YouVersion लोगो
सर्च आयकॉन

यहेज्केल 13

13
खोट्या संदेष्ट्यांचा निषेध
1याहवेहचे वचन माझ्याकडे आले: 2“मानवपुत्रा, इस्राएलचे संदेष्टे जे आता भविष्यवाणी करीत आहेत त्यांच्याविरुद्ध भविष्य सांग. जे आपल्याच स्वतःच्या कल्पनेनुसार भविष्य करतात त्यांना सांग: ‘याहवेहचे वचन ऐका! 3सार्वभौम याहवेह असे म्हणतात: मूर्ख#13:3 किंवा दुष्ट संदेष्टे ज्यांनी काहीही पाहिले नाही तरी स्वतःच्याच आत्म्याचे अनुसरण करतात त्यांचा धिक्कार असो! 4हे इस्राएला, तुझे संदेष्टे ओसाड जागेतील कोल्ह्यांसारखे आहेत. 5याहवेहच्या दिवशी युद्धात टिकून उभे राहावे म्हणून इस्राएलच्या लोकांसाठी भिंतींच्या खिंडारांना दुरुस्त करावयाला तुम्ही वरती गेला नाही. 6त्यांचे दृष्टान्त खोटे आहेत आणि त्यांचे शकुन लबाड आहेत. जरी त्यांना याहवेहने पाठवले नाही, तरी ते म्हणतात, “याहवेह जाहीर करतात,” आणि याहवेहने त्यांच्या शब्दाची पूर्तता करावी अशी अपेक्षा बाळगतात. 7तुम्ही खोटे दृष्टान्त पाहिले नाही काय आणि मी बोललो नाही तरीही, “याहवेह हे जाहीर करतात,” असे तुम्ही म्हणता तेव्हा तुम्ही खोटा शकुन उच्चारला नाही काय?
8“ ‘म्हणून सार्वभौम याहवेह असे म्हणतात: तुमची खोटी वचने व लबाड दृष्टान्त यामुळे मी तुमच्याविरुद्ध आहे असे सार्वभौम याहवेह जाहीर करतात. 9जे खोटे दृष्टान्त पाहतात आणि लबाड शकुन उच्चारतात, मी माझा हात त्या संदेष्ट्यांच्या विरुद्ध उगारणार. ते माझ्या लोकांच्या बैठकीचा भाग नसतील किंवा इस्राएलच्या यादीत त्यांची नोंद केली जाणार नाही, ना ते इस्राएलच्या देशात प्रवेश करतील. तेव्हा तुम्ही जाणाल की मीच सार्वभौम याहवेह आहे.
10“ ‘कारण जरी शांती नसली तरी ते माझ्या लोकांना, “शांती” असे म्हणत बहकवितात, कारण कच्ची भिंत बांधून ते त्यावर चुन्याचा लेप लावतात, 11म्हणून जे पडणारच आहे त्याला चुन्याचा लेप जे लावतात त्यांना सांग, मुसळधार पाऊस येईल आणि मी मोठ्या गारा खाली पाठवेन आणि तुफानी वारा सुटेल. 12जेव्हा भिंत कोसळेल तेव्हा, “तुम्ही दिलेला चुन्याचा लेप कुठे आहे” असे लोक तुम्हाला विचारणार नाहीत काय?”
13“ ‘म्हणून सार्वभौम याहवेह असे म्हणतात: माझ्या क्रोधाने तुफानी वारा सोडेन आणि माझ्या रागाने नाशाच्या संतापाने गारा व मुसळधार पाऊस पडेल. 14तुम्ही चुन्याचा लेप लावलेली भिंत मी पाडून टाकेन आणि ती धुळीस मिळवेन, म्हणजे तिचा पाया उघडा पडेल. जेव्हा ती#13:14 किंवा शहर पडेल तेव्हा तिच्याबरोबर तुमचाही नाश होईल; आणि तुम्ही जाणाल की मीच याहवेह आहे. 15याप्रकारे त्या भिंतीविरुद्ध व ज्यांनी तिला चुन्याचा लेप दिला त्यांच्याविरुद्ध मी माझा क्रोध ओतेन. मी तुम्हाला म्हणणार, “भिंत गेली व ज्यांनी तिला चुन्याचा लेप दिला ते सुद्धा गेले, 16इस्राएलचे ते संदेष्टे ज्यांनी यरुशलेमविषयी भविष्यवाणी केली आणि शांती नसतानाही शांती विषयी दृष्टान्त पाहिले त्यांच्याविषयी सार्वभौम याहवेह असे जाहीर करतात.” ’
17“तर आता हे मानवपुत्रा, आपल्यातील कन्या ज्या त्यांच्याच कल्पनेने भविष्य सांगतात, त्यांच्याविरुद्ध भविष्य सांग 18आणि सांग, “सार्वभौम याहवेह असे म्हणतात: ज्या स्त्रिया आपल्या मनगटांवर जादूच्या ताईत शिवून बांधतात आणि लोकांना फसविण्यासाठी आपल्या डोक्यासाठी वेगवेगळ्या लांबीचे बुरखे तयार करतात, त्या स्त्रियांचा धिक्कार असो. आपला जीव वाचवावा म्हणून तुम्ही माझ्या लोकांचा जीव पाशात टाकता काय? 19तुम्ही मूठभर जवासाठी आणि भाकरीच्या तुकड्यांसाठी माझ्या लोकांमध्ये मला अपवित्र केले आहे. जे माझे लोक लबाड्या ऐकतात, त्यांच्याशी तुम्ही खोटे बोलला आहात, ज्यांनी मरू नये अशांना तुम्ही मारून टाकले आणि ज्यांनी जगू नये अशांना तुम्ही वाचविले आहे.
20“ ‘म्हणून सार्वभौम याहवेह असे म्हणतात: जादूचे जे ताईत ज्याद्वारे तुम्ही माझ्या लोकांना पक्ष्यांसारखे फसविता, त्याविरुद्ध मी आहे आणि ते मी तुमच्या मनगटांवरून काढून टाकेन; तुम्ही पक्ष्यांप्रमाणे फसविलेल्या लोकांना मी मुक्त करेन. 21मी तुमच्या डोक्यावरील बुरखे फाडून टाकीन आणि तुमच्या हातून माझ्या लोकांना वाचवेन आणि ते आणखी तुमच्या हाताच्या सामर्थ्याला बळी पडणार नाही. तेव्हा तुम्ही जाणाल की मीच याहवेह आहे. 22कारण ज्या नीतिमानास मी दुखविले नाही, त्यांना तुम्ही तुमच्या लबाड्यांनी निराश केले आहे आणि दुष्टांनी त्यांच्या कुमार्गापासून वळू नये म्हणून तुम्ही त्यांना उत्तेजन देत त्यांचा जीव वाचविता, 23म्हणून यापुढे तुम्ही खोटे दृष्टान्त पाहणार नाही किंवा शकुन करणार नाही. माझ्या लोकांना मी तुमच्या हातून सोडवेन. तेव्हा तुम्ही जाणाल की मीच याहवेह आहे.’ ”

सध्या निवडलेले:

यहेज्केल 13: MRCV

ठळक

सामायिक करा

कॉपी करा

None

तुमचे हायलाइट तुमच्या सर्व डिव्हाइसेसवर सेव्ह करायचे आहेत? साइन अप किंवा साइन इन