1
1प्रेषित पौल, ज्याला मनुष्यांनी नाही किंवा एका मनुष्याने पाठवले नाही, परंतु येशू ख्रिस्त आणि परमेश्वर पिता ज्यांनी येशूंना मरणातून उठविले त्यांच्याद्वारे पाठवण्यात आलेला, त्या माझ्याकडून 2आणि माझ्याबरोबर येथे असलेले सर्व बंधू आणि भगिनी यांच्याकडून,
गलातीया येथील मंडळ्यांना:
3परमेश्वर आपला पिता व प्रभू येशू ख्रिस्त यांच्याकडून तुम्हास कृपा आणि शांती असो. 4ज्यांनी आपला परमेश्वर आणि पिता यांच्या इच्छेला अनुसरून आमच्या पापांसाठी स्वतःला दिले यासाठी की सध्याच्या दुष्ट जगापासून आम्हाला वाचवावे. 5त्यांना सदासर्वकाळ गौरव असो. आमेन.
दुसरी शुभवार्ता नाही
6मला आश्चर्य वाटते की, ज्यांनी तुम्हाला ख्रिस्ताच्या कृपेत जगण्यासाठी बोलाविले, त्यांना सोडून तुम्ही इतक्या लवकर वेगळ्या शुभवार्तेकडे वळत आहात, 7जी खरोखर शुभवार्ता नाहीच. काही लोक उघडपणे तुम्हाला गोंधळात टाकीत आहेत आणि ख्रिस्ताच्या शुभवार्तेत बदल करण्याचा प्रयत्न करीत आहेत. 8परंतु ज्या शुभवार्तेचा प्रचार आम्ही तुम्हाला केला, त्या व्यतिरिक्त जर आम्ही किंवा स्वर्गातून एखादा देवदूतसुद्धा प्रचार करीत असेल तर त्यांच्यावर परमेश्वराचा शाप येवो! 9जसे आम्ही पूर्वी सांगितलेले आहे, म्हणून मी आता पुन्हा सांगतो: जर कोणी तुम्हाला तुम्ही स्वीकारलेल्या शुभवार्ते व्यतिरिक्त दुसरा प्रचार करीत आहेत, तर त्यांच्यावर परमेश्वराचा शाप असो!
10आता मी माणसांची पसंती मिळविण्याचा प्रयत्न करीत आहे का, किंवा परमेश्वराची? किंवा मी लोकांना प्रसन्न करण्याचा प्रयत्न करीत आहे का? जर मी अजूनही लोकांना प्रसन्न करीत असतो तर मी ख्रिस्ताचा सेवक नसेन.
पौलाला परमेश्वराकडून पाचारण
11बंधूंनो आणि भगिनींनो, माझी अशी इच्छा आहे की तुम्ही हे समजून घ्यावे की, ज्या शुभवार्तेचा प्रचार मी केला ती मनुष्याकडून आलेली नाही. 12कोणत्याही व्यक्तीकडून मी ते स्वीकारलेले नाही किंवा मला ते शिकविण्यात आलेले नाही; तर मला ही शुभवार्ता येशू ख्रिस्ताकडून प्रकटीकरणाद्वारे मिळाली आहे.
13कारण तुम्ही ऐकलेच आहे की, यहूदी धर्मात असताना माझे पूर्वीचे जीवन कसे होते, कशाप्रकारे उग्र रूप धारण करून मी परमेश्वराच्या मंडळीचा छळ केला आणि त्या मंडळीचा नाश करण्याचा प्रयत्न केला. 14माझ्या लोकांमध्ये माझ्या वयाच्या पुष्कळांपेक्षा मी यहूदी धर्मसंप्रदायात अधिक पुढे जात होतो आणि माझ्या पूर्वजांच्या परंपरेविषयी अत्यंत आवेशी होतो. 15परंतु जेव्हा परमेश्वराने मला माझ्या मातेच्या उदरात असतानाच निवडले आणि त्यांच्या कृपेने मला बोलाविले, त्यांना हे योग्य वाटले की 16त्यांच्या पुत्राला माझ्यामध्ये प्रकट करावे; यासाठी की गैरयहूदी लोकांमध्ये मी येशूंच्या शुभवार्तेची घोषणा करावी. अशी माझी त्वरित प्रतिक्रिया होती की कोणत्याही मनुष्याचा सल्ला घेऊ नये. 17माझ्या आधी जे प्रेषित होते त्यांना भेटण्यासाठी मी यरुशलेमपर्यंत गेलो नाही, परंतु मी अरबस्थानात गेलो. नंतर मी दिमिष्कास परत आलो.
18नंतर तीन वर्षानंतर केफाची ओळख करून घेण्यासाठी मी यरुशलेमला गेलो आणि पंधरा दिवस मी त्याच्याबरोबर राहिलो. 19प्रभूचा भाऊ याकोब याच्याशिवाय दुसर्या प्रेषितांना मी भेटलो नाही. 20मी परमेश्वरासमोर तुम्हाला खात्री देतो की, मी जे तुम्हाला लिहित आहे त्यामध्ये काही खोटे नाही.
21नंतर मी सिरिया आणि किलिकिया येथे गेलो. 22ख्रिस्तामध्ये असलेल्या यहूदीया येथील मंडळ्यांना त्यावेळेस माझी वैयक्तिक ओळख नव्हती. 23त्यांनी फक्त एवढेच ऐकले होते, “ज्या मनुष्याने पूर्वी आमचा छळ केला तो आता त्या विश्वासाचा प्रचार करीत आहे ज्याचा नाश करण्याचा त्याने प्रयत्न केला होता.” 24माझ्यामुळे त्यांनी परमेश्वराचे गौरव केले.