YouVersion लोगो
सर्च आयकॉन

यिर्मयाह 14

14
अनावृष्टि, दुष्काळ आणि तलवार
1अनावृष्टि संबंधित खुलासा करणारा संदेश याहवेहकडून यिर्मयाहला प्राप्त झाला.
2“यहूदीया विलाप करीत आहे,
तिची नगरे झुरणीला लागली आहेत;
ते या भूमीसाठी शोक करीत आहेत,
आणि यरुशलेममधून आक्रोश वर जात आहेत.
3त्यातील प्रतिष्ठित लोक विहिरीतून पाणी आणण्यासाठी आपले दास पाठवितात;
ते विहिरीवर जातात
परंतु त्यांना पाणी मिळत नाही.
ते रिकामी घागरी घेऊन परत येतात;
गोंधळून व निराश होऊन
आपली डोकी झाकून घेतात.
4जमिनीला भेगा पडल्या आहेत
कारण भूमीवर पाऊस पडलेला नाही;
शेतकरी घाबरले आहेत
म्हणून ते आपली डोकी झाकून घेतात.
5हरिणी देखील
आपली पाडसे शेतात सोडून जात आहे
कारण गवताचा मागमूसही उरला नाही.
6रानगाढवे उजाड टेकड्यांवर उभी राहून
कोल्ह्यागत धापा टाकत आहेत;
अन्नाशिवाय
त्यांची नजर निस्तेज झाली आहे.”
7जरी आमची पापे आमच्याविरुद्ध साक्ष देतात,
तरी हे याहवेह, तुमच्या नामाखातर तुम्ही काहीतरी करा.
आम्ही तुमच्याविरुद्ध नेहमी बंडखोरी केली आहे;
आम्ही तुमच्याविरुद्ध घोर पातक केले आहे!
8तुम्हीच इस्राएलची आशा आहात,
संकटसमयीच्या आमच्या त्रात्या,
तुम्ही या देशात आमच्याशी परकेपणाने का वागता,
केवळ रात्रभर मुक्काम करणार्‍या वाटसरूसारखे का झाला आहात?
9एखाद्या विस्मित झालेल्या व्यक्तीसारखे तुम्ही का आहात?
एखाद्या तारण ने करणाऱ्या वीरासारखे का झालात?
हे याहवेह, तुम्ही तर येथेच आमच्यामध्ये आहात,
आम्ही तुमचे नाव धारण केले आहे;
आमचा त्याग करू नका!
10यावर याहवेहने या लोकांबद्दल असे म्हटले:
“माझ्यापासून दूर भटकणे त्यांना फार आवडते;
ते त्यांची पावले ताब्यात ठेवत नाहीत.
म्हणून याहवेह तुमचा स्वीकार करीत नाहीत;
आता मी तुमची दुष्कर्मे आठवेन
आणि तुमच्या पापांबद्दल तुम्हाला शासन करेन.”
11मग याहवेहने मला म्हटले, “त्यांच्या भल्यासाठी इतःपर प्रार्थना करू नकोस. 12जर ते उपवास करतील, तरी मी त्यांच्या रडण्याकडे मुळीच लक्ष देणार नाही; मला ते होमार्पणे आणि अन्नार्पणे आणतील, मी त्यांचा स्वीकार करणार नाही. याउलट तलवार, दुष्काळ व रोगराई यांनी मी त्यांची परतफेड करेन.”
13परंतु मी म्हटले, “अरेरे, हे सार्वभौम याहवेह! त्यांचे संदेष्टे त्यांना सांगतात, ‘तलवार किंवा दुष्काळ निश्चितच येणार नाहीत. मी या ठिकाणी तुम्हाला खात्रीने स्थायी शांतता देईन.’ ”
14त्यावर याहवेहने मला म्हटले, “संदेष्टे माझ्या नावाने असत्य संदेश सांगत आहेत. मी काही त्यांना पाठविले नाही किंवा त्यांना नेमले नाही वा त्यांच्याशी बोललो नाही. खोट्या दृष्टान्तावरून, प्रकटीकरणांवरून, व्यर्थ शकुनविद्येवरून आणि स्वतःच्या मनाच्या भ्रांतीवरून ते तुम्हाला खोटी भविष्ये सांगतात.” 15म्हणून माझ्या नावाने भविष्यवाणी करणार्‍यांबद्दल याहवेह असे म्हणतात: “मी पाठविले नसतानाही ‘तलवार किंवा दुष्काळ या भूमीला स्पर्श करणार नाही,’ असे बोलणारे हे संदेष्टेच तलवारीला व दुष्काळाला बळी पडतील. 16आणि हे लबाड लोक ज्यांना संदेश देतात तेही तलवारीला व दुष्काळाला बळी पडून यरुशलेमच्या रस्त्यांवर फेकून दिले जातील आणि त्यांना, पत्नी, पुत्र व कन्यांना मूठमाती द्यायलाही कोणी राहणार नाही. कारण मी त्यांच्यावर घोर विपत्ती पाठविणार ज्याला ते पात्र आहेत.
17“हे वचन तू त्यांना सांग:
“ ‘रात्रंदिवस माझ्या नेत्रातून अश्रू वाहू दे
मी माझे रडणे थांबविणार नाही;
माझे लोक, कुमारी कन्या, तिच्यासाठी,
कारण ती जखमांनी घायाळ होऊन
तुडविली गेली आहे.
18नगराबाहेर जाऊन पाहावे तर,
मी तलवारीला बळी पडलेल्यांची प्रेते बघतो;
नगरातून गेलो तर
उपासमारीला बळी पडलेले दिसतात.
संदेष्टे व याजक
त्यांना माहीत नसलेल्या देशात गेले आहेत.’ ”
19तुम्ही यहूदीयाचा पूर्णपणे त्याग केला आहे काय?
सीयोनाचा तुम्हाला वीट आला आहे काय?
तुम्ही आम्हाला अशी वेदना का दिली
म्हणजे आम्हाला कधीही आरोग्य मिळणार नाही?
आम्ही शांतीची आशा केली होती
पण त्यातून काहीही चांगले निष्पन्न झाले नाही,
आरोग्य मिळण्याच्या ऐवजी
सर्वत्र दहशतच पसरली आहे.
20हे याहवेह, आम्ही आमचा दुष्टपणा पदरी घेतो
आणि आमच्या पूर्वजांचा अपराध स्वीकार करतो;
आम्ही निश्चितच तुमच्याविरुद्ध पाप केले आहे.
21तुमच्या नामासाठी आमचा तिरस्कार करू नका;
तुमच्या गौरवी राजासनाची अप्रतिष्ठा करू नका.
आमच्यासह केलेल्या कराराची आठवण करा
आणि तो मोडू नका.
22या मूर्तिपूजक राष्ट्रातील कोणते व्यर्थ दैवत पाऊस पाडू शकेल का?
आकाश स्वतःहून वर्षाव करू शकेल काय?
हे याहवेह, आमच्या परमेश्वरा, हे तुमच्याशिवाय कोणीच करणार नाही.
म्हणूनच आमची आशा तुमच्यावरच आहे,
तुम्हीच हे सर्व करू शकता.

सध्या निवडलेले:

यिर्मयाह 14: MRCV

ठळक

सामायिक करा

कॉपी करा

None

तुमचे हायलाइट तुमच्या सर्व डिव्हाइसेसवर सेव्ह करायचे आहेत? साइन अप किंवा साइन इन