यिर्मयाह 1
1
1बिन्यामीन प्रांतातील अनाथोथ येथील याजकांपैकी हिल्कियाहचा पुत्र यिर्मयाहचे वचन. 2यहूदीयाचा राजा आमोनाचा पुत्र योशीयाह, याच्या राजवटीच्या तेराव्या वर्षी याहवेहचे वचन यिर्मयाहकडे आले, 3आणि यहूदीयाचा राजा, योशीयाहचा पुत्र यहोयाकीम, याच्या राजवटीपासून आणि यहूदीयाचा राजा योशीयाहचा पुत्र सिद्कीयाह याच्या राजवटीच्या अकराव्या वर्षाच्या पाचवा महिना संपला, जेव्हा यरुशलेममधील लोक बंदिवान करून नेण्यात आले तेव्हा.
यिर्मयाहचे पाचारण
4याहवेहचे वचन मला मिळाले ते असे,
5“मी तुला गर्भाशयात घडविण्याच्या पूर्वीपासून ओळखतो#1:5 किंवा निवडले,
तुझा जन्म होण्यापूर्वीच मी तुला समर्पित केले आहे;
आणि राष्ट्रांकरिता माझा संदेष्टा म्हणून तुझी नेमणूक केली आहे.”
6मी म्हटले, “अहो सार्वभौम याहवेह, पाहा, मला तर बोलताही येत नाही; मी केवळ एक कोवळा तरुण आहे.”
7परंतु याहवेह मला म्हणाले, “ ‘मी कोवळा तरुण आहे,’ असे म्हणू नकोस. मी तुला जिथे पाठवेन, तिथे तुला जावे लागेल आणि मी जे तुला सांगेन, ते तुला बोलावे लागेल. 8त्यांना भिऊ नकोस, मी तुला संकटातून सोडविण्यासाठी तुझ्यासह आहे,” याहवेह असे जाहीर करीत आहेत.
9तेव्हा याहवेहने माझ्या मुखाला त्यांच्या हातांनी स्पर्श केला आणि मला म्हटले, “माझे वचन मी तुझ्या मुखात टाकले आहे. 10पाहा, आज मी तुझी काही राष्ट्रे आणि राज्ये उपटून टाकण्यासाठी, काहींचा नाश करण्यासाठी, तर काहींची स्थापना, त्यांचे पालनपोषण करण्यासाठी त्यांच्यावर तुझी नेमणूक करीत आहे.”
11याहवेहचे वचन माझ्याकडे आले: “यिर्मयाह, तुला काय दिसते?”
तेव्हा मी उत्तर दिले, “मला बदाम वृक्षाची फांदी दिसते.”
12याहवेहनी मला म्हटले, “तुला योग्य दिसले, अगदी बरोबर सांगितलेस, मी आपले वचन पूर्ण झालेले पाहत आहे.”
13याहवेहचे वचन पुन्हा मला प्राप्त झाले: “तुला काय दिसते?”
मी उत्तर दिले, “मला उकळत्या पाण्याचे एक भांडे दिसत आहे. ते उत्तरेकडून आमच्या दिशेने तिरपे झालेले आहे.”
14याहवेह मला म्हणाले, “या राष्ट्रात राहणाऱ्या लोकांवर उत्तरेकडून संकट येऊन पडेल. 15मी उत्तरेकडील राष्ट्रांच्या सर्व लोकांना आवाहन केले आहे,” असे याहवेह जाहीर करतात.
“त्यांचे राजे येतील व त्यांची सिंहासने
यरुशलेमच्या प्रवेश व्दारावर स्थापतील.
ते तटाच्या सर्व बाजूला
व यहूदीयाच्या सर्व नगरांविरुद्ध येतील.
16मी माझ्या लोकांविरुद्ध माझ्या न्यायाची घोषणा करेन,
कारण त्यांनी माझा त्याग करण्याचे वाईट कृत्य केले आहे.
इतर दैवतांच्या मूर्तीला धूप जाळला
व स्वतःच्या हस्तकृतींची पूजा केली आहे.
17“तू स्वतःला तयार कर! उठून जा आणि मी तुला सांगतो ते सर्व त्यांना सांग. त्यांना घाबरू नकोस, नाहीतर त्यांच्यासमोर मी तुला भयभीत करेन. 18आज मी तुला तटबंदीचे नगर केले आहे, या संपूर्ण राष्ट्राविरुद्ध उभे राहण्यासाठी लोहस्तंभासारखे व भक्कम कास्य दरवाजांसारखे केले आहे—यहूदीयाचे राजे, त्यांचे अधिकारी, याजक आणि लोक या सर्वांविरुद्धच. 19ते तुझ्याशी युद्ध करतील, परंतु तुझ्यावर विजयी होणार नाही, कारण मी तुझ्यासह आहे आणि तुझा बचाव करेन,” असे याहवेह म्हणतात.
सध्या निवडलेले:
यिर्मयाह 1: MRCV
ठळक
सामायिक करा
कॉपी करा
तुमचे हायलाइट तुमच्या सर्व डिव्हाइसेसवर सेव्ह करायचे आहेत? साइन अप किंवा साइन इन
पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती™
ग्रंथाची मालकी © 1978, 1982, 2008, 2021, 2022, 2024 Biblica, Inc.
यांची परवानगी घेऊन केले गेले आहे.
सर्व अधिकार जगभरात राखीव.
Holy Bible, Marathi Contemporary Version™
Copyright © 1978, 1982, 2008, 2021, 2022, 2024 by Biblica, Inc.
Used with permission.
All rights reserved worldwide.