उत्पत्ती 38
38
यहूदाह आणि तामार
1याच सुमारास यहूदाह आपल्या भावांना सोडून अदुल्लाम येथे आला आणि हीरा नावाच्या एका मनुष्याबरोबर राहू लागला. 2तिथे शूवा नावाच्या एका कनानी मनुष्याची कन्या यहूदाहच्या दृष्टीस पडली आणि तिच्याशी विवाह करून त्याने तिचा स्वीकार केला; 3ती गर्भवती झाली, तिला पुत्र झाला. त्याचे नाव एर ठेवण्यात आले. 4ती पुन्हा गर्भवती झाली, तिला पुत्र झाला, त्याचे नाव ओनान ठेवण्यात आले. 5तिने आणखी एका पुत्राला जन्म दिला व त्याचे नाव शेलाह ठेवले, ते कजीब येथे राहत असताना तिने त्याला जन्म दिला.
6यहूदाहने आपला ज्येष्ठपुत्र एर याचा विवाह तामार नावाच्या एका स्त्रीशी करून दिला. 7परंतु यहूदाहचा ज्येष्ठपुत्र एर, याहवेहच्या नजरेत एक दुष्ट मनुष्य होता म्हणून याहवेहने त्याला ठार मारले.
8तेव्हा यहूदाह ओनान यास म्हणाला, “तू तिचा दीर असल्याची जबाबदारी पूर्ण करण्यासाठी तामारेशी विवाह केला पाहिजे, म्हणजे तुझ्यापासून तिला तुझ्या भावाचे संतान होतील.” 9ओनानला हे ठाऊक होते की संतती झाली तर ती आपली होणार नाही म्हणून ज्यावेळी तो तिच्याशी समागम करी, त्यावेळी तो आपले वीर्य जमिनीवर पाडी, यासाठी की त्याच्यापासून भावाला संतती होऊ नये. 10हे त्याचे कृत्य याहवेहच्या दृष्टीने एक फार मोठे पाप होते; म्हणून याहवेहने त्यालाही मारून टाकले.
11यहूदाह आपली सून तामारला म्हणाला, “माझा पुत्र शेलाहचे विवाहाचे वय होईपर्यंत तू तुझ्या वडिलांच्या घरात विधवा म्हणून राहा.” यहूदाहला भीती वाटत होती की हा मुलगाही आपल्या भावांप्रमाणे मरेल. मग तामार तिच्या वडिलांच्या घरी गेली.
12कालांतराने यहूदाहची पत्नी जी शूवाची मुलगी होती ती मरण पावली. शोक करण्याचे दिवस संपल्यावर यहूदाह, आपला मित्र अदुल्लाम येथील हीरा, याच्याबरोबर आपल्या मेंढरांची लोकर कातरणार्यांकडे तिम्ना येथे गेला.
13“तुझा सासरा तिम्ना येथे मेंढरांची लोकर कातरण्यासाठी गेला आहे,” असे कोणीतरी तामारेला सांगितले. 14तिने आपले वैधव्यदशेत वापरण्याचे कपडे बाजूला ठेवून दिले आणि आपल्याला कोणी ओळखू नये म्हणून तिने अंगावर बुरखा घेतला. मग तिम्नाच्या वाटेवर असलेल्या एनाईम गावाच्या प्रवेशद्वाराजवळ ती जाऊन बसली. कारण तिने पाहिले की, शेलाह आता मोठा झाला असला तरी तिला त्याची पत्नी म्हणून दिले गेले नाही.
15तिथून जाताना यहूदाहने तिला पाहिले आणि तिच्या तोंडावर बुरखा असल्यामुळे त्याला वाटले की ती एक वेश्या आहे, 16म्हणून तो तिच्याजवळ जाऊन थांबला आणि त्याने तिला म्हटले, “तुझ्याशी रत होण्याची माझी इच्छा आहे.” अर्थात् ती आपली सून आहे, हे त्याला माहीत नव्हते.
यावर तिने विचारले, “याबद्दल तुम्ही मला काय द्याल?”
17त्याने म्हटले, “मी तुला माझ्या कळपातून एक कोवळी शेळी पाठवून देईन.”
तेव्हा तिने विचारले, “ती पाठवेपर्यंत तुम्ही माझ्याकडे कोणते तारण ठेवणार आहात?”
18“तुला काय तारण हवे आहे?” त्याने तिला विचारले.
तिने उत्तर दिले, “तुमची मुद्रिका, गोफ आणि हातातील काठी.” याप्रमाणे त्याने या वस्तू तिला दिल्या आणि तिने त्याला आपल्याशी रत होऊ दिले, परिणामी ती गर्भवती झाली. 19यानंतर तिने वैधव्यदशेतील आपले कपडे पुन्हा धारण केले.
20यहूदाहने आपला अदुल्लामी मित्र हीरा, याला तिच्याकडे कोवळी शेळी घेऊन जाण्यास आणि तिला दिलेल्या गहाण वस्तू परत आणण्यात सांगितले; पण हीराला ती सापडली नाही. 21म्हणून त्याने एनाईम गावातील काही लोकांना विचारले, “गावाच्या प्रवेशद्वाराजवळील रस्त्यावर बसलेली देवदासी कुठे राहते?”
“आमच्या गावात तर कोणी देवदासी राहत नाही,” त्यांनी त्याला उत्तर दिले.
22तेव्हा तो यहूदाहकडे परत गेला आणि त्याने त्याला सांगितले, “मला ती कुठेच सापडली नाही, तसेच तेथील लोकांनी सांगितले की आमच्या गावात कोणी देवदासी राहत नाही.”
23यावर यहूदाह म्हणाला, “मग त्या वस्तू तिच्याकडेच राहू दे. नाहीतर तेथील लोकांसाठी आपण उपहासाचा विषय होऊ. मी तर तुझ्यामार्फत तिच्यासाठी ही कोवळी शेळी पाठविली होती, पण ती तुला आढळली नाही.”
24सुमारे तीन महिन्यानंतर, “तुझी सून तामार ही वेश्याकर्मामुळे गर्भवती झाली आहे,” अशी बातमी यहूदाहच्या कानावर गेली.
यहूदाह म्हणाला, “तिला बाहेर काढा आणि जाळून टाका!”
25त्याप्रमाणे ते तिला जाळून टाकण्यासाठी बाहेर घेऊन जात असताना तिने आपल्या सासर्याला निरोप पाठविला, “ही मुद्रिका, हा गोफ आणि ही काठी ज्याची आहे, त्याच्यापासून मला गर्भ राहिलेला आहे. तुम्ही या वस्तू ओळखता काय?”
26यहूदाहने त्या वस्तूंना ओळखले आणि म्हटले, “माझ्यापेक्षा ती अधिक नीतिमान आहे, कारण माझा पुत्र शेलाह तिला पती म्हणून दिला नाही.” यानंतर त्याने कधीही तिच्याशी शरीरसंबंध ठेवला नाही.
27योग्य वेळी तामारेचे दिवस भरले आणि तिला जुळे पुत्र झाले. 28त्यांचा जन्म होत असताना, एका मुलाने प्रथम हात बाहेर काढला, त्याच्या मनगटावर सुइणीने शेंदरी रंगाचा दोरा बांधला व ती म्हणाली, “हा प्रथम जन्माला आला.” 29परंतु त्याने त्याचा हात मागे ओढून घेतला आणि त्याचा भाऊ बाहेर आला, ती म्हणाली, “तर अशाप्रकारे तू वाट काढली!” आणि त्याचे नाव पेरेस#38:29 म्हणजे वाट काढणारा ठेवले. 30यानंतर लवकरच मनगटावर शेंदरी दोरा असलेले मूल जन्मले आणि त्याचे नावे जेरह#38:30 म्हणजे चमकदार असे ठेवण्यात आले.
सध्या निवडलेले:
उत्पत्ती 38: MRCV
ठळक
सामायिक करा
कॉपी करा
तुमचे हायलाइट तुमच्या सर्व डिव्हाइसेसवर सेव्ह करायचे आहेत? साइन अप किंवा साइन इन
पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती™
ग्रंथाची मालकी © 1978, 1982, 2008, 2021, 2022, 2024 Biblica, Inc.
यांची परवानगी घेऊन केले गेले आहे.
सर्व अधिकार जगभरात राखीव.
Holy Bible, Marathi Contemporary Version™
Copyright © 1978, 1982, 2008, 2021, 2022, 2024 by Biblica, Inc.
Used with permission.
All rights reserved worldwide.