YouVersion लोगो
सर्च आयकॉन

यहेज्केल 6

6
इस्राएलच्या पर्वतांचा नाश
1याहवेहचे वचन माझ्याकडे आले: 2“हे मानवपुत्रा, इस्राएलच्या पर्वतांकडे आपले मुख कर; आणि त्यांच्याविरुद्ध भविष्य सांग 3आणि सांग: ‘अहो इस्राएलच्या पर्वतांनो, तुम्ही सार्वभौम याहवेहचे वचन ऐका. सार्वभौम याहवेह पर्वतांना व डोंगरांना, झर्‍यांना व दर्‍यांना असे म्हणतात: मी तुमच्याविरुद्ध तलवार आणेन, आणि मी तुमची उंचावरील पूजास्थाने नष्ट करेन. 4तुमच्या वेद्या फोडल्या जातील आणि तुमच्या धुपांच्या वेद्यांचा चुराडा करण्यात येईल; आणि तुमच्या मूर्तींपुढे तुमच्या लोकांना मी जिवे मारीन. 5इस्राएली लोकांची प्रेते मी त्यांच्या मूर्तींपुढे टाकीन आणि तुमची हाडे मी तुमच्या वेद्यांपुढे पसरवून टाकीन. 6तुम्ही जिथे वस्ती कराल, ती नगरे ओसाड होतील आणि तेथील उच्च स्थाने उद्ध्वस्त होतील, यासाठी की तुमच्या वेद्या ओसाड होऊन नष्ट होतील, तुमच्या मूर्तींचा चुराडा होऊन भुगा होतील, तुमच्या धुपांच्या वेद्या पाडल्या जातील आणि तुम्ही जे काही बनविले ते सर्व पुसून टाकल्या जातील. 7तुमचे लोक तुमच्यामध्ये मारून पाडले जाईल आणि तुम्ही जाणाल की मीच याहवेह आहे.
8“ ‘परंतु मी काहींना वाचवेन, कारण जेव्हा तुम्ही देशात व राष्ट्रात पांगविले जाल तेव्हा तुमच्यातील काही तलवारीपासून वाचतील. 9मग ज्या राष्ट्रांमध्ये ते निर्वासित म्हणून जातील व जे वाचतील ते माझे स्मरण करतील; त्यांचे व्यभिचारी हृदय, जे माझ्यापासून दूर वळले आहे आणि त्यांचे डोळे, जे त्यांच्या मूर्तीमागच्या वासनांनी पेटले आहे, त्याने मला किती दुःखी केले. त्यांनी जी वाईट कृत्ये केली आणि त्यांच्या अमंगळ कृत्यांमुळे ते स्वतःचीच घृणा करतील. 10आणि ते जाणतील की मीच याहवेह आहे; त्यांच्यावर हे अरिष्ट आणेन अशी धमकी मी निरर्थकच दिली नाही.
11“ ‘सार्वभौम याहवेह असे म्हणतात: इस्राएली लोकांच्या सर्व दुष्ट व अमंगळ कृत्यांसाठी तुमचे हात एकमेकांवर मारा आणि “अरेरे!” असे म्हणत तुमचे पाय आपटून रडा, कारण ते तलवार, दुष्काळ व पीडा यांनी पडतील. 12जो दूर असेल तो पीडेने मरेल आणि जो जवळ आहे तो तलवारीने मरेल आणि जो त्यातून वाचेल तो दुष्काळाने मरेल. याप्रकारे मी त्यांच्यावर माझा क्रोध ओतेन. 13त्यांच्या मूर्तीसमोर, त्यांच्या वेद्यांभोवती, प्रत्येक उंच टेकड्यांवर व सर्व डोंगरमाथ्यांवर, प्रत्येक गडद सावलीच्या झाडाखाली आणि दाट पाने असलेल्या प्रत्येक एला वृक्षाखाली; ज्या ठिकाणी त्यांनी त्यांच्या सर्व मूर्तींना सुवासिक धूप अर्पण केले, जेव्हा त्यांचे लोक तिथेच पडतील, तेव्हा ते जाणतील की मीच याहवेह आहे. 14मी आपला हात त्यांच्याविरुद्ध उगारेन आणि दिबलाहच्या#6:14 काही इब्री मूळ प्रतींनुसार रिबलाह वाळवंटापासून ते जिथे कुठे राहतील मी त्यांचा देश ओसाड करेन; तेव्हा ते जाणतील की मीच याहवेह आहे.’ ”

सध्या निवडलेले:

यहेज्केल 6: MRCV

ठळक

सामायिक करा

कॉपी करा

None

तुमचे हायलाइट तुमच्या सर्व डिव्हाइसेसवर सेव्ह करायचे आहेत? साइन अप किंवा साइन इन