YouVersion लोगो
सर्च आयकॉन

उत्पत्ती 30

30
1राहेलने पाहिले की याकोबाला तिच्यापासून मूल होत नाही, तेव्हा ती आपल्या बहिणीचा मत्सर करू लागली. “मला मूल द्या, नाहीतर मी मरून जाईन,” ती याकोबास म्हणाली.
2त्यामुळे याकोब संतापून राहेलला म्हणाला, “मी काय परमेश्वराच्या ठिकाणी आहे, ज्यांनी तुला मूल होण्यापासून रोखले आहे?”
3मग ती म्हणाली, “तुम्ही माझी दासी बिल्हा हिचा स्वीकार करा. जेणेकरून ती माझ्यासाठी मुलांना जन्म देईल आणि मीही तिच्याद्वारे कुटुंब तयार करू शकेन.”
4याप्रमाणे तिने आपली दासी बिल्हा, त्याला पत्नी म्हणून दिली, आणि याकोबाने तिचा स्वीकार केला, 5आणि बिल्हा गर्भवती झाली व याकोबाच्या पुत्राला जन्म दिला, 6राहेलने त्याचे नाव दान#30:6 अर्थात् न्याय असे ठेवले, कारण ती म्हणाली, “परमेश्वराने मला न्याय दिला आहे; त्यांनी माझी विनंती मान्य केली आणि मला एक पुत्र दिला आहे.”
7राहेलची दासी बिल्हा ही पुन्हा गर्भवती झाली आणि तिने याकोबाच्या अजून एका पुत्राला जन्म दिला. 8राहेलने त्याचे नाव नफताली#30:8 अर्थात् माझा संघर्ष असे ठेवले. कारण ती म्हणाली, “मी माझ्या बहिणीशी जोरदार संघर्ष करून विजयी झाले आहे.”
9आपण पुन्हा गर्भवती होत नाही, हे लक्षात घेऊन लेआने आपली दासी जिल्पा याकोबाला पत्नी म्हणून दिली. 10याकोबापासून लेआची दासी जिल्पाने एका पुत्राला जन्म दिला. 11लेआ म्हणाली, “हा किती आशीर्वाद आहे!” म्हणून तिने त्याचे नाव गाद#30:11 अर्थात् माझे भाग्य उजळले किंवा सैन्य असे ठेवले.
12लेआची दासी जिल्पाला याकोबापासून दुसरा पुत्र झाला. 13लेआने त्याचे नाव आशेर#30:13 अर्थात् धन्य ठेवले. कारण ती म्हणाली. “मी किती आनंदी आहे! स्त्रिया मला धन्य म्हणतील.”
14गव्हाच्या हंगामात रऊबेन शेतात काम करताना एके दिवशी त्याला पुत्रदात्रीची फळे#30:14 पुत्रदात्रीची फळे मूळ भाषेत दूदाईम सापडली. त्याने ती आपली आई लेआ हिला नेऊन दिली. तेव्हा राहेलने लेआजवळ विनंती केली, “तुझ्या मुलाने पुत्रदात्रीची फळे आणली आहेत, त्यातील काही मला दे.”
15पण लेआ तिला म्हणाली, “माझा पती घेतलास तेवढे पुरे झाले नाही काय? आता माझ्या मुलाची पुत्रदात्रीची फळे देखील तू घेशील काय?”
राहेल म्हणाली, “ठीक आहे. तुझ्या पुत्रदात्रीच्या फळांच्या मोबदल्यात, याकोब आज रात्री तुझ्याकडे येईल.”
16जेव्हा संध्याकाळी याकोब शेतातून आला, लेआ त्याला भेटण्यासाठी बाहेर गेली. ती म्हणाली, “आज तुम्ही माझ्याबरोबर निजावे, कारण माझ्या मुलाची पुत्रदात्रीची फळे देऊन मी तुम्हाला त्या मोबदल्यात घेतले आहे.” त्याप्रमाणे त्या रात्री तो तिच्यासोबत निजला.
17परमेश्वराने लेआचे ऐकले आणि ती पुन्हा गर्भवती होऊन तिने याकोबाच्या पाचव्या पुत्राला जन्म दिला. 18तिने त्याचे नाव इस्साखार#30:18 अर्थात् बक्षीस असे ठेवले. कारण लेआ म्हणाली, “माझ्या पतीला मी माझी दासी दिल्यामुळे परमेश्वराने मला हे प्रतिफळ म्हणून दिले आहे.”
19नंतर लेआ याकोबापासून पुन्हा गर्भवती झाली आणि तिला सहावा पुत्र झाला. 20तिने त्याचे नाव जबुलून#30:20 अर्थात् आदर असे ठेवले. कारण लेआ म्हणाली, “परमेश्वराने माझ्या पतीसाठी मला चांगल्या देणग्या दिल्या आहेत. कारण मी त्याच्या सहा पुत्रांना जन्म दिला आहे, आता ते मला माझा आदर करतील.”
21काही वेळेनंतर तिने एका कन्येला जन्म दिला आणि तिचे नाव दीना असे ठेवले.
22तेव्हा परमेश्वराला राहेलची आठवण झाली; त्यांनी तिचे ऐकले आणि तिला गर्भधारण करण्यास सक्षम केले. 23ती गर्भवती झाली आणि तिने एका पुत्राला जन्म दिला ती म्हणाली, “परमेश्वराने माझा काळिमा दूर केला आहे.” 24तिने त्याचे नाव योसेफ#30:24 अर्थात् ते वृद्धी करोत. असे ठेवले, आणि म्हणाली, “याहवेहने मला आणखी एक पुत्र द्यावा.”
याकोबाच्या कळपात वाढ
25राहेलने योसेफास जन्म दिल्यानंतर याकोब लाबानास म्हणाला, “माझी रवानगी करा म्हणजे मी माझ्या देशाला जाईन. 26माझ्या स्त्रिया व मुले यासह मला जाऊ द्या. त्यांच्यासाठी मी तुमची किती सेवा केली आहे, हे तुम्हाला ठाऊक आहे.”
27पण लाबान त्याला म्हणाला, “माझ्यावर तुझी कृपादृष्टी असेल तर कृपया थांब. तुझ्यामुळे याहवेहने मला आशीर्वाद दिला आहे हे मला भविष्यकथनाने कळले आहे. 28तुला किती वेतन हवे ते मला सांग म्हणजे मी तुला तेवढे देईन.”
29याकोब त्याला म्हणाला, “मी तुमची चाकरी कशी केली आणि तुमची गुरे माझ्या देखरेखीखाली कशी राहिली हे तुम्हाला माहीत आहे. 30मी येण्यापूर्वी तुमच्याकडे जे होते ते खूप वाढले आहे आणि मी जिथे होतो तिथे याहवेहने तुम्हाला आशीर्वाद दिला आहे. पण माझ्या स्वतःच्या कुटुंबीयांकडे मी केव्हा लक्ष देणार?”
31“मी तुला काय देऊ?” त्याने विचारले.
“मला काहीही देऊ नका,” याकोबने उत्तर दिले. “पण जर तुम्ही माझ्यासाठी हे केले तर मी तुमच्या कळपांचे पालन करेन आणि त्यांचा सांभाळ करेन: 32आज मला तुमचे सर्व कळप बघून घेऊ द्या म्हणजे मी त्यातून डाग व ठिपके असलेली मेंढरे व बोकडे आणि गडद रंगाची मेंढरे वेगळी करेन व तेच माझे वेतन होईल. 33आणि जेव्हा तुम्ही मला दिलेले वेतन तपासाल तेव्हा भविष्यात माझा प्रामाणिकपणा माझ्यासाठी साक्ष देईल. म्हणजे माझ्या कळपात तुम्हाला एखादा डाग व ठिपके नसलेला बोकड किंवा मेंढा आढळला, तर मी तो तुमच्या कळपातून चोरून घेतला आहे, हे तुम्हाला समजेल.”
34लाबान म्हणाला, “ठीक आहे, तू म्हणतोस तसे होऊ दे.” 35त्याच दिवशी लाबान आपल्या कळपात गेला आणि त्याने पट्टेदार आणि ठिपके असलेली बोकडे व डाग आणि ठिपके असलेल्या शेळ्या (ज्यांच्यावर पांढरा डाग होता) आणि गडद रंगांची मेंढरे वेगळी करून आपल्या पुत्रांच्या स्वाधीन केली. 36नंतर त्याने त्यांच्यामध्ये आणि याकोबामध्ये तीन दिवसांच्या यात्रेचे अंतर ठेवले आणि याकोब लाबानाचे उर्वरित कळप राखू लागला.
37मग याकोबाने चिनार, बदाम व अर्मोन वृक्षांच्या कोवळ्या फांद्या घेतल्या व त्यांची पांढरी अंतर्साल दिसेपर्यंत त्या सोलल्या. 38त्या काठ्या त्याने कळपाच्या पाणी पिण्याच्या पन्हाळ्यात ठेवल्या, जेणेकरून जेव्हा ते पाणी पिण्याकरिता येतील तेव्हा ते थेट कळपांसमोर असतील. 39त्या काठ्यांच्या समोर शेळ्यामेंढ्या फळत तेव्हा त्यांना पट्टेदार किंवा डाग असलेली किंवा ठिपकेदार करडे होत. 40मग याकोबाने तरुण कळप बाजूला केला, परंतु लाबानाच्या कळपामधील पट्टेदार आणि गडद रंगाच्या मेंढ्यांकडे कळपांची तोंडे केली. अशा प्रकारे त्याने स्वतःसाठी वेगळे कळप बनविले आणि त्यांना लाबानाच्या प्राण्यांबरोबर ठेवले नाही. 41जेव्हा तो मेंढरांशी आपल्या कळपातील धष्टपुष्ट माद्यांचा संबंध घडवून आणत असे, त्यावेळी सोललेल्या काठ्या याकोब त्यांच्यापुढे ठेवी. 42पण जेव्हा दुबळ्या मेंढ्या फळत तेव्हा त्या काठ्या तो त्यांच्यापुढे ठेवीत नसे. त्यामुळे दुबळी मेंढरे लाबानाची व धष्टपुष्ट मेंढरे याकोबाची होत. 43याचा परिणाम असा झाला की, याकोब खूप श्रीमंत झाला आणि पुष्कळ शेरडे, मेंढरे, दास, दासी, उंट आणि गाढवे त्याच्या मालकीची झाली.

सध्या निवडलेले:

उत्पत्ती 30: MRCV

ठळक

सामायिक करा

कॉपी करा

None

तुमचे हायलाइट तुमच्या सर्व डिव्हाइसेसवर सेव्ह करायचे आहेत? साइन अप किंवा साइन इन