YouVersion लोगो
सर्च आयकॉन

एज्रा 6

6
दारयावेश राजाचा हुकूम
1म्हणून दारयावेश राजाने आज्ञा दिली की, जिथे कागदपत्रे राखून ठेवली जात त्या बाबेलच्या दप्तरखान्यात कसून शोध केला जावा. 2शेवटी त्या चर्मपत्राची गुंडाळी मेदिया प्रांतातील अखमथा नगरातील राजवाड्यात सापडली, त्यात असे लिहिले होते:
लेखात म्हटले होते:
3कोरेश राजाच्या कारकिर्दीच्या पहिल्या वर्षी, यरुशलेम येथील परमेश्वराच्या मंदिरासंबंधी एक हुकूमनामा पाठविला गेला होता:
तिथे अर्पणे करण्याकरिता ते मंदिर परत बांधले जावे आणि त्याची पायाभरणी करावी. त्याची उंची साठ हात व रुंदी साठ हात#6:3 अंदाजे 27 मीटर असावी. 4पायांमध्ये मोठ्या दगडांचे तीन थर असतील व त्यांच्यावर एक लाकडाचा थर असेल. त्याचा सर्व खर्च राजकीय खजिन्यातून दिला जाईल; 5आणि जी सोन्याचांदीची पात्रे नबुखद्नेस्सर राजाने परमेश्वराच्या मंदिरातून बाबेलला नेली होती, ती सर्व यरुशलेमला परत नेण्यात येतील व पूर्वीसारखी परमेश्वराच्या मंदिरात ठेवली जातील.
6म्हणून फरात नदीच्या पलीकडील प्रदेशाचे राज्यपाल ततनइ, शथर-बोजनइ आणि त्या प्रदेशाच्या इतर अधिकाऱ्यांना सांगण्यात येते की, या स्थानापासून दूर राहा. 7परमेश्वराच्या मंदिराच्या बांधकामात अडथळे आणू नका. यहूदीयाचा राज्यपाल आणि इतर यहूदी पुढाऱ्यांनी पूर्वीच्याच जागेवर ते मंदिर बांधावे.
8एवढेच नव्हे, तर परमेश्वराच्या मंदिराच्या बांधकामाकरिता यहूद्यांच्या मदतीसाठी हे करण्याची मी तुम्हाला आज्ञा देतो:
मंदिर बांधण्यास येणारा सर्व खर्च फरात नदीच्या पलीकडील प्रदेशाच्या राजकीय खजिन्यातून त्यांच्या मागणीनुसार देण्यात यावा, जेणेकरून कामास विलंब होणार नाही. 9स्वर्गातील परमेश्वराला होमार्पणे करण्यासाठी गोर्‍हे, मेंढरे व कोकरे द्यावीत, आणखी त्यांना गहू, द्राक्षारस, मीठ आणि जैतुनाचे तेल हे पदार्थ यरुशलेमातील याजकांच्या मागणीनुसार प्रत्येक दिवशी न चुकता द्यावेत. 10मग ते त्यांच्या स्वर्गातील परमेश्वराला मान्य होतील अशी अर्पणे देऊ शकतील आणि राजा व त्याच्या पुत्रांच्या कल्याणासाठी प्रार्थना करू शकतील.
11कोणी या संदेशातील मजकूर कोणत्याही प्रकारे बदलण्याचा प्रयत्न करेल, तर त्याच्या घराच्या तुळया उपसून काढल्या जातील व त्या तुळयांवर त्याला फाशी देण्यात येईल आणि त्याच्या घराचा उकिरडा केला जाईल. 12ज्या परमेश्वराने त्यांच्या नावाचे वसतिस्थान व्हावे यासाठी यरुशलेम नगरी निवडली आहे, ते हा हुकूम बदलणार्‍या व मंदिराचा नाश करणार्‍या कोणत्याही राजाचा आणि लोकांचा सर्वनाश करतील.
मी, दारयावेशने हे फर्मान काढले आहे व त्याची अंमलबजावणी तत्परतेने व्हावी.
कार्यसमाप्ती व मंदिराचे समर्पण
13फरात नदीच्या पलीकडील प्रदेशाचा राज्यपाल ततनइ, शथर-बोजनइ आणि त्यांच्या अधिकाऱ्यांनी दारयावेश राजाच्या या हुकुमाची अंमलबजावणी तातडीने केली. 14म्हणून यहूदी पुढार्‍यांनी त्यांचे काम पुढे चालविले आणि त्यांना संदेष्टा हाग्गय व इद्दोचा पुत्र जखर्‍याहच्या उपदेशामुळे चांगलेच प्रोत्साहन मिळाले. शेवटी इस्राएलाच्या परमेश्वराच्या आज्ञेप्रमाणे व पर्शियाचे राजे, कोरेश, दारयावेश आणि अर्तहशश्त यांच्या फर्मानाप्रमाणे मंदिराचे काम पूर्ण झाले. 15दारयावेश राजाच्या कारकिर्दीच्या सहाव्या वर्षी, अदार महिन्याच्या तिसऱ्या दिवशी हे काम पूर्ण झाले.
16याजकांनी, लेव्यांनी व सर्व इस्राएली लोकांनी अत्यंत हर्षाने मंदिराचा समर्पणविधी साजरा केला. 17या समर्पणविधीमध्ये शंभर बैल, दोनशे मेंढे आणि चारशे नरकोकरे अर्पण केली गेली, आणि इस्राएलांच्या बारा वंशासाठी बारा बोकडे पापार्पण म्हणून बळी दिले गेले. 18मग त्यांनी मोशेच्या नियमशास्त्रात सांगितल्याप्रमाणे यरुशलेममध्ये परमेश्वराची सेवा करण्यासाठी आपआपल्या विभागांसाठी याजक आणि लेवींचीही नियुक्ती केली.
वल्हांडण सण
19वल्हांडण सण पहिल्या महिन्याच्या चौदाव्या दिवशी साजरा करण्यात आला. 20तोपर्यंत याजक आणि लेवी यांनी विधीनियमाप्रमाणे स्वतःला शुद्ध करून घेतले होते. लेव्यांनी वल्हांडण सणाच्या अर्पणासाठी बंदिवासातून परत आलेल्या लोकांसाठी आणि याजकांसाठी व स्वतःसाठी वल्हांडणाची मेंढरे वधली. 21बंदिवासातून परत आलेल्या यहूदी आणि यहूदीयात वस्ती करून राहिलेले इस्राएली लोक मूर्तिपूजक परकीय लोकांच्या अशुद्ध चालीरीतींना सोडून, याहवेह परमेश्वराच्या भक्तीमध्ये सामील झाले. 22बेखमीर भाकरीचा सण सात दिवस हर्षभराने पाळण्यात आला. सर्व देशभर आनंदोत्सव होता, कारण याहवेहने अश्शूरच्या राजाला इस्राएलाशी कनवाळूपणे वागण्यास आणि इस्राएलाच्या परमेश्वराच्या मंदिराच्या बांधकामामध्ये मदत करण्यास प्रवृत्त केले.

सध्या निवडलेले:

एज्रा 6: MRCV

ठळक

सामायिक करा

कॉपी करा

None

तुमचे हायलाइट तुमच्या सर्व डिव्हाइसेसवर सेव्ह करायचे आहेत? साइन अप किंवा साइन इन