2
इतर प्रेषित पौलाचा स्वीकार करतात
1नंतर चौदा वर्षानंतर मी पुन्हा यरुशलेम येथे गेलो, यावेळेस बर्णबास माझ्याबरोबर होता. मी तीतालाही आमच्याबरोबर घेतले. 2मला प्राप्त झालेल्या प्रकटीकरणाचा प्रतिसाद म्हणून मी तिथे गेलो आणि तेथील प्रतिष्ठित पुढार्यांची एकांतात भेट घेऊन त्यांना ती शुभवार्ता सांगितली, ज्या शुभवार्तेचा प्रचार मी गैरयहूदीयांमध्ये करीत आहे. मला खात्री करून घ्यायची होती की, मी व्यर्थ धावत नव्हतो आणि माझी धडपड मी काही व्यर्थपणे करीत आलेलो नव्हतो. 3माझ्याबरोबर असलेला तीतस ग्रीक होता, तरी त्याची सुंता झाली पाहिजे असा आग्रह त्यांनी धरला नाही. 4हा प्रश्न खोट्या विश्वासणार्यांमुळेच उद्भवला कारण ख्रिस्त येशूंमध्ये आम्हाला जे स्वातंत्र्य आहे, त्याचा शोध घेण्यासाठी आणि आम्हाला गुलाम बनविण्यासाठी काही खोटे विश्वासणारे आमच्यामध्ये घुसले होते. 5आम्ही एक क्षणभर देखील त्यांना वश झालो नाही, यासाठी की शुभवार्तेचे सत्य तुमच्याजवळ कायम असावे.
6ज्यांना अतिश्रेष्ठ म्हणून मानले जात होते ते काहीही करीत होते तरी मला काही फरक पडला नाही; परमेश्वर पक्षपात करीत नाही. त्यांनी माझ्या संदेशात काहीही भर घातली नाही. 7याउलट, त्यांनी ओळखले की सुंता न झालेल्या#2:7 किंवा परराष्ट्रीय लोकांमध्ये शुभवार्तेचा प्रचार करण्याचे कार्य मला सोपविण्यात आले आहे, ज्याप्रकारे पेत्राला सुंता झालेल्या लोकांमध्ये कार्य करण्याचे सोपविण्यात आले होते. 8कारण जे परमेश्वर सुंता झालेल्यांसाठी प्रेषित पेत्रामध्ये करीत होते, तेच परमेश्वर गैरयहूदीयांसाठी मी जो प्रेषित आहे त्या माझ्यामध्ये सुद्धा करीत होते. 9जेव्हा याकोब, केफा आणि योहान असे जे श्रेष्ठ आधारस्तंभ यांना समजले की मला कृपा प्राप्त झाली आहे, तेव्हा त्यांनी माझ्याशी व बर्णबाशी सहभागितेच्या उजव्या हातांनी हस्तांदोलन केले. त्यांनी हे मान्य केले की आम्ही गैरयहूदीयांकडे जावे आणि त्यांनी सुंता झालेल्यांकडे जावे. 10त्या सर्वांनी एकच अशी विनंती केली होती की गरिबांना साहाय्य करण्याची आम्ही सतत आठवण ठेवावी आणि तीच गोष्ट करण्यासाठी मी नेहमीच उत्सुक होतो.
पौल पेत्राला विरोध करतो
11जेव्हा केफा#2:11 म्हणजे पेत्र अंत्युखिया येथे आला, तेव्हा मी त्याच्या तोंडावर त्याला विरोध केला, कारण तो दोषी होता. 12याकोबाकडून काही लोक येण्यापूर्वी तो प्रथम गैरयहूदी लोकांबरोबर भोजन करीत असे. परंतु जेव्हा ते आले, तेव्हा त्याने मागे सरकण्यास सुरुवात केली आणि तो स्वतःला गैरयहूदीयांपासून वेगळे करू लागला, कारण सुंता झालेल्या गटातील लोकांचे त्याला भय वाटत होते. 13बाकीचे यहूदी त्याच्या ढोंगात त्याला सामील झाले, म्हणून त्यांच्या ढोंगीपणामुळे बर्णबासचीसुद्धा चुकीची कल्पना झाली.
14जेव्हा मी पाहिले की, शुभवार्तेत जे सत्य आहे त्याप्रमाणे ते चालत नाहीत, तेव्हा सर्वांसमक्ष मी केफाला म्हणालो, “तू यहूदी आहेस तरी तू गैरयहूदीयांसारखे जगत आहेस आणि यहूदीयांसारखे नाही. तर मग हे कसे आहे की, गैरयहूदी लोकांना यहूदी प्रथा पाळण्यासाठी तू भाग पाडतोस?
15“जे आम्ही जन्माने यहूदी आहोत आणि गैरयहूदी लोकांसारखे पापी नाही. 16हे जाणून घ्या, नियमशास्त्राच्या कार्याद्वारे मनुष्य नीतिमान ठरत नाही, परंतु येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवल्यानेच आपण नीतिमान ठरतो. म्हणून आम्हीसुद्धा ख्रिस्त येशूंवर विश्वास ठेवला आहे, यासाठी की आम्हीसुद्धा ख्रिस्तामधील विश्वासाने#2:16 किंवा विश्वासानुसार नीतिमान ठरावे आणि नियमशास्त्र पाळल्याने नव्हे. कारण नियमशास्त्राचे पालन केल्याने कोणी नीतिमान ठरत नाही.
17“ख्रिस्तामध्ये नीतिमान ठरावे असा प्रयत्न करीत असताना आपण यहूदीसुद्धा पापी लोकांमध्ये आहोत, त्याचा अर्थ हा नाही की ख्रिस्त आपल्याला पाप करण्यास उत्तेजन देतात?#2:17 ख्रिस्त आपल्याला पाप करण्यास उत्तेजन देतात? मूळ भाषेत ख्रिस्त हा पापाचा सेवक आहे का? नक्कीच नाही. 18जे मी उद्ध्वस्त केले ते जर मी पुन्हा बांधतो, तर मी खरोखरच नियमशास्त्र मोडणारा असा ठरतो.
19“नियमांद्वारे मी नियमाला मरण पावलो यासाठी की मी परमेश्वरासाठी जगावे. 20मी ख्रिस्ताबरोबर क्रूसावर खिळलेला आहे आणि मी जगतो असे नाही, तर ख्रिस्त माझ्यामध्ये जगतात. मी आता जे जीवन शरीरात जगतो ते मी परमेश्वराच्या पुत्रावर विश्वास ठेवून जगतो, ज्यांनी माझ्यावर प्रीती केली आणि स्वतःला माझ्यासाठी दिले. 21मी परमेश्वराच्या कृपेला वगळत नाही, कारण नियमशास्त्राचे पालन केल्याने नीतिमत्व प्राप्त होत असते, तर ख्रिस्ताचे मरण व्यर्थ झाले असते.”