28
1तेव्हा इसहाकाने याकोबाला बोलावून आशीर्वाद दिला आणि नंतर त्याला आज्ञा दिली, “कनानी मुलीशी तू लग्न करू नकोस. 2तू त्वरित पद्दन-अराम येथे तुझा आईचा पिता बेथुएल याच्या घरी जा, आणि तुझ्या आईचा भाऊ लाबान याच्या मुलींपैकी पत्नी कर. 3सर्वसमर्थ परमेश्वर तुला आशीर्वाद देवो. तुला पुष्कळ संतती देवो आणि तुझ्यापासून अनेक वंशाचे एक मोठे राष्ट्र निर्माण करो. 4अब्राहामाला जे आशीर्वाद परमेश्वराने दिले, ते तुझ्या वंशजाला लाभोत, ज्या भूमीवर तू आता परदेशी म्हणून राहत आहेस, ती भूमी तुझ्या मालकीची होवो, कारण परमेश्वराने ती अब्राहामाला दिलेली आहे.” 5अशा रीतीने इसहाकाने याकोबाला पद्दन-अराम येथे अरामी बेथुएलाचा पुत्र आणि याकोब व एसाव यांची आई रिबेकाहचा भाऊ, लाबान याच्याकडे पाठविले.
6एसावाला समजले की इसहाकाने याकोबाला आशीर्वाद देऊन पद्दन-अराम येथे पत्नी करण्यासाठी पाठविले आहे, आणि जेव्हा त्याने त्याला आशीर्वाद दिला, तेव्हा त्याला आज्ञा दिली की तू कनानी मुलीशी विवाह करू नको, 7आणि याकोब आपल्या पित्याची व आईची आज्ञा पाळून पद्दन-अराम येथे गेला. 8तेव्हा एसावाला समजले की, त्याचे वडील इसहाकाला कनानी मुली अजिबात आवडत नाहीत. 9म्हणून एसाव अब्राहामाचा पुत्र इश्माएलच्या घरी गेला आणि तिथे त्याने त्याची कन्या, नबायोथाची बहीण माहलथशी विवाह केला आणि माहलथ त्याच्या पूर्वीच्या पत्नींमध्ये सामील झाली.
याकोबाला बेथेल येथे पडलेले स्वप्न
10याकोब बेअर-शेबा सोडून हारानास जाण्यास निघाला. 11त्या रात्री सूर्य मावळल्यावर तो मुक्कामास एके ठिकाणी थांबला असताना, त्याने एक धोंडा उशासाठी घेतला आणि तो त्या ठिकाणी झोपी गेला. 12तेव्हा त्याला एक स्वप्न पडले. त्यात त्याने पृथ्वीवर उभी केलेली व तिचे वरचे टोक स्वर्गाला टेकलेले आहे अशी एक शिडी पाहिली. परमेश्वराचे दूत त्या शिडीवरून वर जाताना व खाली उतरतांना त्याने पाहिले. 13शिडीच्या वरच्या टोकाला याहवेह उभे राहून त्यास म्हणाले, “मी याहवेह, तुझा पिता अब्राहाम व इसहाक यांचा परमेश्वर आहे. ज्या भूमीवर तू झोपला आहेस ती मी तुला आणि तुझ्या वंशजांना देईन. 14तुझे गोत्र धुळीच्या कणांइतके वाढतील. ते नेगेव#28:14 अर्थात् पश्चिम पासून पूर्वेपर्यंत आणि उत्तरेपासून दक्षिणेपर्यंत विस्तार करतील. तुझ्या व तुझ्या संततीच्या द्वारे पृथ्वीवरील सर्व लोक आशीर्वादित होतील. 15पाहा, मी तुझ्याबरोबर आहे आणि ज्या ठिकाणी तू जाशील, त्या सर्व ठिकाणी मी तुझे संरक्षण करेन आणि याच भूमीवर तुला सुखरुपपणे परत आणेन. तुला दिलेले अभिवचन पूर्ण होईपर्यंत मी तुझ्याबरोबर सतत राहीन.”
16मग याकोब झोपेतून जागा झाला, त्याने विचार केला, “निश्चितच याहवेहची उपस्थिती या ठिकाणी आहे, पण मला हे माहीत नव्हते. 17तो भयभीत झाला आणि म्हणाला, हे किती अद्भुत स्थळ आहे! हे परमेश्वराच्या भवनाशिवाय दुसरे काहीही असू शकत नाही; हे स्वर्गाचे द्वार आहे.”
18दुसर्या दिवशी याकोब अगदी पहाटेस उठला आणि जो धोंडा त्याने उशाशी घेतला होता, तो त्याने स्तंभ म्हणून उभा केला आणि त्यावर जैतुनाचे तेल ओतले. 19त्याने त्या जागेचे नाव बेथेल#28:19 बेथेल अर्थात् परमेश्वराचे घर असे ठेवले, जरी त्या नगराचे नाव लूज असे होते.
20नंतर याकोबाने नवस केला, “जर परमेश्वर माझ्यासोबत असतील, या प्रवासात माझे रक्षण करतील, मला अन्नपाणी, वस्त्र देतील, 21व मला आपल्या पित्याच्या घरी सुखरुपपणे परत आणतील, तर याहवेह माझे परमेश्वर होतील 22आणि हा जो धोंडा मी स्तंभ म्हणून उभा केला आहे ते परमेश्वराचे भवन होईल आणि जे सर्वकाही ते मला देतील, त्यातील प्रत्येकाचा दशांश मी त्यांना अर्पण करेन.”