27
1इसहाक वृद्ध झाला, त्याची दृष्टी मंद होऊन त्याला दिसेनासे झाले, तेव्हा एके दिवशी त्याने आपला ज्येष्ठपुत्र एसाव याला हाक मारली व म्हटले, “माझ्या मुला.”
“बाबा, काय आज्ञा,” तो उत्तरला.
2तेव्हा इसहाक त्याला म्हणाला, “मी आता वृद्ध झालो आहे, आणि माझ्या मृत्यूचा दिवस मला माहीत नाही. 3तर तुझे शस्त्र घेऊन ये—धनुष्य व बाण घे—आणि खुल्या मैदानात जाऊन एखाद्या वनपशूची शिकार करून आण. 4मग माझ्या आवडीचे रुचकर भोजन तयार कर आणि मला खाण्यासाठी ते इकडे घेऊ ये, म्हणजे मरण्यापूर्वी मी माझा आशीर्वाद तुला देईन.”
5इसहाक आपला पुत्र एसावसोबत बोलत आहे हे रिबेकाह ऐकत होती. एसाव रानात शिकार करून मांस आणण्यास गेला, 6रिबेकाहने आपला पुत्र याकोब याला बोलाविले आणि ती त्याला म्हणाली “हे बघ, तुझे वडील तुझा भाऊ एसावाला म्हणाले, 7एखाद्या वनपशूची शिकार करून आण, मग माझ्या आवडीचे रुचकर भोजन तयार कर, म्हणजे मरण्यापूर्वी याहवेहच्या सानिध्यात जो आशीर्वाद आहे, तो मी तुला देईन, हे सांगताना मी ऐकले.” 8ती म्हणाली, “आता माझ्या मुला, नीट लक्ष देऊन ऐक व मी सांगते तसेच कर: 9बाहेर कळपात जा आणि दोन चांगली करडे घेऊ ये. मी त्या करडांचे तुझ्या वडिलांच्या आवडीप्रमाणे रुचकर भोजन तयार करेन, 10मग ते तू आपल्या वडिलांकडे घेऊन जा. म्हणजे मृत्यूपूर्वी ते तुला आशीर्वाद देतील.”
11याकोब त्याची आई रिबेकाहला म्हणाला, “पण माझा भाऊ एसाव तर केसाळ आहे आणि माझी कातडी अगदी केसरहित आहे. 12वडिलांनी मला चाचपून पाहिले तर? त्यांना वाटेल मी त्यांना फसवीत आहे आणि मग आशीर्वादाऐवजी मी स्वतःवर शाप ओढवून घेईन.”
13तेव्हा रिबेकाह म्हणाली, “माझ्या बाळा, ते शाप माझ्यावर पडोत. मी सांगते त्याप्रमाणे तू कर, बाहेर जा आणि करडे घेऊन ये.”
14तेव्हा याकोबाने करडे कापून, स्वच्छ करून आपल्या आईकडे आणली, आणि तिने त्याच्या वडिलांना आवडणारे रुचकर भोजन तयार केले. 15मग रिबेकाहने घरात असलेले एसावाचे उत्तम कपडे घेतले आणि आपला धाकटा मुलगा याकोबाला ते घालण्यास सांगितले. 16तिने त्याचा हात आणि मानेवरचा गुळगुळीत भाग करडांच्या कातड्याने झाकला. 17नंतर तिने रुचकर भोजन व भाकर आपला मुलगा याकोबाजवळ दिली.
18आपल्या वडिलाजवळ जाऊन याकोब म्हणाला, “बाबा.”
तो म्हणाला, “काय माझ्या बाळा? तू कोण आहेस?”
19तेव्हा याकोबाने उत्तर दिले, “मी एसाव, तुमचा ज्येष्ठपुत्र आहे. तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी केले आहे. कृपया उठून बसा आणि तुमच्यासाठी शिकार करून आणलेले भोजन खा, म्हणजे तुम्ही मला तुमचे आशीर्वाद द्या.”
20त्यावर इसहाक म्हणाला, “माझ्या मुला, इतक्या लवकर तुला शिकार कशी मिळाली?”
तेव्हा तो म्हणाला, “तुमचे परमेश्वर याहवेह यांनी मला यश दिले.”
21मग इसहाक याकोबास म्हणाला, “माझ्या मुला, जरा माझ्याजवळ ये. तू खरोखरच एसाव आहेस की नाही ते मला चाचपून पाहू दे.”
22तेव्हा याकोब आपला पिता इसहाकाजवळ गेला व त्यांनी त्याला चाचपून म्हटले, “वाणी तर याकोबाची आहे, पण हात एसावाचे आहेत.” 23त्याने त्याला ओळखले नाही, कारण त्याचे हात एसावाच्या हातांसारखे केसाळ होते. तो याकोबाला आशीर्वाद देण्यासाठी तयार झाला, 24त्याने विचारले, “तू खरोखर माझा पुत्र एसावच आहेस काय?”
तो म्हणाला “होय, मीच आहे.”
25मग इसहाक त्यास म्हणाला, “त्या शिकारीचे भोजन इकडे आण. मी ते खाईन आणि माझे आशीर्वाद तुला देईन.”
तेव्हा याकोबाने जेवणाचे ताट आणले, तो जेवला आणि मग द्राक्षारस त्याच्याकडे आणले, तेही तो प्याला. 26मग इसहाक त्याला म्हणाला, “माझ्या मुला इकडे ये आणि माझे चुंबन घे.”
27तो आपल्या पित्याजवळ गेला आणि त्याने त्याचे चुंबन घेतले. जेव्हा इसहाकाला त्याच्या वस्त्रांचा वास आला, तेव्हा त्याला आशीर्वाद देत तो म्हणाला,
“अहा, माझ्या पुत्राचा सुगंध,
जसा याहवेहने आशीर्वादित केलेल्या शेताचा.
28परमेश्वर तुला आकाशातील दव
आणि पृथ्वीची समृद्धी देतील,
भरपूर धान्य आणि नवीन द्राक्षारस देतील.
29राष्ट्रे तुझी सेवा करोत,
आणि लोक तुझ्यापुढे नमोत.
तू तुझ्या भाऊबंदाचा धनी हो.
तुझ्या आईची मुले तुझ्यापुढे लवून तुला मुजरा करोत.
जे तुला शाप देतात ते सर्व शापित होवोत,
आणि जे तुला आशीर्वाद देतात ते सर्व आशीर्वादित होवोत.”
30इसहाकाने त्याला आशीर्वाद देण्याचे पूर्ण केले आणि याकोब आपल्या वडिलांच्या उपस्थितीतून पडतो न पडतो तोच एसाव शिकारीहून परतला 31त्यानेही आपल्या पित्यासाठी रुचकर भोजन तयार केले आणि त्याच्याकडे ते घेऊन आला व म्हणाला, “बाबा, हे पाहा मी शिकार घेऊन आलो आहे. उठून बसा आणि हे खा म्हणजे मला तुम्ही तुमचे आशीर्वाद देऊ शकाल.”
32हे ऐकून त्याचा पिता इसहाक त्यास म्हणाला, “तू कोण आहेस?”
त्याने उत्तर दिले, “मी एसाव तुमचा ज्येष्ठपुत्र आहे.”
33त्याचवेळी इसहाकाच्या शरीराला भयंकर कंप सुटला आणि तो म्हणाला, “तर मग आताच शिकार घेऊन माझ्याकडे आला होता तो कोण होता? तू येण्यापूर्वी मी तर ते खाल्ले आणि माझे आशीर्वादही त्याला दिले. होय, त्याला ते आशीर्वाद आता मिळणारच.”
34जेव्हा एसावाने आपल्या पित्याचे हे शब्द ऐकले, तेव्हा तो अतिदुःखाने हंबरडा फोडून आपल्या पित्यास म्हणाला, “बाबा, बाबा, मलाही आशीर्वाद द्या.”
35परंतु तो म्हणाला, “तुझा भाऊ कपटाने आला होता आणि तुझे आशीर्वाद तो घेऊन गेला.”
36यावर एसावाने म्हटले, “त्याचे नाव याकोब योग्यच नाही काय? त्याने दुसर्यांदा मला फसविले आहे. त्याने माझा जन्मसिध्द हक्क घेतला आणि आता माझा आशीर्वादही चोरला आहे.” नंतर त्याने विचारले, “माझ्यासाठी तुम्ही एकही आशीर्वाद राखून ठेवला नाही काय?”
37परंतु इसहाकाने एसावास उत्तर दिले, “मी त्याला तुझा धनी आणि तुझ्या सर्व नातेवाईकांना त्याचे नोकर करून ठेवले आहे. मी त्याला भरपूर धान्य आणि द्राक्षारस यांची हमी दिली आहे. आता देण्याचे काय शिल्लक राहिले आहे, माझ्या मुला?”
38एसाव आपल्या वडिलांना म्हणाला, “तुमच्याकडे एकच आशीर्वाद आहे काय? अहो बाबा, मलाही आशीर्वाद द्या!” मग एसाव मोठ्याने रडू लागला.
39त्याचे वडील इसहाक त्याला उत्तर देत म्हणाले,
“तुझे वास्तव्य
सुपीक प्रदेशापासून दूर
आकाशातील दहिवर पडते तिथून दूर असेल.
40तलवारीच्या जोरावर तू जगशील
तू आपल्या भावाची सेवा करशील,
परंतु जेव्हा अस्वस्थ होशील,
तेव्हा तुझ्यावर असलेले त्याचे जू
तू तुझ्यावरून झुगारून देशील.”
41एसाव याकोबाचा त्याच्या पित्याने आशीर्वाद दिल्यामुळे द्वेष करू लागला. तो स्वतःशीच म्हणाला, “माझ्या वडिलांसाठी शोक करण्याचे दिवस जवळ आले आहे; मग मी माझा भाऊ याकोबाचा वध करेन.”
42परंतु एसावाचा बेत कोणीतरी रिबेकाहच्या कानावर घातला. रिबेकाहने याकोबाला बोलाविले आणि त्याला सांगितले, “एसावाने तुझा जीव घेऊन, सूड घेण्याची धमकी दिली आहे. 43तर आता माझ्या मुला, मी म्हणते तसे कर आणि माझा भाऊ लाबानकडे हारानला पळून जा. 44तुझ्या भावाचा राग शमेपर्यंत काही काळ तिथेच राहा. 45तू जे काही केलेस याचा त्याला विसर पडेपर्यंत तू तिथेच राहा. मग मी तुला बोलाविणे पाठवेन. एकाच दिवशी मी तुम्हा दोघांनाही का मुकावे?”
46नंतर रिबेकाह इसहाकास म्हणाली, “या हेथी मुलींमुळे माझा जीव मला नकोसा झाला आहे. याकोबानेही त्यांच्यापैकीच एकीशी लग्न केले तर माझ्या जगण्याचा काही उपयोग नसेल.”