8
एज्राबरोबर परतलेल्या कुलप्रमुखांची यादी
1अर्तहशश्त राजाच्या कारकिर्दीत, बाबेलहून माझ्याबरोबर आलेल्या पुढार्यांची नावे व वंशावळी येणेप्रमाणे आहे:
2फिनहासाच्या कुळातील:
गेर्षोम;
इथामाराच्या कुळातील:
दानीएल;
दावीदाच्या कुळातील:
हट्टूश 3हा शखन्याहच्या कुळातील;
पारोशच्या कुळातील:
जखर्याह व त्याच्याबरोबर 150 पुरुषांची नोंदणी झाली;
4पहथ-मोआबच्या कुळातील:
जरह्याहचा पुत्र एलिओएनाइ व इतर 200 पुरुष;
5जट्टूच्या कुळातील:
यहजिएलाचा पुत्र शखन्याह व इतर 300 पुरुष;
6आदीनाच्या कुळातील:
योनाथानाचा पुत्र एबेद व इतर 50 पुरुष;
7एलामाच्या कुळातील:
अथल्याहचा पुत्र यशायाह व इतर 70 पुरुष;
8शफाट्याहच्या कुळातील:
मिखाएलचा पुत्र जबद्याह व इतर 80 पुरुष;
9योआबाच्या कुळातील:
यहीएलाचा पुत्र ओबद्याह व इतर 218 पुरुष;
10बानीच्या कुळातील:
योसिफ्याचा पुत्र शेलोमीथ व इतर 160 पुरुष;
11बेबाई कुळातील:
बेबाईचा पुत्र जखर्याह व इतर 28 पुरुष;
12अजगादाच्या कुळातील:
हक्काटानाचा पुत्र योहानान व इतर 110 पुरुष;
13अदोनिकामच्या कुळातील:
शेवटचे लोक ज्यांची नावे एलिफेलेत, ईयेल व शमायाह होते, आणि त्यांच्याबरोबर इतर 60 पुरुष;
14बिग्वईच्या कुळातील:
ऊथय व जक्कूर आणि इतर 70 पुरुष.
यरुशलेमला परतणे
15अहवाकडे जाणाऱ्या कालव्याजवळ मी सर्वांना एकत्र केले आणि तिथे तीन दिवस आम्ही तळ दिला. तिथे आलेल्या लोकांची व याजकांची पाहणी केली, तेव्हा लेवी वंशातील कोणीही मला आढळला नाही. 16म्हणून मी निरोप पाठवून एलिएजर, अरीएल, शमायाह, एलनाथान, यारीब, एलनाथान, नाथान, जखर्याह आणि मशुल्लाम या लेवी पुढार्यांना बोलाविले. मी योयारीब व एलनाथान या दोघा शिक्षकांनाही बोलाविणे पाठविले. 17मी त्यांना कासिफ्या नावाच्या ठिकाणी असलेल्या यहूद्यांचा पुढारी इद्दो आणि मंदिरात काम करणारे त्याचे लेवीबंधू याजकडे अशी विनंती करण्यासाठी पाठविले की त्यांनी यरुशलेमातील आमच्या परमेश्वराच्या मंदिरातील सेवेसाठी सेवेकरी पाठवावेत. 18परमेश्वराच्या कृपेचा हात आमच्यावर असल्याने त्यांनी आम्हाकडे इस्राएलचा पुत्र लेवीचा वंशज, महलीचा पुत्र शेरेब्याह नावाचा एक सुज्ञ मनुष्य पाठविला. त्याच्याबरोबर त्याचे पुत्र व भाऊ मिळून एकूण 18 जण होते. 19हशब्याहसह मरारीचा वंशज यशायाहलाही त्याचे पुत्र व बंधू अशा 20 जणांसह पाठविले. 20दावीदाने व अधिकार्यांनी जे लेव्यांच्या सेवेसाठी नेमले होते, असे 220 मंदिरसेवकही आणले, ज्यांची नांवे नोंदण्यात आली.
21आम्ही अहवा कालव्याच्या किनारी असतानाच मी जाहीर केले की सर्वांनी उपवास करावा, म्हणजे आपल्या परमेश्वरासमोर आपण स्वतःला नम्र करून, त्यांनी आमचे व आमच्या मुलाबाळांचे व मालमत्तेचे प्रवासात संरक्षण करावे अशी प्रार्थना करावी. 22कारण प्रवासात शत्रूपासून संरक्षण मिळावे म्हणून राजाजवळ सैनिक व स्वार मागण्याची मला लाज वाटली. आम्ही राजाला आधीच सांगितले होते, “जे आमच्या परमेश्वराची भक्ती करतात, त्यांचा वरदहस्त त्यांच्यावर असतो आणि जे त्यांना सोडतात, त्यांच्यावरच अरिष्ट येते.” 23म्हणून आम्ही उपास केला आणि आमची काळजी घेण्याबद्दल परमेश्वराची प्रार्थना केली आणि त्यांनी आमचे रक्षण केले.
24मी याजकातून बारा पुढार्यांची नेमणूक केली ते शेरेब्याह, हशब्याह व इतर दहा याजकबंधू होते. 25राजा, त्याचे कारभारी मंडळ, पुढारी आणि इस्राएली लोक यांनी परमेश्वराच्या मंदिरासाठी अर्पण केलेले सोने, चांदी, सोन्याची पात्रे व इतर वस्तू मोजून दिले व ते यरुशलेमला नेण्याची जबाबदारी मी त्या बारा पुढार्यांवर टाकली. 26याप्रकारे मी त्यांचे वजन केले, 650 तालंत#8:26 अंदाजे 22 मेट्रिक टन चांदी, 100 तालंत चांदीची पात्रे, 100 तालंत#8:26 अंदाजे 3.4 मेट्रिक टन सोने, 271,000 दारिक#8:27 अंदाजे 8.4 कि.ग्रॅ. वजनाचे वीस सोन्याचे कटोरे व उज्वल कास्याचे, सोन्याइतकेच मोलाचे दोन सुंदर कटोरेही होते.
28मग मी त्यांना म्हणालो, “तुम्ही, तसेच याहवेह आमच्या पूर्वजांच्या परमेश्वराला वाहिलेली स्वैच्छिक अर्पणे म्हणजे सोने चांदी व सोन्याचांदीची पात्रे याहवेह परमेश्वराला समर्पित केलेली आहेत. 29हे सर्व साठे याहवेहच्या मंदिराच्या भांडारात ठेवण्याकरिता तोलून यरुशलेमात नेतृत्व करीत असलेले याजक, लेवी व इस्राएलचे वडीलजन यांच्या स्वाधीन करण्याआधी यांचे काळजीपूर्वकरित्या रक्षण करा.” 30तेव्हा याजक आणि लेवींनी तोलून दिलेले चांदी, सोने व पवित्र पात्रे यरुशलेमातील परमेश्वराच्या मंदिरात पोचविण्याची जबाबदारी स्वीकारली.
31पहिल्या महिन्याच्या बाराव्या दिवशी अहवा कालव्यापासून तळ उठवून आम्ही यरुशलेमकडे निघालो. आमच्या परमेश्वराचा वरदहस्त आम्हावर होता आणि वाटेत त्यांनी शत्रू व लुटारू यांच्यापासून आमचे रक्षण केले. 32अशा तर्हेने आम्ही यरुशलेमला पोहोचलो, तिथे तीन दिवस विश्रांती घेतली.
33चवथ्या दिवशी उरीयाह पुत्र मरेमोथ याजकाच्या हाती, फिनहासाचा पुत्र एलअज़ार, येशूआचा पुत्र योजाबाद आणि बिन्नुईचा पुत्र नोअद्याह हे लेवी देखील त्याच्यासह असून रुपे, सोने व इतर मोलवान वस्तू यांचे परमेश्वराच्या मंदिरात वजन करून सोपविले. 34प्रत्येक वस्तूची संख्या व वजन मोजण्यात आले आणि त्यावेळी त्या वजनाची नोंद करण्यात आली.
35नंतर आमच्या पथकातील प्रत्येकाने इस्राएलाच्या परमेश्वराला पुढील होमार्पणे केली: इस्राएली राष्ट्रासाठी बारा गोर्हे, शहाण्णव एडके, सत्याहत्तर नरकोकरे आणि पापार्पण म्हणून बारा बोकडे. हे सर्व याहवेहस होमार्पण म्हणून वाहण्यात आले. 36नंतर फरात नदीच्या पश्चिमेस असलेल्या सर्व प्रांताच्या प्रांतप्रमुखांना व राज्यपालांना राजाची फर्माने देण्यात आली. मग अर्थात्, त्यांनी परमेश्वराचे मंदिर पुन्हा बांधण्याच्या कार्यात आमच्याशी सहकार्य केले.