57
1नीतिमान नष्ट होतात,
आणि ते कोणीही मनावर घेत नाही;
दयाळू माणसे उचलून घेतली जातात,
आणि कोणालाही हे उमगत नाही
कि भावी काळातील अनर्थापासून
राखण्यासाठीच त्यांना नेण्यात येते.
2जे नीतिमार्गाने चालतात
ते शांती पावतात;
त्यांच्या मरणोत्तर त्यांना विसावा प्राप्त होतो.
3“पण तुम्ही—अहो चेटकिणीच्या पुत्रांनो,
जारकर्मींच्या व वेश्यांच्या संतानांनो, तुम्ही इकडे या!
4तुम्ही कोणाची चेष्टा करता?
कोणाकडे पाहून नाके मुरडता
व आपल्या जिभा दाखविता?
तुम्ही बंडखोरांची पिल्ले
व लबाडांची संतती नाही काय?
5एला वृक्षाच्या झाडीत आणि प्रत्येक घनदाट वृक्षाच्या सावलीत
तुम्ही कामांध होता;
खोल दर्यात, खडकांच्या कड्याखाली
नरबळी म्हणून आपल्या लेकरांचे बळी देता.
6खडकांच्या कड्याखालील गुळगुळीत दगडाच्या मूर्ती ही तुझी दैवते आहेत;
खरोखर, हाच तुझा भाग आहे.
होय, त्यांनाच तू पेयार्पणे करते
आणि अन्नार्पणे करते.
हे सर्व बघून, मला पाझर फुटेल का?
7डोंगरमाथ्यांवर व अत्यंत उच्चस्थानी तू आपला बिछाना बनविला आहेस;
तिथे वर जाऊन तू तुझी अर्पणे वाहिली.
8बंद दरवाज्यामागे व उंबरठ्यावर
तू तुझ्या अन्य दैवतांची चिन्हे लावली आहेस.
माझा नकार करून, तू तुझा बिछाना उघडा केला आहेस,
त्यावर तू झोपून तो आणखी जास्त उघडला आहेस;
ज्यांचा बिछाना तुला प्रिय वाटतो, त्यांच्याशी तू समेट केला आहे,
आणि त्यांच्या नग्न शरीराकडे तू कामातुर नजरेने बघते.
9मोलखाला#57:9 किंवा राजा तू जैतुनाचे तेल वाहिले
व तुझी सुगंधी अत्तरे वाढवून अर्पण केलीस.
तू तुझ्या दूतांना#57:9 किंवा मूर्त्या दूरवर पाठविले;
अगदी प्रत्यक्ष मृतलोकांच्या राज्यापर्यंत गेलीस.
10हे सर्व करून तू स्वतःला थकवून टाकले,
पण तू असे म्हटले नाही, ‘हे किती निराशाजनक आहे.’
स्वतःला नव्या बलाने संचारित केले,
म्हणून तू मूर्छित झाली नाही.
11“इतकी दहशत व भीती तुला कोणाची वाटते
कि तू माझ्याशी असत्याने वागते,
तू माझे स्मरण केले नाही
कि हे मनावरही घेतले नाही?
मी बराच काळ निःशब्द राहिलो आहे
म्हणून का तुला माझा धाक वाटत नाही?
12मी तुझे नीतिमत्व आणि तुझी कर्मे उघडकीस आणेन,
आणि ती तुला लाभदायक होणार नाही.
13जेव्हा तू मदतीसाठी धावा करशील,
तुझ्या संग्रहातील मूर्तींना तुझा बचाव करू दे!
वारा त्या सर्वांना उडवून नेईल,
श्वासाच्या एका फुंकराने त्या उडून जातील.
परंतु जो कोणी माझा आधार घेतो
तो या भूमीचा ताबा घेईल
व माझ्या पवित्र पर्वताचा स्वामी होईल.”
पश्चात्ताप करणाऱ्याचे सांत्वन
14आणि असे म्हणण्यात येईल:
“बांधा, बांधा, महामार्ग बांधा!
माझ्या लोकांच्या वाटेतील सर्व अडथळे बाजूला करा.”
15जे अनंतकाळ अस्तित्वात आहेत, ज्यांचे नाम पवित्र आहे
जे सर्वोच्च व परमथोर आहेत, ते म्हणतात—
“मी परमोच्च व पवित्रस्थानी राहतो,
परंतु जे पश्चात्तापी व आत्म्याने लीन आहेत, अशांसोबतही राहतो,
मी नम्र जणांच्या आत्म्यांना ताजेतवाने करतो
व पश्चात्तापी अंतःकरणाच्या लोकांना नवा धीर देतो.
16मी त्यांना कायमचे दोषी ठरविणार नाही,
नेहमीच क्रोध प्रकट करणार नाही,
नाहीतर मी प्रत्यक्ष माझ्या हातांनी घडवले लोक
माझ्यामुळे मूर्छित होतील.
17मी त्यांच्या पापमय लोभामुळे संतापलो;
आणि त्यांना ताडण केले व माझे मुख रागाने लपविले,
तरी त्यांनी स्वेच्छेने करण्याचे सोडले नाही.
18त्यांची वर्तणूक मी पाहिली आहे, तरीही मी त्यांना निरोगी करेन;
मी त्यांचे मार्गदर्शन करेन व इस्राएलच्या दुःखितांचे सांत्वन परत देईन,
19त्यांच्या ओठांवर प्रशंसा निर्माण करेन.
शांती, शांती, दूरच्या व जवळच्या सर्वांना शांतीचा लाभ होवो,
आणि मी त्या सर्वांना बरे करेन.”
असे याहवेह म्हणतात.
20परंतु दुष्ट लोक खवळलेल्या सागरांसारखे आहेत,
ज्याला विसावा नसतो,
ज्याच्या लाटा उसळून चिखल व गाळ बाहेर टाकतात.
21माझे परमेश्वर म्हणतात, “दुष्टांना शांती नसते.”