56
यहूदीतर लोकांसाठी तारण
1याहवेह असे म्हणतात:
“न्यायीपणाने वागा,
जे योग्य तेच करा,
कारण माझे तारण अगदी हाताशी आलेले आहे
आणि माझे नीतिमत्व लवकरच प्रगट होणार आहे.
2जो शब्बाथाच्या दिवसास अपवित्र न करता त्याचे पालन करतो,
अयोग्य गोष्ट करण्यापासून स्वतःला आवरतो,
या सर्व गोष्टींवर अढळ राहतो,
जो असे वागतो, तो मनुष्य धन्य होय.”
3जो विदेशी मनुष्य याहवेहशी एकनिष्ठ राहतो, त्याने असे म्हणू नये,
“याहवेह निश्चितच मला त्यांच्या लोकांमघून वगळतील.”
आणि कोणत्याही षंढाने अशी तक्रार करू नये,
“मी तर केवळ एक शुष्क वृक्ष आहे.”
4तर याहवेह असे म्हणतात:
“जे षंढ माझे शब्बाथ पवित्रपणे पाळतात,
जे मला आवडणार्या गोष्टीच निवडतात,
आणि माझा करार दृढ धरून राहतात—
5त्यांना मी माझ्या मंदिरामध्ये व त्याच्या भिंतीच्या आत
पुत्र व कन्यापेक्षाही चांगले असे
संस्मरणीय बनवेन व एक नाव देईन.
त्यांना मी सर्वकाळ टिकणारे नाव देईन,
जे नाव कधीही नाहीसे होणार नाही.
6आणि जे विदेशी याहवेहशी एकनिष्ठ राहतात,
जे त्यांची सेवा करतात,
त्यांच्या नावावर प्रीती करतात,
आणि त्यांचे सेवक झाले आहेत,
जे सर्व त्यांच्या शब्बाथास अपवित्र न करता त्याचे पालन करतात,
आणि माझा करार दृढ धरून राहतात—
7अशांना मी माझ्या पवित्र पर्वतावर आणेन
आणि माझ्या प्रार्थना मंदिरामध्ये त्यांना आनंदित करेन.
त्यांच्या होमार्पणे व अर्पणांचा
माझ्या वेदीवर स्वीकार केला जाईल;
कारण माझ्या घराला
सर्व राष्ट्रांसाठी प्रार्थनेचे घर असे म्हणतील.”
8जे इस्राएलच्या निर्वासित झालेल्यांना एकत्र करतात,
ते सार्वभौम याहवेह अशी घोषणा करतात—
“ज्यांना पूर्वी एकत्र करण्यात आले आहे, त्या लोकांशिवाय
इतर लोकांनाही मी त्यांच्यात गोळा करेन.”
दुर्जनांविरुद्ध परमेश्वराचे आरोप
9या, कुरणातील सर्व पशूंनो,
या, रानातील सर्व हिंस्र श्वापदांनो, येऊन आधाशीपणे खा!
10इस्राएलचे पहारेकरी आंधळे आहेत,
ते सर्व ज्ञानशून्य आहेत;
ते सर्व मुके कुत्रे आहेत,
त्यांना भुंकता येत नाही;
ते पडून राहतात व स्वप्ने पाहतत,
त्यांना झोपायला फार आवडते.
11ते कुत्र्याप्रमाणे खूप खादाड आहेत;
त्यांची तृप्ती कधीही होत नाही.
ते असमंजस मेंढपाळ आहेत;
ते सर्व आपल्याच मर्जीने चालतात,
केवळ स्वतःच्या स्वार्थाची काळजी घेतात.
12प्रत्येकजण म्हणतो, “या, मला मद्य आणू द्या!
चला, मद्य पिऊन आपण धुंद होऊ या!
आणि उद्याचा दिवसही आजसारखाच असेल,
किंबहुना याहून जास्त चैनीचा असेल.”