YouVersion लोगो
सर्च आयकॉन

यहेज्केल 37

37
शुष्क हाडांचे खोरे
1याहवेहचा हात माझ्यावर होता आणि त्यांनी मला याहवेहच्या आत्म्याच्या द्वारे बाहेर आणले आणि खोर्‍याच्या मधोमध ठेवले; ते हाडांनी भरलेले होते. 2त्याने मला त्यातून चहूकडून फिरविले आणि मी पाहिले की खोर्‍याच्या भूमीवर पुष्कळ हाडे होती, ती हाडे तर शुष्क होती. 3याहवेहने मला विचारले, “मानवपुत्रा, ही हाडे जिवंत होतील काय?”
मी म्हणालो, “सार्वभौम याहवेह, ते तर केवळ तुम्हीच जाणता.”
4तेव्हा याहवेहने मला म्हटले, “या हाडांना भविष्यवाणी करून त्यांना सांग, ‘शुष्क हाडांनो, याहवेहचे वचन ऐका! 5या हाडांना सार्वभौम याहवेह म्हणतात: मी तुमच्यात श्वास#37:5 या इब्री शब्दाचा दुसरा अर्थ वारा किंवा आत्मा घालेन आणि तुम्ही जिवंत व्हाल. 6मी तुम्हावर स्नायू लावेन आणि तुम्हावर मांस चढवेन आणि तुम्हाला कातडीने आच्छादेन; मी तुम्हामध्ये श्वास घालेन आणि तुम्ही जिवंत व्हाल. तेव्हा तुम्ही जाणाल की मीच याहवेह आहे.’ ”
7तेव्हा मला आज्ञा झाल्याप्रमाणे मी भविष्यवाणी केली. आणि मी भविष्यवाणी करीत असता, मोठा आवाज, खडखडाट झाला, तेव्हा एक हाड दुसऱ्या हाडाशी, अशी हाडे एकत्र जडली. 8तेव्हा मी पाहिले, स्नायू आणि मांस त्यांच्यावर आले आणि कातडीने त्यांना आच्छादले, पण त्यांच्यात श्वास नव्हता.
9तेव्हा याहवेहने मला म्हटले, “श्वासाला भविष्य करून सांग; मानवपुत्रा, भविष्यवाणी कर आणि त्याला सांग, ‘सार्वभौम याहवेह असे म्हणतात: हे श्वासा, चारही बाजूंनी ये आणि या वधलेल्यांवर फुंकर घाल, म्हणजे ते जिवंत होतील.’ ” 10याहवेहने मला आज्ञा केल्याप्रमाणे मी भविष्यवाणी केली आणि श्वास त्यांच्यात आला; ते जिवंत झाले आणि एक मोठे सैन्य त्यांच्या पायांवर उभे राहिले.
11तेव्हा याहवेहने मला म्हटले: “मानवपुत्रा, ही हाडे म्हणजे इस्राएली लोक आहेत. ते म्हणतात, ‘आमची हाडे शुष्क झाली आहेत आणि आमची आशा नाहीशी झाली आहे; आम्ही नाश पावलो आहोत.’ 12यास्तव भविष्यवाणी कर आणि त्यांना सांग: ‘सार्वभौम याहवेह असे म्हणतात: माझ्या लोकांनो मी तुमच्या कबरा उघडून त्यातून तुम्हाला बाहेर काढणार आहे; मी तुम्हाला इस्राएल देशात परत आणेन. 13जेव्हा मी तुमच्या कबरा उघडेन आणि त्यातून तुम्हाला बाहेर आणेन तेव्हा तुम्ही जाणाल की मीच याहवेह आहे. 14मी माझा आत्मा तुमच्यात घालेन आणि तुम्ही जिवंत व्हाल आणि मी तुम्हाला तुमच्या देशात स्थायिक करेन. तेव्हा तुम्ही जाणाल की मी याहवेह जे बोललो आहे, तेच मी केले आहे, असे याहवेह जाहीर करतात.’ ”
एक राष्ट्र, एक राजा
15याहवेहचे वचन माझ्याकडे आले: 16“मानवपुत्रा, लाकडाची एक काठी घे आणि त्यावर लिही, ‘यहूदाह व त्याच्या सोबतीच्या इस्राएली लोकांचे.’ मग लाकडाची आणखी एक काठी घे आणि त्यावर लिही, ‘योसेफ (म्हणजेच एफ्राईम) आणि त्याच्या सोबतीच्या सर्व इस्राएली लोकांचे.’ 17या दोन काठ्यांना जोडून ती एक काठी दिसेल अशी ती तुझ्या हातात धर.
18“जेव्हा तुझे लोक तुला विचारतील, ‘याचा अर्थ काय आहे हे तू आम्हाला सांगणार नाही काय?’ 19त्यांना सांग, ‘सार्वभौम याहवेह असे म्हणतात: योसेफाची काठी; जी एफ्राईमच्या हातात आहे तिला व इस्राएलचे जे लोक त्याचे सोबती आहेत, त्यांना मी घेऊन यहूदीयाच्या काठीशी जोडीन. मी त्यांना लाकडाची एक काठी करेन आणि ते माझ्या हातात एक होतील.’ 20ज्या काठ्यांवर तू लिहिले त्या काठ्या त्यांच्या नजरेसमोर धर 21आणि त्यांना सांग, ‘सार्वभौम याहवेह असे म्हणतात: इस्राएली लोक ज्या राष्ट्रांमध्ये गेले आहेत, तिथून मी त्यांना बाहेर काढेन. चहूकडून मी त्यांना एकवटेन आणि त्यांना स्वदेशात आणेन. 22मी त्यांना या देशात, इस्राएलच्या पर्वतांवर एक राष्ट्र असे करेन. त्या सर्वांवर एक राजा असणार आणि ते यापुढे दोन राष्ट्र नसतील किंवा ते दोन राज्यांमध्ये विभागले जाणार नाहीत. 23आणि ते पुन्हा त्यांच्या मूर्तींनी व अमंगळ प्रतिमांनी किंवा त्यांच्या पातकांनी यापुढे स्वतःला भ्रष्ट करणार नाहीत, कारण त्यांच्या सर्व पापमय घसरणीपासून#37:23 काही इब्री मूळ प्रतींनुसार त्यांची निवासस्थाने जिथून त्यांनी पाप केले. मी त्यांना वाचवेन आणि मी त्यांना शुद्ध करेन. ते माझे लोक होतील आणि मी त्यांचा परमेश्वर होईन.
24“ ‘माझा सेवक दावीद, त्यांच्यावर राजा होईल, आणि त्या सर्वांना एकच मेंढपाळ असेल. ते माझ्या नियमांचे अनुसरण करतील आणि माझे विधी काळजीपूर्वक पाळतील. 25माझा सेवक याकोबाला मी दिलेल्या देशात, जिथे तुमचे पूर्वज राहिले तिथे ते राहतील. ते व त्यांची लेकरे आणि त्यांच्या लेकरांची लेकरे सर्वकाळ तिथे राहतील आणि माझा सेवक दावीद सर्वकाळासाठी त्यांचा राजपुत्र असेल. 26मी त्यांच्याशी शांतीचा करार करेन; तो सर्वकाळचा करार असेल. मी त्यांना स्थापित करेन आणि त्यांची संख्या बहुगुणित करेन, आणि मी माझे पवित्रस्थान सर्वकाळासाठी त्यांच्यात ठेवेन. 27माझे निवासस्थान त्यांच्याबरोबर राहील; मी त्यांचा परमेश्वर होईन आणि ते माझे लोक होतील. 28जेव्हा माझे पवित्रस्थान सदासर्वकाळ त्यांच्यामध्ये राहील, तेव्हा सर्व राष्ट्रे जाणतील की मी याहवेह इस्राएलला पवित्र करतो.’ ”

सध्या निवडलेले:

यहेज्केल 37: MRCV

ठळक

सामायिक करा

कॉपी करा

None

तुमचे हायलाइट तुमच्या सर्व डिव्हाइसेसवर सेव्ह करायचे आहेत? साइन अप किंवा साइन इन