टाकीन आणि देशांमध्ये त्यांना पसरवीन, तेव्हा ते जाणतील की मीच याहवेह आहे. 16परंतु त्यांच्यापैकी काहीं लोकांना तलवार, दुष्काळ व मरी यांच्यापासून वाचवेन, यासाठी की ज्या देशांत ते जातील तिथे त्यांची अमंगळ कृत्ये कबूल करतील. तेव्हा ते जाणतील की मीच याहवेह आहे.”
17याहवेहचे वचन माझ्याकडे आले: 18“मानवपुत्रा, थरथर कापत आपले अन्न खा आणि आपले पाणी पिताना ते भीतीने पी. 19देशातील लोकांना सांग: ‘इस्राएल व यरुशलेमात राहणार्यांविषयी सार्वभौम याहवेह असे म्हणतात: ते त्यांचे अन्न चिंतेने खातील व आपले पाणी घाबरत पितील, कारण त्यात राहणार्या लोकांच्या क्रूरतेमुळे त्यांच्या देशात असलेले सर्वकाही काढून टाकले जाईल. 20वसलेली नगरे ओसाड होतील आणि भूमी उजाड होईल. तेव्हा तुम्ही जाणाल की मीच याहवेह आहे.’ ”
उशीर होणार नाही
21याहवेहचे वचन माझ्याकडे आले: 22“मानवपुत्रा, इस्राएल देशात ही काय म्हण आहे: ‘दिवस निघून जातात आणि प्रत्येक दृष्टान्त निष्फळ होत आहे’? 23त्यांना सांग, ‘सार्वभौम याहवेह असे म्हणतात, या म्हणीचा मी शेवट करणार आहे आणि ते इस्राएलमध्ये पुन्हा तिचा उच्चार करणार नाहीत.’ त्यांना सांग, ‘प्रत्येक दृष्टान्ताची पूर्तता होण्याचे दिवस जवळ येत आहेत. 24कारण इस्राएल लोकांमध्ये आणखी खोटे दृष्टान्त किंवा खुशामत करणारा जादूटोणा नसेल. 25परंतु मी याहवेह, मला जे वाटते ते बोलेन आणि विलंब न करता ते पूर्ण होईल. कारण अहो बंडखोर लोकहो, तुमच्या याच दिवसात, मी जे बोलेन ते पूर्ण करेन, असे सार्वभौम याहवेह जाहीर करतात.’ ”
26याहवेहचे वचन माझ्याकडे आले: 27“मानवपुत्रा, इस्राएलचे लोक म्हणतात, ‘जो दृष्टान्त तो पाहतो तो यापुढील अनेक वर्षांसाठी आहे आणि तो दूरच्या काळाविषयी भविष्यवाणी करतो.’
28“म्हणून त्यांना सांग, ‘सार्वभौम याहवेह असे म्हणतात: माझा कोणताही शब्द आणखी विलंब करणार नाही; जेव्हा मी ते बोलेन ते पूर्णतेस जाईल, असे सार्वभौम याहवेह जाहीर करतात.’ ”