इब्री 7
7
याजक मलकीसदेक
1हा मलकीसदेक शालेमचा राजा असून परात्पर परमेश्वराचा याजकही होता. अनेक राजांचा पराभव करून अब्राहाम परत येत असताना, मलकीसदेक त्याला भेटला व त्याला आशीर्वाद दिला.#7:1 उत्प 14:18‑19 2तेव्हा अब्राहामाने सर्वांचा दहावा भाग त्याला दिला. प्रथम मलकीसदेकाच्या नावाचा अर्थ, “नीतिमत्वाचा राजा” असा आहे; आणि, “शालेमचा राजा” म्हणजे “शांतीचा राजा” असा आहे. 3त्याची आई किंवा वडील, वंशावळी, जीवनाचा उगम अथवा त्याच्या आयुष्याचा शेवट याविषयी काही माहिती नाही, तरी परमेश्वराच्या पुत्रासमान तो युगानुयुग याजक राहतो.
4तर तो केवढा थोर आहे याचा विचार करा: कुलपिता अब्राहामाने लुटीचा दहावा हिस्सा त्याला दिला. 5लेवीच्या गोत्रातील, ज्यांना याजकपण प्राप्त होत असते त्यांना लोकांपासून, म्हणजे जे अब्राहामाच्या वंशजाचे आहेत अशा इस्राएली बांधवांपासून, नियमशास्त्राप्रमाणे दहावा भाग गोळा करता येतो. 6परंतु हा मनुष्य लेवी वंशातील नव्हता, त्याने अब्राहामापासून दशांश गोळा केला आणि ज्याला वचने मिळाली होती त्याला त्याने आशीर्वाद दिला. 7हे निर्विवाद सत्य आहे की मोठ्यांकडून कनिष्ठाला आशीर्वाद मिळतो. 8या एका संदर्भात, याजक जे मर्त्य मानव आहेत, त्यांच्याद्वारे दशांश गोळा केल्या जातो, परंतु दुसर्या संदर्भात, तो जिवंत आहे असे त्याच्याविषयी जाहीर केले आहे. 9दशांश गोळा करणार्या लेवीनेही अब्राहामाद्वारे दशांश दिला असेही एखाद्याला म्हणता येईल. 10कारण जेव्हा मलकीसदेक अब्राहामाला भेटला, तेव्हा लेवी पूर्वजाच्या शरीरात होता.
येशू मलकीसदेकासारखे
11जर लेवी याजकपणाच्या संबंधात लोकांना खरोखर नियमशास्त्र प्राप्त झाले होते व त्यामुळे पूर्णता प्राप्त झाली असती, याजकपण स्थिर करता आले असते तर दुसर्या याजकाची गरज का होती, की जो मलकीसदेकाच्या संप्रदायाप्रमाणे आणि अहरोनाच्या संप्रदायाप्रमाणे नसावा? 12जेव्हा याजकपण बदलले, तेव्हा नियमात सुद्धा बदल होणे आवश्यक आहे. 13कारण ज्याच्याबद्दल या गोष्टी सांगितल्या होत्या तो एका असामान्य, वेगळ्या वंशातील होता; त्या वंशातल्या कोणीही वेदीवर सेवा केली नव्हती. 14हे स्पष्ट आहे की आपले प्रभू यहूदाहच्या वंशातून आले आणि याजकांबद्दल त्या वंशाविषयी मोशे काही म्हणाला नाही. 15आणि जे काही आम्ही म्हटले ते अधिक स्पष्ट आहे की मलकीसदेकासारखा दुसरा याजक प्रकट होईल. 16ते पूर्वजांच्या नियमानुसार नव्हे, तर ज्या जीवनाचा अंत होऊ शकत नाही अशा जीवनापासून वाहणार्या सामर्थ्याच्या आधारावर याजक झाले; 17हे असे जाहीर करते:
“मलकीसदेकाच्या संप्रदायाप्रमाणे
तू सदासर्वकाळचा याजक आहेस.”#7:17 स्तोत्र 110:4
18पूर्वीचा नियम बाजूला ठेवण्यात आला, कारण तो कमकुवत व निरुपयोगी होता. 19(कारण नियमशास्त्राने काहीही परिपूर्ण केले नाही), आणि अधिक चांगल्या आशेची ओळख झाली आहे, ज्याद्वारे आपण परमेश्वराजवळ जातो.
20आणि हे शपथेवाचून झाले नाही! दुसरे शपथ न घेता याजक झाले. 21परंतु तो शपथ घेऊन याजक झाला, जेव्हा परमेश्वर त्याला म्हणाले,
“प्रभूने शपथ घेतली आहे
आणि ते त्यांचे मन कदापि बदलणार नाहीत:
‘तू सदासर्वकाळचा याजक आहेस.’ ”#7:21 स्तोत्र 110:4
22कारण या शपथेमुळे, येशू अधिक चांगल्या कराराची हमी घेणारे झाले आहेत.
23आता असे पुष्कळ याजक होऊन गेले, जे मृत झाल्यामुळे त्यांची सेवा सातत्याने करू शकले नाहीत. 24पण येशू सदासर्वकाळ जिवंत आहेत; त्यांचे याजकपण युगानुयुगचे आहे. 25यास्तव त्यांच्याद्वारे परमेश्वराकडे येणार्या सर्वांचे पूर्णपणे तारण करण्यास ते समर्थ आहेत, कारण त्यांच्यासाठी मध्यस्थी करण्यास ते सदासर्वदा जिवंत आहेत.
26असे महायाजक खरोखर आपल्या गरजा भागविण्यास समर्थ आहेत—ते पवित्र, निर्दोष, शुद्ध, आणि पापी माणसांपासून वेगळे केलेले, स्वर्गाहून अधिक उंच केलेले आहेत. 27त्यांना त्या महायाजकांप्रमाणे प्रथम स्वतःच्या पापांसाठी, मग लोकांच्या पापांसाठी दिवसेंदिवस यज्ञ करण्याची गरज नाही; कारण त्यांनी त्यांच्या पापासाठी एकदाच यज्ञ करून स्वतःला अर्पण केले. 28नियमशास्त्र दुर्बलतेने भरलेल्या माणसांना महायाजक नेमते; पण नियमशास्त्रानंतर आलेली शपथ ती जो युगानुयुग परिपूर्ण आहे त्या पुत्राला नेमते.
सध्या निवडलेले:
इब्री 7: MRCV
ठळक
सामायिक करा
कॉपी करा
तुमचे हायलाइट तुमच्या सर्व डिव्हाइसेसवर सेव्ह करायचे आहेत? साइन अप किंवा साइन इन
पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती™
ग्रंथाची मालकी © 1978, 1982, 2008, 2021, 2022, 2024 Biblica, Inc.
यांची परवानगी घेऊन केले गेले आहे.
सर्व अधिकार जगभरात राखीव.
Holy Bible, Marathi Contemporary Version™
Copyright © 1978, 1982, 2008, 2021, 2022, 2024 by Biblica, Inc.
Used with permission.
All rights reserved worldwide.