YouVersion लोगो
सर्च आयकॉन

शास्ते 20

20
इस्राएली बिन्यामीन गोत्रांना शिक्षा देतात
1तेव्हा दानपासून ते बेअर-शेबापर्यंतचे आणि गिलआदाच्या प्रदेशातून सर्व इस्राएली एकत्र आले आणि मिस्पाह येथे याहवेहसमोर जमा झाले. 2इस्राएलाच्या सर्व गोत्रप्रमुखांनी परमेश्वराच्या लोकांच्या सभेत आपले स्थान घेतले, जे तलवारीने सज्ज असलेले चार लाख लोक होते. 3(बिन्यामीन लोकांनी ऐकले की इस्राएल लोक वर मिस्पाह येथे गेले आहे.) जेव्हा इस्राएली लोकांनी म्हटले, “आम्हाला सांग हे दुष्कर्म कसे घडले.”
4तेव्हा तो लेवी, ज्या स्त्रीची हत्या करण्यात आली होती तिचा पती म्हणाला, “मी आणि माझी उपपत्नी बिन्यामीनच्या गिबियाह येथे रात्र घालविण्यास आलो. 5रात्रीच्या वेळेस गिबियाहतील लोक माझ्यामागे आले आणि घरास वेढा घातला व माझा घात करण्याचा त्यांचा बेत होता. त्यांनी माझ्या उपपत्नीवर बलात्कार केला आणि ती मरण पावली. 6तेव्हा मी उपपत्नीला घेतले आणि तिच्या शरीराचे कापून बारा तुकडे केले व ते इस्राएलांच्या वारसांच्या सर्व प्रांतात पाठवून दिले, कारण इस्राएलात त्यांनी हे अपवित्र आणि घृणास्पद कृत्य केले. 7तर आता इस्राएलांच्या सर्व लोकांनो, बोला आणि तुम्ही कोणता निर्णय घेतला ते मला सांगा.”
8सर्व पुरुष एकत्र उठून एकमुखाने म्हणाले, “आपल्यापैकी कोणीही घरी परतणार नाही. नाही, आपल्यापैकी कोणीही त्याच्या घरी परतणार नाही. 9पण आता आम्ही हे गिबियाहविषयी करणार: आपण चिठ्ठ्या टाकून त्याच्या क्रमानुसार त्यांच्या विरोधात जाऊ. 10आपण इस्राएलाच्या सर्व गोत्रांतून शंभरातून दहा आणि हजारातून शंभर आणि दहा हजारातून एक हजार पुरुष निवडू आणि हे सैन्याकरिता भोजनसामुग्री आणतील. जेव्हा ते सैन्य बिन्यामीनच्या गेबा#20:10 किंवा गेबा येथे पोहोचेल, तेव्हा इस्राएलात त्यांनी केलेल्या भयंकर घृणास्पद कृत्याबद्दल शिक्षा करेल.” 11अशा रीतीने सर्व इस्राएली लोक एकत्र आले आणि त्यांनी शहराविरुद्ध एकजूट केली.
12मग इस्राएली गोत्रांनी, सर्व बिन्यामीन गोत्राकडे दूत पाठवून विचारले, “तुमच्यामध्ये ही भयंकर गोष्ट झाली आहे ती काय आहे? 13गिबियाह नगरातील या दुष्कर्म्यांना आमच्या स्वाधीन करा म्हणजे आम्ही त्यांना ठार मारू आणि इस्राएलातील दुष्टता काढून टाकू.”
परंतु बिन्यामीन लोक आपले भाऊबंद इस्राएलींचे ऐकेनात. 14बिन्यामीन वंशज आपल्या नगरातून येऊन ते गिबियाह येथे इस्राएली लोकांविरुद्ध युद्ध करण्यास एकत्र झाले. 15बिन्यामीन लोकांनी ताबडतोब आपआपल्या नगरांतून सव्वीस हजार तलवार चालविण्यास निपुण अशी माणसे आणि गिबियाह येथील स्थानिक सातशे कुशल तरुण जमविले. 16या सर्व सैनिकांमध्ये सातशे निवडक पुरुष डावखुरे होते. ते एवढे नेमबाज होते की त्यांच्या गोफणीचा नेम केसभरदेखील चुकत नसे.
17बिन्यामीन गोत्राला सोडून इस्राएलांच्या सेनेतील तलवार चालविण्यास निपुण पुरुषांची संख्या चार लाख होती, ते सर्व योद्धे होते.
18इस्राएली लोक वर बेथेल#20:18 किंवा परमेश्वराचे घर येथे गेले आणि परमेश्वराशी मसलत केली. ते म्हणाले, “बिन्यामीन लोकांशी लढण्यासाठी आमच्यातील कोण प्रथम वर जाईल?”
याहवेहने उत्तर दिले, “यहूदाहने प्रथम जावे.”
19इस्राएली लोक दुसर्‍या दिवशी उठले आणि त्यांनी गिबियाहजवळ तळ दिला. 20मग इस्राएली लोक हे बिन्यामीन लोकांशी लढण्यासाठी गेले आणि त्यांनी गिबियाह येथे त्यांच्याविरुद्ध युद्धाची व्यूहरचना केली. 21बिन्यामीन लोक गिबियाहतून बाहेर आले आणि त्यांनी त्या दिवशी युद्धभूमीवर इस्राएली लोकांचे बावीस हजार पुरुष ठार केले. 22परंतु इस्राएली लोकांनी एक दुसर्‍यांना प्रोत्साहन दिले आणि पहिल्या दिवशी ज्या ठिकाणी मोर्चा दिला होता, दुसर्‍या दिवशी त्याच ठिकाणी पुन्हा मोर्चा दिला. 23इस्राएली लोक वर गेले आणि याहवेहपुढे संध्याकाळपर्यंत रडले आणि त्यांनी याहवेहला विचारले. ते म्हणाले, “आमचे बिन्यामीन भाऊबंद यांच्याविरुद्ध युद्ध करण्यास आम्ही परत वर जावे का?”
याहवेहने उत्तर दिले, “वर जाऊन हल्ला करा.”
24दुसर्‍या दिवशी इस्राएली लोकांनी बिन्यामीन लोकांवर हल्ला केला. 25या वेळेस जेव्हा बिन्यामीन लोक त्यांच्या विरोध करण्यास गिबियाहतून बाहेर आले, तेव्हा त्यांनी इस्राएली लोकांचे आणखी अठरा हजार पुरुष ठार केले, जे सर्व तलवारीने सशस्त्र होते.
26मग संपूर्ण इस्राएली लोक, संपूर्ण सेना वर बेथेल येथे गेली आणि तिथे ते याहवेहसमोर रडत बसले. त्या दिवशी त्यांनी संध्याकाळपर्यंत उपवास केला आणि याहवेहला होमबली व शांत्यर्पणे अर्पिली. 27आणि इस्राएली लोकांनी याहवेहला विचारले. (त्या समयी परमेश्वराचा कराराचा कोश तिथे होता, 28एलअज़ाराचा पुत्र व अहरोनाचा नातू फिनहास हा तिथे कोशापुढे सेवा करीत होता.) त्यांनी विचारले, “आम्ही पुन्हा जाऊन आमचा इस्राएली भाऊबंद बिन्यामीन याविरुद्ध लढावे किंवा नाही?”
याहवेहने उत्तर दिले, “जा, कारण उद्या मी त्यांना तुमच्या हातात देणार आहे.”
29तेव्हा इस्राएलने गिबियाहच्या सभोवती दबा धरणारे बसविले. 30तिसर्‍या दिवशी इस्राएली लोकांनी बिन्यामीनच्या लोकांविरुद्ध युद्ध केले आणि पूर्वीप्रमाणे त्यांनी गिबियाहजवळ व्यूहरचना केली. 31बिन्यामीन लोक त्यांच्यावर हल्ला करण्यास बाहेर आले आणि माघार घेत असलेल्या इस्राएली लोकांनी त्यांना शहरापासून दूर नेले. पूर्वी केले त्याप्रमाणे बिन्यामीन पुरुषांनी इस्राएली पुरुषांना बेथेल आणि गिबियाह यांच्यामधील मार्गावर ठार करण्यास सुरुवात केली. तेव्हा इस्राएलांपैकी सुमारे तीस माणसे ठार झाली. 32मग बिन्यामीन लोक बोलू लागले, “आपण पहिल्याप्रमाणेच त्यांचा पराभव करीत आहोत!” परंतु इस्राएली लोक म्हणाले, “चला आपण पळण्यास सुरू करू आणि त्यांना शहरापासून दूर मार्गावर घेऊन येऊ.”
33सर्व इस्राएली लोक आपल्या ठिकाणाहून उठले आणि बआल-तामार येथे युद्धाची व्यूहरचना केली आणि इस्राएली लोक गेबाच्या पश्चिमेला दबा धरून बसले होते. 34मग इस्राएलातील निवडलेले दहा हजार तरुण पुरुष गिबियाहवर चालून आले. युद्ध एवढे भयंकर झाले की आपल्यावर मोठा अनर्थ येऊन ठेपला आहे, याची बिन्यामीन लोकांना काही कल्पना नव्हती. 35तेव्हा याहवेहने बिन्यामीनांचा इस्राएलपुढे पराभव केला आणि त्या दिवशी इस्राएली लोकांनी बिन्यामीनातील पंचवीस हजार शंभर लोक ठार केले, हे सर्व तलवारीने सशस्त्र होते. 36तेव्हा बिन्यामीन लोकांनी पाहिले की त्यांच्या पराभव झाला आहे.
इस्राएली लोक हे बिन्यामीन लोकांपुढून बाजूला झाले, कारण त्यांचा गिबियाहजवळ दबा धरून असलेल्या लोकांवर भरवसा होता. 37जे दबा धरून बसलेले होते त्यांनी अचानक गिबियाहवर हल्ला केला आणि ते शहरात पसरले आणि पूर्ण शहराचा तलवारीने नाश केला. 38इस्राएली लोक आणि दबा धरून बसलेले यांच्यात अशी सांकेतिक खूण ठरली होती की शहरातून धुराचा मोठा लोट वर चढेल असे करावे, 39आणि मग इस्राएली लोक पलटवार करतील.
बिन्यामीन लोकांनी इस्राएली पुरुष (सुमारे तीस) ठार केले आणि ते म्हणाले, “आपण त्यांचा पहिल्या युद्धाप्रमाणेच पराभव करीत आहोत.” 40परंतु जेव्हा शहरातून धुराचा लोट वर चढू लागला, तेव्हा बिन्यामीन लोकांनी मागे वळून पाहिले आणि संपूर्ण शहरातून धुराचा लोट वर आकाशात चढत असल्याचे त्यांना दिसले. 41नंतर इस्राएली लोकांनी पलटवार केला आणि बिन्यामीन लोक घाबरून गेले आणि त्यांना कळून आले की त्यांच्यावर भयंकर संकट आले आहे. 42म्हणून ते इस्राएली लोकांपुढून रानाकडे पळू लागले, परंतु युद्धापासून वाचू शकले नाही. आणि इस्राएली लोकांनी ते ज्या नगरातून निघाले होते त्यांना तिथेच ठार मारले. 43त्यांनी बिन्यामीन लोकांचा पाठलाग करीत गिबियाहच्या पूर्वेस त्यांना वेढले आणि त्यांना सहज तुडविले. 44बिन्यामीन लोकांचे अठरा हजार लोक ठार झाले, ते सर्व वीर योद्धे होते. 45जसे ते मागे वळले आणि रानात रिम्मोनाच्या खडकाकडे पळाले, परंतु इस्राएली लोकांनी वाटेतच त्यांच्यापैकी पाच हजार पुरुषांना ठार केले आणि पुढे बिन्यामीन लोकांचा गिदोमापर्यंत पाठलाग करून त्यांचे आणखी पुरुष दोन हजार पुरुष मारून टाकले.
46त्या दिवशी बिन्यामीनचे पंचवीस हजार तलवार चालविणारे मारले गेले, जे सर्व वीर योद्धे होते. 47पण त्यापैकी सहाशे पुरुष वळले आणि रानात रिम्मोन खडकावर पळून गेले आणि तिथे ते चार महिने राहिले. 48मग इस्राएली पुरुष परत बिन्यामीन लोकांकडे गेले आणि त्यांनी संपूर्ण नगर व पशू आणि त्यांना जे मिळाले त्या सर्वांना तलवारीने मारले. जी नगरे त्यांना आढळली त्या सर्वांना त्यांनी जाळून भस्मसात केले.

सध्या निवडलेले:

शास्ते 20: MRCV

ठळक

सामायिक करा

कॉपी करा

None

तुमचे हायलाइट तुमच्या सर्व डिव्हाइसेसवर सेव्ह करायचे आहेत? साइन अप किंवा साइन इन