YouVersion लोगो
सर्च आयकॉन

यिर्मयाह 23

23
नीतिमान फांदी
1“धिक्कार असो त्या मेंढपाळांवर जे माझ्या कुरणातील मेंढरांचा नाश करतात व त्यांची पांगापांग करतात!” असे याहवेह जाहीर करतात. 2म्हणून याहवेह, इस्राएलचे परमेश्वर मेंढपाळांना जे माझ्या लोकांची राखण करतात त्यांना असे म्हणतात: “कारण तुम्ही माझ्या कळपाची पांगापांग केली व त्यांना हुसकून लावले आणि त्यांची काळजी घेतली नाही, आता तुम्ही त्यांच्याशी केलेल्या दुष्टपणाबद्दल मी तुमच्यावर शिक्षांचा वर्षाव करेन.” असे याहवेह जाहीर करतात. 3“जिथे माझ्या कळपाला मी पाठविले आहे, तिथून मी माझ्या कळपाच्या अवशेषाला त्या सर्व देशातून एकत्र करून पुन्हा त्यांच्या मेंढवाड्यात आणेन आणि मग ती मेंढरे फलद्रूप होतील व त्यांची संख्यावाढ होईल. 4त्यांची काळजी घेण्यासाठी मी असे मेंढपाळ नेमीन, जे त्यांचे संगोपन करतील, व त्यांना पुन्हा भीती आणि दहशत वाटण्याचे कारण राहणार नाही, तसेच त्यातील कोणी हरविणारही नाही,” असे याहवेह जाहीर करतात.
5याहवेह म्हणतात, “असे दिवस येत आहेत की,
त्या समयी मी दावीदातून#23:5 किंवा दावीदाच्या वंशातून एक नीतिमान शाखा पुन्हा उगवेन,
तो राजा सर्व देशात सुज्ञतेने,
खरेपणाने आणि न्यायाने राज्य करेल.
6तेव्हा यहूदीयाचे रक्षण होईल
आणि इस्राएल सुरक्षिततेने जगेल.
याहवेह आमचे नीतिमान तारणकर्ता#23:6 याहवेह आमचे नीतिमान तारणकर्ता मूळ भाषेत याहवेह सिदकेनू
या नावाने त्यांना संबोधित करण्यात येईल.
7“असे दिवस येत आहेत की,” याहवेह म्हणतात, “शपथ घेताना इस्राएलचे लोक, ‘ज्या जिवंत याहवेहने इस्राएली लोकांना इजिप्त देशातून बाहेर आणले, त्यांच्या जीविताची शपथ’ असे न म्हणता, 8‘ज्या जिवंत याहवेहने इस्राएली लोकांच्या वंशजांना उत्तरेकडील भूमीतून आणि ज्या वेगवेगळ्या देशात पांगविले होते, त्या देशातून परत आणले आहे. त्या जिवंत परमेश्वराची शपथ’ असे म्हणतील. मग ते स्वतःच्या भूमीवर वस्ती करतील.”
खोटे संदेष्टे
9संदेष्ट्याविषयी:
माझे अंतःकरण विदीर्ण झाले आहे;
माझी सर्व हाडे थरथर कापत आहेत.
मद्यप्यासारखा माझा झोक जात आहे,
एखाद्या बलवान पुरुषावर मद्याने मात केली आहे,
कारण याहवेह
व त्यांचे पवित्र शब्द.
10सर्व देश व्यभिचाऱ्यांनी व्यापून टाकला आहे;
कारण शाप त्यांच्यावर येऊन भूमी ओसाड झाली आहे.
अरण्यातील हिरवीगार कुरणे वाळून गेली आहेत,
कारण संदेष्टे दुष्कर्मे करतात
आणि त्यांचे सामर्थ्य अयोग्य रीतीने वापरतात.
11“याजक व संदेष्टे हे दोघेही देवहीन आहेत;
माझ्या मंदिरातही मी त्यांची तिरस्करणीय कृत्ये पाहिली आहेत,”
असे याहवेह म्हणतात.
12“म्हणूनच त्यांचे मार्ग निसरडे होतील;
त्यांना अंधारात हद्दपार करण्यात येईल
आणि तिथे ते पडतील.
ज्या वर्षी त्यांना शिक्षा देईन
मी त्यांच्यावर अरिष्टे आणेन.”
असे याहवेह म्हणतात.
13“शोमरोनच्या संदेष्ट्यांमध्ये
मी ही तिरस्करणीय गोष्ट बघितली:
त्यांनी बआल दैवताच्या नावाने संदेश देऊन
माझ्या इस्राएली लोकांना मार्गभ्रष्ट केले.
14आणि यरुशलेममधील संदेष्ट्यात
मी काही भयानक गोष्टी बघितल्या:
ते व्यभिचार करतात आणि लबाडीत जीवन जगतात.
ते दुष्कर्म्याचे बाहू मजबूत करतात,
जेणेकरून दुष्टतेपासून कोणीही परावृत्त होत नाही.
ते सर्व मला सदोमातील लोकांसारखे वाटतात;
यरुशलेम येथील लोक गमोरातील लोकांसारखे वाटतात.”
15म्हणून सर्वसमर्थ याहवेह संदेष्ट्यांबद्धल असे म्हणतात:
“मी त्यांना खावयास कडू दवणा देईन
व प्यावयास विषारी पाणी देईन,
कारण यरुशलेमच्या संदेष्ट्यांमुळेच
देवहीनता देश व्यापून टाकीत आहे.”
16सर्वसमर्थ याहवेह असे म्हणतात:
“हे संदेष्टे जे संदेश तुम्हाला सांगतात ते ऐकू नका;
ते तुम्हाला खोट्या आशेने भरून टाकतात.
ते त्यांच्या मनाचेच दृष्टान्त सांगतात,
त्यांचे शब्द याहवेहच्या मुखातील नाहीत!
17माझा तिरस्कार करणार्‍या बंडखोरांना ते म्हणतात,
‘याहवेह म्हणतात: तुम्हाला शांतता लाभेल’
आणि जे स्वतःच्या मनाच्या हट्टीपणाने चालतात
त्यांना ते म्हणतात, ‘तुमच्यावर कोणतेही संकट येणार नाही.’
18परंतु त्यांचे वचन काय म्हणते हे बघण्यासाठी वा ऐकण्यासाठी,
त्यांच्यापैकी कोण याहवेहच्या न्यायसभेत राहिला आहे,
कोणी त्यांच्या वचनाकडे कान दिला आहे आणि ते ऐकले आहे?
19पाहा, याहवेहचे भयावह वादळ पाहा.
त्याचा प्रकोपात स्फोट होईल,
दुष्टांच्या मस्तकावर
ते एका वावटळीप्रमाणे येईल.
20याहवेहच्या अंतःकरणाचा उद्देश
पूर्ण झाल्याशिवाय
त्यांचा महाभयंकर क्रोध शांत होणार नाही.
पुढे येणाऱ्या दिवसात
तुला ते अगदी स्पष्टपणे कळेल.
21या संदेष्ट्यांना मी पाठविलेले नाही,
तरीसुद्धा ते त्यांचा संदेश घेऊन धाव घेतात;
मी त्यांच्याशी बोललो नाही,
तरी ते संदेश देतात.
22जर ते माझ्या समक्षतेत उभे राहिले असते,
तर त्यांनी माझ्या लोकांना माझे वचन जाहीर केले असते
आणि ते दुष्ट मार्गापासून परावृत्त झाले असते
व त्यांच्या दुष्टकर्मापासून दूर झाले असते.
23“मी केवळ जवळ असणाराच परमेश्वर आहे काय,
दुरून बघणारा परमेश्वर नाही काय?”
असे याहवेह जाहीर करतात.
24“माझ्यापासून कोणाला गुप्तस्थळी लपून राहता येईल काय?
जेणेकरून मी त्यांना बघू शकणार नाही.”
असे याहवेह जाहीर करतात.
मी स्वर्ग आणि पृथ्वी व्यापून टाकणारा नाही काय?
असे याहवेह जाहीर करतात.
25“माझ्या नावाने खोटे संदेश देणारे संदेष्टे काय म्हणतात ते मी ऐकले आहे. ते म्हणतात, ‘मला स्वप्न पडले! मला स्वप्न पडले!’ 26हा प्रकार या खोट्या संदेष्ट्यांच्या अंतःकरणात किती काळ चालणार, जे त्यांच्या मनाच्या भ्रांतीने भविष्यवाणी करतात? 27त्यांचे पूर्वज बआल दैवताच्या उपासनेमुळे मला विसरले, तसे आपली खोटी स्वप्ने सांगितल्यास माझे लोक मला विसरून जातील असा ते विचार करतात. 28ज्या खोट्या संदेष्ट्यांना स्वप्ने पडतात, त्यांना ती स्वप्ने सांगू दे, परंतु ज्याला माझे वचन प्राप्त झाले आहे, त्याने ते विश्वासूपणे सांगावे. कोंड्याचा गव्हाशी काय संबंध आहे?” असे याहवेह जाहीर करतात. 29याहवेह जाहीर करतात, “माझे वचन अग्नीसारखे ज्वलंत नाही काय? खडक फोडून त्यांचे तुकडे तुकडे करणार्‍या हातोडीसारखे ते नाही काय?
30“जे आपले संदेश एकमेकांपासून माझ्यापासून चोरतात, अशा संदेष्ट्यांच्या मी विरुद्ध उभा आहे,” याहवेह जाहीर करतात. 31होय, याहवेह जाहीर करतात, हा संदेश याहवेहकडून आहे, असे जाहीर करून स्वतःच्या जिभा हेलकावितात, अशा संदेष्ट्यांच्या मी विरुद्ध उभा आहे. 32जे खोटी स्वप्ने सांगून भविष्यवाणी करतात, अशा संदेष्ट्यांच्या मी निश्चितच विरुद्ध उभा आहे, असे याहवेह जाहीर करतात. ते त्यांना वाचाळपणाने लबाडपणे सांगतात आणि माझ्या लोकांना पापाकडे नेतात. याहवेह म्हणतात, “मी त्यांना पाठविले नाही किंवा त्यांना निवडले नाही. या लोकांच्या भल्यासाठी यांचा काहीही उपयोग नाही,” असे याहवेह जाहीर करतात.
खोटे संदेश
33“या लोकांपैकी, या संदेष्ट्यांपैकी, किंवा याजकांपैकी कोणी तुला विचारेल, ‘अरे यिर्मयाह, आज याहवेहकडून काय संदेश आहे?’ तेव्हा तू त्यांना असे उत्तर द्यावेस, ‘कसला संदेश? मी तुम्हाला दूर लोटून टाकणार आहे, असे याहवेह जाहीर करतात.’ 34आणि ‘हा याहवेहकडून आलेला संदेश आहे,’ असे हक्काने सांगणारे संदेष्टे आणि याजक वा इतर कोणीही लोक या सर्वांना आणि त्यांच्या कुटुंबांना मी शासन करेन. 35तुम्ही व इतर इस्राएली एकमेकांना विचारीत असता, ‘याहवेहने काय उत्तर दिले? किंवा याहवेहने काय सांगितले?’ 36परंतु ‘परमेश्वराचा संदेश’ हा शब्दप्रयोग तुम्ही पुन्हा करू नये, कारण तुम्हा प्रत्येकाचे वचन तुमचा व्यक्तिगत संदेश होतो. म्हणून तुम्ही जिवंत परमेश्वर, सर्वसमर्थ याहवेह, आपले परमेश्वर यांच्या वचनाचा विपर्यास करता. 37तुम्ही संदेष्ट्याला सतत विचारता, ‘याहवेहने तुला काय उत्तर दिले? किंवा याहवेहने काय सांगितले?’ 38‘हा याहवेहकडून आलेला संदेश आहे,’ असे हक्काने तुम्ही सांगता, याहवेह असे म्हणतात: ‘हा याहवेहकडून आलेला संदेश आहे,’ मी तुम्हाला हे वापरू नये अशी ताकीद दिल्यानंतरही हे शब्द तुम्ही वापरता. 39म्हणून मी निश्चितच तुम्हाला विसरेन आणि तुम्हाला व तुमच्या पूर्वजांना दिलेल्या या शहराला माझ्या समक्षतेतून घालवून देईन. 40मी तुमची कायमची अप्रतिष्ठा—तुम्हाला कायमचे लज्जास्पद करेन, जे कधीही विसरल्या जाणार नाही.”

सध्या निवडलेले:

यिर्मयाह 23: MRCV

ठळक

सामायिक करा

कॉपी करा

None

तुमचे हायलाइट तुमच्या सर्व डिव्हाइसेसवर सेव्ह करायचे आहेत? साइन अप किंवा साइन इन