YouVersion लोगो
सर्च आयकॉन

शास्ते 7

7
गिदोन मिद्यान्यांचा पराभव करतो
1अगदी पहाटेस यरूब्बआल (म्हणजे गिदोन) आणि त्याचे सर्व लोक हरोदाच्या झर्‍यापर्यंत गेले. मिद्यान्यांचा तळ त्यांच्या उत्तरेस मोरेह डोंगराजवळ खोर्‍यात होता. 2याहवेह गिदोनाला म्हणाले, “तुझ्याकडे खूप जास्त लोक आहेत. मी मिद्यानी लोकांना तुमच्या हातात देणार नाही; नाहीतर इस्राएलचे लोक माझ्यासमोर गर्व करून म्हणतील की, ‘आमच्याच बळाने आम्ही स्वतःला वाचविले आहे.’ 3आता सैन्यांना सूचना दे, ‘जर कोणी घाबरत असतील, तर त्यांनी गिलआद डोंगरावरून माघारी जावे.’ ” त्यामधून बावीस हजार लोक परत गेले व दहा हजार राहिले.
4परंतु याहवेह गिदोनास म्हणाले, “अजूनही पुष्कळ लोक आहेत. त्यांना पाण्याजवळ घेऊन चल आणि तिथे मी त्यांना पारखून त्यांची संख्या तुझ्यासाठी कमी करेन. जर मी म्हणालो, ‘हा तुझ्याबरोबर जाईल,’ तो तुझ्याबरोबर जाईल; पण जर मी म्हणालो, ‘हा तुझ्याबरोबर जाऊ नये,’ तर त्याने तुझ्याबरोबर जाऊ नये.”
5म्हणून गिदोनाने त्या माणसांना पाण्याजवळ नेले. तिथे याहवेहने त्याला सांगितले, “जे कुत्र्याप्रमाणे पाणी जिभेने पितात त्यांना जे गुडघे टेकून पाणी पितात त्यांच्यापासून वेगळे करा.” 6त्यांच्यापैकी तीनशे जण होते जे पाणी आपल्या तोंडाजवळ घेऊन, कुत्र्यांसारखे चाटून पाणी प्याले. बाकी सर्व गुडघे टेकून पाणी प्याले.
7याहवेहने गिदोनाला सांगितले, “जे चाटून पाणी प्याले, त्या तीनशे लोकांच्या साहाय्यानेच मी तुम्हाला सोडवेन आणि मिद्यानी लोकांना तुमच्या हाती देईन. बाकी सर्वांना तू घरी पाठवून दे.” 8गिदोनाने बाकीच्या इस्राएली लोकांना घरी पाठवून दिले, परंतु त्याच्याजवळ फक्त तीनशे लोकच ठेवले, ज्यांनी इतरांकडून अन्नसामुग्री व रणशिंगे घेतली.
त्याच्या खाली खोर्‍यात मिद्यानी लोक आपल्या छावणीत होते. 9त्या रात्री, याहवेह गिदोनास म्हणाले, “ऊठ, खाली छावणीवर चाल कर, कारण मी त्यांना तुझ्या हातात देणार आहे. 10परंतु तुला हल्ला करण्यास भीती वाटत असेल, तर तुझा सेवक पुराहला आपल्याबरोबर घे 11आणि ते काय बोलत आहे ते ऐक. त्यानंतर तू हल्ला करण्यास उत्साहित होशील.” तेव्हा तो आणि त्याचा सेवक पुराह छावणीच्या सीमेपर्यंत खाली उतरले. 12मिद्यानी, अमालेकी आणि पूर्वेकडील इतर देशांचे लोक टोळांप्रमाणे त्या खोर्‍यात दाटीने पसरले होते. त्यांचे उंट समुद्र किनार्‍यावरील वाळूप्रमाणे इतके अधिक होते की, त्यांची गणती करणे शक्य नव्हते.
13गिदोन तिथे पोहोचला तेव्हा एक मनुष्य आपल्या सोबत्याला स्वप्न सांगत होता. तो म्हणत होता, “मला एक स्वप्न पडले, एक जवाची गोल भाकर घरंगळत मिद्यानी छावणीत आली. तिने आपल्या तंबूला असा जोराचा धक्का दिला की तो तंबू उलटला आणि जमिनीवर भुईसपाट झाला.”
14त्याच्या सोबत्याने उत्तर दिले, “हे इस्राएलातील योआशाचा पुत्र गिदोनाच्या तलवारीशिवाय दुसरे काही नाही. परमेश्वराने मिद्यानी व त्यांची संपूर्ण छावणी त्याच्या हाती दिली आहे.”
15जेव्हा गिदोनाने स्वप्न व त्याचा अर्थ ऐकला, तेव्हा तिथे त्याने दंडवत घातले आणि उपासना केली. तो इस्राएली लोकांच्या छावणीत लोकांकडे परतला आणि म्हणाला, “उठा! कारण मिद्यानी लोकांची छावणी याहवेहने तुमच्या हातात दिली आहे.” 16मग गिदोनाने आपल्या तीनशे सैनिकांच्या तीन तुकड्या केल्या आणि प्रत्येकाला एक रणशिंग व मातीचे एक रिकामे मडके दिले, त्या मडक्यात एकेक मशाल होती.
17तो त्यांना म्हणाला, “माझ्याकडे पाहत राहा आणि जसे मी करतो तसे करा. मी छावणीच्या सीमेवरील टोकावर पोहोचल्यावर जसे मी करतो तसेच करा. 18मी व माझ्यासोबत असलेल्या सर्वांनी आमची रणशिंगे फुंकल्यानंतर तुम्हीही छावणीच्या सर्व बाजूंना तुमची रणशिंगे फुंका आणि मोठ्याने ओरडून म्हणा, ‘याहवेहसाठी व गिदोनासाठी.’ ”
19गिदोन आणि त्याच्या बरोबरची शंभर माणसे मध्य पहाटेच्या सुरुवातीला पहारा बदलल्यानंतर छावणीच्या टोकाला पोहोचले. त्यांनी रणशिंग फुंकले आणि त्यांच्या हातातील मडके फोडले. 20तीनही दलांनी रणशिंग फुंकले आणि मडके फोडले. आपल्या डाव्या हातात मशाली धरून आणि उजव्या हातात रणशिंगे धरून जे फुंकणार होते, ते ओरडले, “याहवेहसाठी आणि गिदोनासाठी तलवार!” 21प्रत्येक व्यक्ती छावणीच्या सभोवताली आपल्या स्थानी उभे राहिले, सर्व मिद्यानी लोक पळू लागले, ते पळत असता मोठ्याने ओरडत पळाले.
22जेव्हा तीनशे रणशिंगे फुंकली, याहवेहने छावणीतील संपूर्ण पुरुषांची तलवार त्यांच्याच साथीदारावर चालविली. सैन्य सरेराहनजीकच्या बेथ-शिट्टाहपर्यंत व टब्बाथा नजीकच्या आबेल-महोलाहच्या सीमेपर्यंत पळून गेले. 23तेव्हा नफताली, आशेर व मनश्शेहमधील इस्राएली लोकांना बोलाविले गेले आणि त्यांनी मिद्यान्यांचा पाठलाग केला. 24गिदोनाने एफ्राईमच्या सर्व डोंगराळ प्रदेशात आपले दूत पाठवून हा संदेश दिला, “खाली येऊन मिद्यानाशी लढून बेथ-बाराहपर्यंत यार्देन नदीचे उतार रोखून धरा.”
म्हणून एफ्राईमच्या सर्व लोकांना बोलाविण्यात आले आणि त्यांनी बेथ बारापर्यंत यार्देन नदीचा उतार रोखून धरला. 25त्यांनी ओरेब व जेब नावांच्या दोन मिद्यानी पुढार्‍यांनाही पकडले. त्यांनी ओरेबाला ओरेबाच्या खडकावर मारले आणि जेबाला जेबाच्या द्राक्षकुंडाजवळ मारले. मग इस्राएली लोकांनी मिद्यानांचा पाठलाग केला आणि ओरेब व जेब यांची शिरे यार्देनेपलीकडे गिदोनाकडे आणली.

सध्या निवडलेले:

शास्ते 7: MRCV

ठळक

सामायिक करा

कॉपी करा

None

तुमचे हायलाइट तुमच्या सर्व डिव्हाइसेसवर सेव्ह करायचे आहेत? साइन अप किंवा साइन इन