5
दारयावेश राजाला ततनइचे पत्र
1आता यरुशलेम व यहूदीया येथे हाग्गय संदेष्टा आणि इद्दोचा वंशज जखर्याह संदेष्टा, यांनी आता यहूदीया आणि यरुशलेममधील यहूदी लोकांसाठी त्यांच्यावर असलेले इस्राएलचे परमेश्वराच्या नावाने भविष्यवाणी केली. 2मग शल्तीएलचा पुत्र जरूब्बाबेल व योसादाकाचा पुत्र येशूआ यांनी यरुशलेमातील परमेश्वराच्या मंदिराच्या पुनर्बांधणीचे काम सुरू केले. आणि परमेश्वराच्या संदेष्ट्यांनी त्यांच्याबरोबर राहून त्यांना साहाय्य केले.
3परंतु फरातच्या#5:3 फरातच्या किंवा ज्याला आजच्या काळात युफ्रेटिस या नावाने ओळखले जाते पश्चिमेकडील प्रदेशाचे राज्यपाल ततनइ आणि शथर-बोजनइ व त्यांचे सोबती यरुशलेमात आले व त्यांनी विचारले, “हे मंदिर पुनर्बांधणीची व पूर्ण करण्याची परवानगी तुम्हाला कोणी दिली?” 4त्यांनी हे देखील विचारले, “मंदिर बांधण्याचे काम करणार्या सर्व लोकांची नावे काय आहेत?” 5पण त्यांच्या परमेश्वराची नजर यहूदी वडीलजन त्यांच्यावर होती, दारयावेश राजा त्याचे उत्तर देईपर्यंत त्यांचे काम त्यांना थांबविता आले नाही.
6फरात नदीपलीकडील प्रदेशाचे राज्यपाल ततनइ, शथर-बोजनइ आणि त्यांचे सहकारी यांनी दारयावेश राजाला जे पत्र पाठविले त्याचा मजकूर असा होता: 7त्यांनी जे पत्र पाठविले ते असे:
दारयावेश महाराज,
आपणास आमच्या शुभेच्छा!
8आमची राजाला हे कळविण्याची इच्छा आहे की, आम्ही यहूदीयाच्या महान परमेश्वराच्या मंदिराच्या पुनर्बांधणीच्या जागी गेलो. ते मंदिर मोठमोठ्या पाषाणांनी बांधले जात आहे आणि भिंतीत लाकडे घातली जात आहेत. त्यांच्या देखरेखीखाली बांधकामाची अतिशय उत्साहाने आणि यशस्वी रीतीने प्रगती होत आहे.
9आम्ही पुढार्यांना विचारले, “या मंदिराची पुनर्बांधणीची करून ते पूर्ण करण्याची परवानगी तुम्हाला कोणी दिली?” 10आम्ही त्यांची नांवे विचारली, कारण आम्ही त्यांच्या पुढाऱ्यांची नावे लिहून तुमच्या माहिती करिता तुम्हास कळवावी.
11त्यांनी आम्हाला असे उत्तर दिले:
“आम्ही स्वर्ग आणि पृथ्वीच्या परमेश्वराचे सेवक आहोत. या ठिकाणी पुष्कळ शतकांपूर्वी एका महान इस्राएली राजाने जे मंदिर बांधून पूर्ण केले होते, त्याची आम्ही पुनर्बांधणी करीत आहोत. 12कारण आमच्या पूर्वजांनी स्वर्गाच्या परमेश्वराला संतप्त केले, म्हणून त्यांनी आमच्या लोकांना बाबेलचा खाल्डियन राजा नबुखद्नेस्सरच्या अधीन केले, ज्याने मंदिराचाही नाश केला व लोकांना बाबेलच्या बंदिवासात नेले.
13“बाबेलच्या कोरेश राजाने त्याच्या कारकिर्दीच्या पहिल्या वर्षी हे परमेश्वराचे मंदिर बांधले जावे असा हुकूम केला. 14नबुखद्नेस्सर राजाने परमेश्वराच्या मंदिराची जी सोन्याचांदीची पात्रे यरुशलेमाच्या मंदिरातून काढून नेली व बाबेलच्या मंदिरात#5:14 किंवा राजवाड्यात ठेवली होती, ती कोरेश राजाने परत केली. ती पात्रे त्याने नेमलेला यहूदाहचा राज्यपाल शेशबस्सरच्या ताब्यात दिली. 15त्याने त्याला सूचना दिली, ‘ही पात्रे घ्यावी आणि यरुशलेमच्या मंदिरात ठेवावी. परमेश्वराचे मंदिर पूर्वी होते त्याच ठिकाणी पुन्हा बांधले जावे.’
16“म्हणून शेशबस्सर आला व त्याने यरुशलेमच्या मंदिराची पायाभरणी केली त्या वेळेपासून लोक मंदिराचे बांधकाम करीत आहेत, पण ते अद्यापही पूर्ण झालेले नाही.”
17आम्ही विनंती करतो की बाबेलचे राजकीय दप्तर तपासले जावे व कोरेश राजाने परमेश्वराच्या मंदिराची यरुशलेममध्ये पुनर्बांधणी करावी अशी आज्ञा दिली होती की नाही हे पाहावे व मग आपली या प्रकरणी काय इच्छा आहे हे आम्हाला कळवावे.