32
याकोब एसावला भेटण्याची तयारी करतो
1याकोब आपल्या वाटेने जात असता परमेश्वराचा दूत त्यास भेटले. 2जेव्हा याकोबाने त्यांना पाहिले, तो म्हणाला, “या ठिकाणी परमेश्वराचे सैन्यतळ आहे!” म्हणून त्याने त्या ठिकाणाचे नाव महनाईम#32:2 किंवा दोन सैन्यतळ असे ठेवले.
3याकोबाने आता एदोम प्रांतातील सेईर प्रदेशात राहणारा आपला भाऊ एसाव, याच्याकडे आपले दूत पाठविले; 4आणि त्याने दूतांना आज्ञा दिली की, तुम्ही माझा धनी एसाव याला जाऊन सांगा: “तुमचा सेवक याकोब म्हणतो, मी आतापर्यंत आपले मामा लाबान यांच्याकडे राहत होतो. 5आता मी गुरे, गाढवे, मेंढरे, पुष्कळ स्त्रीपुरुष चाकर यांचा धनी झालो आहे. मी हा निरोप तुमच्याकडे पाठवित आहे कि तुमची कृपादृष्टी माझ्यावर होऊ द्यावी.”
6निरोप्यांनी परत येऊन याकोबास सांगितले की, “आपला भाऊ एसाव चारशे लोक बरोबर घेऊन तुम्हाला भेटण्यासाठी येत आहे.”
7हे ऐकताच याकोबाने भीतीने व व्याकूळ होऊन आपले कुटुंबीय, गुरे, शेरडेमेंढरे आणि उंट यांची दोन गटांमध्ये#32:7 किंवा छावण्या विभागणी केली. 8त्याने विचार केला, “एसावाने एका गटावर हल्ला केला तर दुसर्या गटाला कदाचित निसटून जाता येईल.”
9मग याकोबाने प्रार्थना केली, “हे याहवेह, माझे पिता अब्राहाम, आणि माझे पिता इसहाक यांच्या परमेश्वरा, तुम्ही मला माझ्या देशात आणि नातलगात परत येण्यास सांगितले व मला समृद्ध करण्याचे वचन दिले आहे. 10तुम्ही मला वचन दिल्याप्रमाणे जी वात्सल्य आणि विश्वसनीयता वारंवार दाखविलीस तिला वास्तविक मी पात्र नाही; मी यार्देनेच्या पलीकडे गेलो तेव्हा माझ्याजवळ एका काठीशिवाय दुसरे काहीही नव्हते आणि आता माझे दोन गट झाले आहेत. 11तुम्ही माझी विनंती ऐकून, माझा भाऊ एसावच्या हातून मला वाचवा, मला त्याची भीती वाटते की तो येऊन मला आणि त्यांच्या आईसह मुलांनाही मारून टाकेल. 12परंतु तुम्ही मला समृद्ध करण्याचे आणि माझे वंशज समुद्रातील वाळूप्रमाणे अगणित करण्याचे वचन दिले आहे.”
13त्या रात्री याकोब तिथेच राहिला आणि आपल्याजवळ होते त्यातून त्याने आपला भाऊ एसाव याच्यासाठी एक भेट तयार केली: 14त्यासाठी त्याने दोनशे शेळ्या, वीस बोकड, दोनशे मेंढ्या व वीस एडके, 15तीस दुभत्या मादी उंट व त्यांची बछडी, चाळीस गाई, दहा बैल, वीस गाढवी, दहा शिंगरे, एवढी जनावरे बाजूला काढली. 16प्रत्येक जातीच्या जनावरांचे वेगवेगळे कळप करून त्यांना नोकरांकडे सुपूर्द करून सूचना दिली, “माझ्यापुढे चला आणि प्रत्येक कळपामध्ये काही अंतर ठेवा.”
17पहिला कळप नेणार्या नोकराला त्याने सांगितले: “जेव्हा माझा भाऊ एसाव तुम्हाला भेटेल आणि त्याने विचारले, ‘तुम्ही कोणाचे चाकर आहात, तुम्ही कुठे चालला आहात, ही जनावरे जी तुझ्यापुढे आहे ती कोणाची आहेत?’ 18त्याला उत्तर द्या, ‘ही जनावरे तुमचा सेवक याकोब याची आहेत. ही त्याने आपला धनी एसावच्या भेटीदाखल पाठविली आहेत. तो स्वतः आमच्या पाठोपाठ येत आहे.’ ”
19याकोबाने दुसर्या, तिसर्या आणि इतर कळप हाकणार्याला सूचना दिली: “एसाव जेव्हा तुम्हाला भेटेल तेव्हा तुम्हीही हाच निरोप दिला पाहिजे. 20हे निश्चित बोला, ‘आपला दास याकोब आमच्या मागून येत आहे.’ ” कारण त्याने विचार केला, “मी एसावाला समोरासमोर भेटण्यापूर्वी त्याला भेटी देऊन संतुष्ट करेन; मग तो जेव्हा मला भेटेल, तेव्हा तो माझा स्वीकार करेल.” 21म्हणूनच आपल्यापुढे भेटी पाठवली आणि याकोबाने ती रात्र तळावरच घालविली.
याकोबाने केलेली झुंज
22परंतु त्या रात्रीच याकोब उठला आणि त्याने त्याच्या दोन्ही पत्नी व उपपत्नी आणि अकरा मुले यांना जागे केले आणि यार्देन नदीच्या किनार्याने त्यांना यब्बोक नदीच्या उताराने पार नेले 23त्याने त्यांना नदीच्या पलीकडे पाठविल्यावर त्याची सर्व संपत्तीही त्यांच्या पाठोपाठ पलीकडे पाठविली. 24तिथे याकोब एकटाच होता. त्याचवेळी कोणा पुरुषाने सूर्योदय होईपर्यंत त्याच्याशी झोंबी केली. 25याकोबावर जय मिळणे शक्य नाही, असे पाहून त्या पुरुषाने याकोबाच्या जांघेवर प्रहार केला आणि तो सांधा त्याने उखडून टाकला. 26मग तो याकोबाला म्हणाला, “मला आता जाऊ दे, कारण पहाट होत आहे.”
पण याकोब म्हणाला, “तू मला आशीर्वाद दिल्यावाचून मी तुला जाऊ देणार नाही.”
27मग त्याने याकोबास विचारले, “तुझे नाव काय आहे?”
तेव्हा त्याने उत्तर दिले, “याकोब.”
28यावर तो मनुष्य म्हणाला, “आता तुझे नाव याकोब राहणार नाही, तर ‘इस्राएल#32:28 इस्राएल अर्थात् परमेश्वराशी झुंज करणारा’ असे पडेल; कारण तू परमेश्वराशी व मनुष्याशीही संघर्ष करून यशस्वी झाला.”
29मग याकोबाने त्याला विचारले, “कृपया आपले नाव मला सांगा.”
तेव्हा तो म्हणाला, “तू मला माझे नाव का विचारतोस?” मग त्याने याकोबाला आशीर्वाद दिला.
30मग याकोबाने त्या ठिकाणाचे नाव पनीएल#32:30 म्हणजे परमेश्वराचे मुख असे ठेवले, कारण तो म्हणाला, “मी परमेश्वराचे मुख पाहिले आणि तरीही मी जिवंत राहिलो.”
31जेव्हा याकोब पेनुएल#32:31 किंवा पनीएल मधून निघाला त्यावेळी सूर्य उगवला होता आणि त्याच्या जांघेचा सांधा उखडल्यामुळे तो लंगडत होता. 32याच कारणास्तव इस्राएलचे लोक अजूनही जनावरांच्या जांघेतील धोंडशिरा खात नाहीत, कारण त्याने याकोबाच्या जांघेच्या स्नायुला स्पर्श केला होता.