31
याकोबाचे लाबानापासून पलायन
1याकोबाने लाबानाच्या पुत्रांचे म्हणणे ऐकले, “आमच्या वडिलांचे जे सर्वकाही होते ते याकोबाने घेतले आहे आणि ही सर्व संपत्ती त्याला जी मिळाली आहे ती आमच्या वडिलांची होती.” 2आणि याकोबाला दिसून आले की लाबानची त्याच्याबद्दलची वृत्ती आता पूर्वीसारखी राहिली नाही.
3तेव्हा याहवेह याकोबाशी बोलले आणि म्हणाले, “तू आता आपल्या वडिलांच्या व नातलगांच्या देशात परत जा आणि मी तुझ्याबरोबर असेन.”
4तेव्हा याकोबाने राहेल व लेआ यांना ज्या शेतात तो कळप राखीत होता तिथे बोलावून घेतले. 5तो त्यांना म्हणाला, “मी पाहतो की तुमच्या वडिलांची वृत्ती माझ्याशी पूर्वीसारखी राहिलेली नाही, पण माझ्या वडिलांचे परमेश्वर माझ्याबरोबर आहेत. 6मी तुमच्या वडिलांची आपल्या सर्व शक्तिनिशी सेवा केली हे तुम्हाला माहीत आहे; 7तरीपण तुमच्या वडिलांनी माझ्या वेतनाबाबत केलेला करार दहा वेळा बदलून मला फसविले आहे, तरी परमेश्वराने त्यांना माझे काही वाईट करू दिले नाही. 8कारण ज्यावेळी त्यांनी म्हटले की, डाग असलेल्या शेळ्यामेंढ्या तुझ्या, त्यावेळी सर्व कळपांना डाग असलेली करडे होत. जेव्हा ते आपले मन बदलून म्हणत, पट्टेदार शेळ्यामेंढ्या तुझ्या, तेव्हा त्यांना सर्व पट्टेदार करडे होत. 9अशा रीतीने तुमच्या वडिलांच्या शेळ्यामेंढ्या त्यांच्यापासून काढून परमेश्वराने ती मला दिली आहेत.
10“कळप फळावयाच्या ॠतूत मला स्वप्नात दिसले की, कळप फळविणारे बोकड पट्टेदार, डाग असलेले व ठिपकेदार आहेत. 11मग स्वप्नामध्ये परमेश्वराच्या दूताने मला बोलावून म्हटले, ‘याकोबा,’ मी उत्तर दिले, ‘हा मी इथे आहे.’ 12आणि त्यांनी मला सांगितले, ‘तुझी नजर वर कर आणि पाहा की, फळविणारे बोकड पट्टेदार, डाग असलेले व ठिपकेदार आहेत. कारण लाबानाने तुझ्याशी कसा व्यवहार केला हे सर्व मी पाहिले आहे. 13मीच तुला बेथेलमध्ये भेटलेला परमेश्वर आहे. त्या ठिकाणी तू स्तंभाला तैलाभ्यंग करून शपथ वाहिली होती. आता तू हा देश सोडून आपल्या मायदेशी परत जा.’ ”
14तेव्हा राहेल आणि लेआ यांनी उत्तर दिले, “आता आमच्या वडिलांच्या संपत्तीत आमचा काही वाटा राहिला आहे काय? 15ते आम्हाला परकियांसारखी वागणूक देत नाहीत काय? त्यांनी आम्हाला केवळ विकलेच नाही, तर आमच्याबद्दल मिळालेला सर्व मोबदला वापरून संपविला आहे. 16आमच्या वडिलांकडून परमेश्वराने हे धन काढून घेतले आहे, ते निश्चितच आमचे आणि आमच्या मुलाबाळांचे धन आहे. म्हणून परमेश्वराने तुम्हाला सांगितले आहे तसे करा.”
17मग याकोबाने आपल्या पत्नी व मुलांना उंटांवर बसविले 18आणि त्याने आपल्यापुढे कळप हाकीत, पद्दन-अराम येथे मिळालेली सर्व मालमत्ता घेऊन त्याचे वडील इसहाक याचा देश कनान इथे जाण्यास निघाला.
19जेव्हा लाबान आपल्या मेंढरांची लोकर कातरण्यास गेला असताना, राहेलने आपल्या वडिलांच्या कुलदैवतांच्या मूर्ती चोरल्या. 20याकोब अरामी लाबानाला काहीही न सांगता त्याला फसवून पळाला. 21अशा रीतीने आपली सर्व चीजवस्तू घेऊन, फरात नदी ओलांडून ते सर्वजण गिलआद डोंगराळ प्रदेशाच्या वाटेला लागले.
लाबान याकोबाचा पाठलाग करतो
22याकोब पळून गेला आहे, हे लाबानाला तिसर्या दिवशी सांगण्यात आले. 23तेव्हा आपले नातलग बरोबर घेऊन त्याने त्यांचा पाठलाग केला आणि त्यांना सातव्या दिवशी गिलआद डोंगरावर गाठले. 24पण रात्रीच्या स्वप्नात परमेश्वर अरामी लाबानकडे आले आणि म्हणाले, “सावध राहा, तू याकोबाला चांगले किंवा वाईट असे काहीही म्हणू नकोस.”
25लाबानाने याकोबास गाठले तेव्हा याकोब गिलआद डोंगरमाथ्यावर तळ देऊन राहिला होता. मध्यंतरीच्या काळात लाबानानेदेखील आपला तळ डोंगराच्या पायथ्याशी दिला. 26लाबानाने याकोबाला विचारले, “हे तू काय केलेस? तू मला फसविले आणि माझ्या मुली युद्धबंदिसारख्या पळवून नेत आहेस? 27असे गुप्तपणे पळून तू मला का फसविले? तू मला का सांगितले नाही, जेणेकरून झांज व वीणेचे गायन-वादन करून समारंभाने आनंदाने निरोप देण्याची मला संधी मिळाली असती? 28माझ्या नातवंडाचा निरोप घेण्यापूर्वी, तू मला त्यांची चुंबने देखील घेऊ दिली नाहीस. ही मूर्खपणाची वागणूक आहे. 29मी तुझे नुकसान करू शकलो असतो, पण तुझ्या पूर्वजांचे परमेश्वर काल रात्री मला म्हणाले, ‘सावध राहा, तू याकोबला चांगले किंवा वाईट असे काहीही म्हणू नकोस.’ 30आता तुला जावेसे वाटते कारण तुझ्या नातलगांमध्ये परतण्याची तुला आतुरता आहे. पण तू माझी कुलदैवते का चोरलीस?”
31याकोबाने लाबानास उत्तर दिले, “मला भीती वाटत होती की तुम्ही आपल्या मुली माझ्यापासून बळजबरीने काढून घ्याल. 32पण ज्याच्याकडून तुम्हाला तुमची कुलदैवते मिळतील, तो जिवंत राहणार नाही. आपल्या नातेवाईकांच्या उपस्थितीत, माझ्याबरोबर येथे तुमचे काही आहे की नाही ते स्वतःच पाहा; आणि असल्यास, ते घ्या.” राहेलने त्या मूर्ती चोरल्या होत्या हे याकोबाला माहीत नव्हते.
33लाबान याकोबाच्या तंबूमध्ये गेला. लेआच्या तंबूमध्ये आणि मग दोन दासींच्या तंबूंमध्ये गेला, पण त्याला काही सापडले नाही. नंतर तो लेआच्या तंबूमधून निघून राहेलच्या तंबूमध्ये गेला. 34आता राहेलने त्या कुलदैवतांच्या मूर्ती चोरून आपल्या उंटाच्या खोगिरामध्ये लपवून ठेवल्या होत्या आणि ती त्या खोगिरावर बसली होती. लाबानाने तिच्या तंबूमध्ये कसून शोध केला तरी त्याला त्या सापडल्या नाहीत.
35राहेल त्याला म्हणाली, “बाबा मी तुमच्यापुढे उभी राहू शकत नाही कारण मी ॠतुमती आहे.” अशाप्रकारे त्याने शोध केला, परंतु त्याला कुलदैवतांच्या मूर्ती आढळल्या नाही.
36तेव्हा याकोबाला लाबानाचा खूप संताप आला. त्याने रागाने विचारणा केली, “माझा काय अपराध आहे? मी कोणता गुन्हा केला आहे, की तुम्ही माझा पाठलाग करीत आहात? 37माझ्या सर्व सामानाची झडती घेतलीत. आता मी तुमचे जे काही चोरले असेल, ते तुमच्या आणि माझ्या लोकांच्या पुढे ठेवा. त्यांनाच ते पाहू द्या आणि ते कोणाचे आहे हे ठरवू द्या.
38“वीस वर्षे मी तुमच्याबरोबर राहिलो. त्या काळात तुमच्या मेंढ्या व शेळ्या यांचा कधीही गर्भपात झाला नाही किंवा मी तुमच्या कळपातील एकाही एडक्याला खाल्ले नाही. 39मी तुमच्याकडे वनपशूंनी फाडलेले प्राणी आणले नाहीत; मी स्वतः नुकसान सहन केले आणि दिवसा किंवा रात्री जे काही चोरीला गेले त्याबद्दल तुम्ही माझ्याकडून भरून घेतले. 40माझी परिस्थिती अशी होती: दिवसभर उन्हाचा आणि रात्री थंडीच्या कहराचा त्रास होत असे आणि झोप माझ्या डोळ्यावरून उडून जात असे. 41अशा स्थितीत मी वीस वर्षे काढली. चौदा वर्षे तुमच्या दोन मुली मिळविण्याकरिता आणि सहा वर्षे कळप मिळविण्याकरिता आणि तेवढ्या काळात तुम्ही दहा वेळेस माझ्या वेतनात फेरबदल केला. 42जर माझे पिता इसहाकाचे परमेश्वर, अब्राहामाचे परमेश्वर आणि इसहाकास ज्यांचे भय वाटते, ते माझ्यासह नसते, तर तुम्ही मला रिकामी हाताने पाठवून दिले असते. पण परमेश्वराने माझे परिश्रम व माझ्या हातांनी केलेले कष्ट पाहिले आणि म्हणूनच त्यांनी तुम्हाला काल रात्री दर्शन देऊन धमकाविले.”
43यावर लाबानाने याकोबास उत्तर दिले, “या स्त्रिया माझ्या मुली आहेत; ही मुलेबाळेही माझी आहेत; हे कळप व तुझे जे आहे ते सर्व माझेच आहे. तेव्हा माझ्या कन्या व त्यांची संतती यांचे मी आता करू? 44तर चल, आपण दोघे म्हणजे तू आणि मी शांतीचा करार करू आणि तो तुझ्या माझ्यामध्ये साक्ष होवो.”
45तेव्हा याकोबाने स्तंभ म्हणून एक धोंडा उभा केला; 46आणि याकोबाने आपल्या नातेवाईकांना म्हटले, “काही दगड गोळा करा.” त्यांनी त्यांची रास केली, मग त्या सर्वांनी दगडाच्या राशी जवळ बसून एकत्र भोजन केले. 47मग त्या राशीला लाबानाच्या भाषेत यगर-सहदूथा आणि याकोबाच्या भाषेत गलेद#31:47 म्हणजे साक्षीची रास असे नाव दिले.
48लाबान म्हणाला, “आपल्या दोघांपैकी कोणीही एकमेकांविरुद्ध अतिक्रमण केले, तर ही दगडांची रास त्याला साक्षी राहील.” याकारणास्तव या जागेला गलेद म्हणतात. 49यावरून तिला मिस्पाह#31:49 म्हणजे टेहळणीचा बुरूज असेही नाव देण्यात आले; कारण लाबान म्हणाला, “आपण एकमेकांपासून दूर जाऊ तेव्हा आपण आपला करार पाळू, याहवेह आपल्यावर लक्ष ठेवो.” 50तू माझ्या मुलींना निर्दयतेने वागविलेस किंवा अन्य स्त्रिया केल्यास, “जरी आपल्यासोबत कोणीही नसेल, तरीपण परमेश्वर तुझ्यात व माझ्यात साक्षी आहेत.”
51लाबान आणखी याकोबास म्हणाला, “ही रास आणि हा स्तंभ तुझ्या व माझ्या दरम्यान ठेवला आहे. 52हे ओलांडून मी तुझ्यावर हल्ला करणार नाही किंवा तू देखील ही रास व हा स्तंभ ओलांडून माझ्यावर हल्ला करणार नाही. ही रास व स्तंभ याची साक्ष आहे. 53अब्राहामाचे परमेश्वर आणि नाहोराचे परमेश्वर आणि त्याच्या पित्याचे परमेश्वर, आमच्यामध्ये न्याय करोत.”
मग याकोबाने त्याचे वडील इसहाकाला ज्यांचे भय होते त्यांच्या नावाने शपथ घेतली. 54नंतर याकोबाने डोंगराच्या माथ्यावर परमेश्वराला एक अर्पण वाहिले. त्याने आपल्या सर्व नातलगांना मेजवानीस बोलाविले आणि त्यांनी भोजन करून ती सर्व रात्र त्या डोंगरावर घालविली.
55लाबान दुसर्या दिवशी सकाळीच उठला व त्याने आपल्या कन्यांची व नातवंडांची चुंबने घेतली, त्यांना आशीर्वाद दिला आणि मग तो घरी परत गेला.