YouVersion लोगो
सर्च आयकॉन

यहेज्केल 17

17
दोन गरुड आणि एक द्राक्षवेल
1याहवेहचे वचन माझ्याकडे आले: 2“हे मानवपुत्रा, एक रूपक घे आणि ते दाखला म्हणून इस्राएलच्या लोकांना सांग. 3त्यांना म्हण, ‘सार्वभौम याहवेह असे म्हणतात: ज्याचे पंख शक्तिशाली आहेत, लांब पिसांचा व निरनिराळ्या रंगाचा पिसारा असलेला एक गरुड लबानोनमध्ये आला व त्याने गंधसरूच्या टोकावरील फांदी पकडली, 4त्याने त्यावरील अगदी वरचा कोंब तोडला, तो व्यापार्‍यांच्या देशात नेला आणि तिथे विक्रेत्यांच्या शहरात लावला.
5“ ‘त्याने देशातील एक रोप घेतले आणि ते सुपीक भूमीत लावले. त्याने ते वाळुंजीप्रमाणे भरपूर पाण्याजवळ लावले, 6आणि ते फुटले, पसरट व कमी उंचीची वाढून द्राक्षवेल झाली. तिच्या फांद्या त्या गरुडाच्या दिशेने वळल्या होत्या, परंतु तिची मुळे तिच्याच खाली होती. ती एक द्राक्षवेल झाली आणि तिला पानांनी भरलेल्या फांद्या आल्या.
7“ ‘परंतु अजून एक मोठा गरुड आला, ज्याचे शक्तिशाली पंख आणि भरलेला पिसारा होता. द्राक्षवेलीने आता आपली मुळे ती जिथे लावली होती तिथून त्या गरुडाकडे पसरविली आणि पाण्यासाठी आपल्या फांद्या त्याच्याकडे लांब केल्या. 8त्या द्राक्षवेलीला पाने आणि फळ यावे व ती एक उत्कृष्ट द्राक्षवेल व्हावी म्हणून भरपूर पाणी असलेल्या चांगल्या भूमीत ती लावली गेली होती.’
9“त्यांना सांग, ‘सार्वभौम याहवेह असे म्हणतात: तिची भरभराट होईल काय? ती वाळून जावी म्हणून तिचे फळ काढून घेऊन तिला मुळापासून उपटले जाईल काय? तिची सर्व नवीन पालवी वाळून जाईल. तिला समूळ उपटण्यासाठी ना मजबूत हात लागणार ना पुष्कळ लोकांची गरज लागणार. 10तिला लावले तर आहे, पण तिची भरभराट होईल काय? पूर्वेकडील वारा तिला लागला म्हणजे ती पूर्णपणे वाळून—ज्या ठिकाणी वाढली त्याच ठिकाणी ती वाळणार नाही काय?’ ”
11तेव्हा याहवेहचे वचन माझ्याकडे आले: 12“बंडखोर लोकांना सांग, ‘या गोष्टींचा अर्थ तुम्हाला माहीत नाही काय?’ त्यांना सांग: ‘बाबेलचा राजा यरुशलेमात गेला आणि तिचा राजा व सरदारांना घेऊन त्याच्याबरोबर परत बाबिलोनात आणले. 13मग त्याने राजघराण्यातील एक सदस्य घेतला व त्याच्याशी करार केला आणि त्याला शपथेत बांधले. त्याने देशातील प्रमुख पुरुषांना देखील नेले, 14म्हणजे राज्याचा पडाव होऊन ते पुन्हा उठू शकणार नाही आणि केवळ त्याचा करार पाळूनच वाचेल. 15परंतु राजाने त्याच्याविरुद्ध बंड केले आणि आपले घोडे व मोठे सैन्य आणण्यासाठी इजिप्तला त्याचे राजदूत पाठवले. तो यशस्वी होईल काय? अशा प्रकारचे काम करणारा वाचेल काय? करार तोडला तरी वाचेल काय?
16“ ‘सार्वभौम याहवेह जाहीर करतात, माझ्या जिवाची शपथ, तो बाबेलमध्ये, ज्याने त्याला राजासनावर बसविले, ज्याची शपथ त्याने तुच्छ मानली आणि ज्याचा करार त्याने मोडला, त्याच राजाच्या देशात तो मरेल. 17पुष्कळ जिवांचा नाश करण्यासाठी जेव्हा मोर्चे बांधतील व बुरूज उभारतील, तेव्हा फारोह त्याच्या बलवान सैन्य व मोठ्या जमावाच्या मदतीने त्या युद्धात त्याचे साहाय्य करू शकणार नाही. 18त्याने करार मोडून शपथ तुच्छ मानली आहे. कारण त्याने हातात हात देऊन प्रतिज्ञा केली आणि तरीही त्याने या सर्व गोष्टी केल्या, त्याचा निभाव होणार नाही.
19“ ‘म्हणून सार्वभौम याहवेह असे म्हणतात: माझ्या जिवाची शपथ, माझी शपथ तुच्छ मानली व माझा करार मोडला, म्हणून मी त्याचा न्याय करेन. 20त्याच्यासाठी मी माझे जाळे पसरवीन आणि तो त्या पाशात पकडला जाईल. मी त्याला बाबेलमध्ये आणेन आणि तिथे त्याच्यावर न्याय आणेन कारण तो माझ्याशी अविश्वासू राहिला. 21त्याचे सर्व उत्तम सैन्य तलवारीने पडेल आणि त्यातून जे वाचतील ते वार्‍याच्या दिशेने पसरतील. तेव्हा तुम्ही जाणाल की मी याहवेह हे बोललो आहे.
22“ ‘सार्वभौम याहवेह असे म्हणतात: मी एका गंधसरूचा सर्वात उंच शेंडा घेऊन तो लावेन; मी त्याचा अगदी वरचा लवचिक शेंडा तोडेन आणि तो सर्वात उंच व मोठ्या पर्वतावर लावेन. 23इस्राएलच्या उंच पर्वतावर मी तो लावेन; त्याला फांद्या फुटतील व ते फळ देईल आणि ते वैभवी गंधसरू बनेल. प्रत्येक प्रकारचे पक्षी त्यात घरटे बनवतील; त्यांना त्या गंधसरूच्या फांद्यांच्या छायेत आसरा मिळेल. 24रानातील सर्व झाडे जाणतील की मी याहवेह उंच झाडांना वाकवितो आणि वाकलेल्या झाडांना उंच वाढवतो. हिरव्या झाडांना मी वाळवितो आणि वाळलेल्या झाडांना भरभराटीस आणतो.
“ ‘मी याहवेह हे बोललो आहे आणि मी हे करणारच.’ ”

सध्या निवडलेले:

यहेज्केल 17: MRCV

ठळक

सामायिक करा

कॉपी करा

None

तुमचे हायलाइट तुमच्या सर्व डिव्हाइसेसवर सेव्ह करायचे आहेत? साइन अप किंवा साइन इन