यिर्मयाह 26
26
यिर्मयाहला मृत्यूची धमकी
1यहूदीयाचा राजा, योशीयाहचा पुत्र यहोयाकीम याच्या कारकिर्दीच्या प्रारंभी यिर्मयाहला याहवेहकडून हा संदेश मिळाला: 2याहवेह असे म्हणतात, “यहूदीया प्रांताच्या विविध नगरातून लोक उपासना करावयास आले आहेत, तेव्हा तू याहवेहच्या मंदिरासमोर उभा राहा आणि यहूदीया नगरातील सर्व लोकांना जे याहवेहच्या मंदिरात उपासना करण्यास आले त्यांच्याशी बोल. मी तुला सांगितलेले सर्व त्यांना सांग; त्यातील एकही शब्द कमी करू नकोस. 3कारण कदाचित ते ऐकतील आणि आपल्या कुमार्गापासून मागे वळतील; मग त्यांच्या कुकर्माबद्दल मी त्यांना करणार होतो तो विनाश आवरून धरेन. 4त्यांना सांग, ‘याहवेह म्हणतात: जर तुम्ही माझे ऐकणार नाही व मी तुमच्यापुढे ठेवलेले नियम तुम्ही पाळणार नाही, 5आणि मी पाठविलेल्या माझ्या सेवक संदेष्ट्यांचे संदेश तुम्ही ऐकणार नाही, मी माझे संदेष्टे तुम्हाला सावध करण्याकरिता पुनः पुनः पाठविले (पण तुम्ही त्यांच्याकडे लक्ष दिले नाही), 6तर या मंदिरास मी शिलोह आणि या नगरासारखे पृथ्वीवरील सर्व राष्ट्रांमध्ये शाप असे करेन.’ ”
7याजक, संदेष्टे व सर्व लोकांनी यिर्मयाहने याहवेहची आज्ञापिलेली वचने सांगितलेले ऐकले. 8यिर्मयाहने याहवेहची आज्ञापिलेली वचने सांगणे संपविताच याजक, संदेष्टे व मंदिरातील सर्व लोकांनी त्याला घेरून त्याला म्हटले “तू मेलाच पाहिजे! 9तू याहवेहच्या नावाने का भविष्यवाणी करतोस, की हे भवन शिलोहसारखे होईल व हे नगर निर्जन व उजाड होईल?” मग सर्व लोकांनी याहवेहच्या मंदिरात यिर्मयाहभोवती गर्दी केली.
10जेव्हा यहूदीयाच्या अधिकार्यांनी हे ऐकले, तेव्हा ते राजवाड्यातून निघून मंदिराच्या दरवाजापाशी आले व याहवेहच्या मंदिराच्या देवडीत बसले. 11मग याजक व संदेष्टे, अधिकारी व लोकांस म्हणाले, “या मनुष्यास मरणदंड दिलाच पाहिजे, कारण या नगराविरुद्ध याने संदेश दिला आहे, तो तुम्ही आपल्या कानांनी ऐकला आहे!”
12मग यिर्मयाह सर्व अधिकाऱ्यांना आणि सर्व लोकांना म्हणाला: “या मंदिराविरुद्ध आणि या शहराविरुद्ध तुम्ही ऐकलेल्या सर्व गोष्टीसाठी भविष्यवाणी करण्यासाठी याहवेहने मला पाठविले आहे. 13आता तुम्ही तुमचे मार्ग, तुमची कर्मे बदला व याहवेह तुमचे परमेश्वर यांच्या आज्ञा पाळा. मग ते त्यांचे मन बदलतील व तुमच्याविरुद्ध जाहीर केलेली सर्व संकटे रद्द करतील. 14माझ्याबाबतीत म्हणाल, तर मी तुमच्या हातात आहे. तुमच्यामते जे योग्य व वाजवी आहे ते येईल माझे करा. 15परंतु एक गोष्ट नक्की, तुम्ही मला ठार केले, तर एका निरपराध मनुष्याला ठार केल्याचा ठपका तुमच्यावर, या नगरावर व येथील प्रत्येक रहिवाशावर येईल; कारण तुम्ही ऐकलेला प्रत्येक शब्द तुम्हाला सांगण्यासाठी याहवेहने मला पाठविले, हे अगदी सत्य आहे.”
16यावर अधिकारी व लोक, याजकांना आणि संदेष्ट्यांना उद्देशून म्हणाले, “हा मनुष्य मरणदंडाला पात्र नाही, कारण तो आमचे परमेश्वर याहवेहच्या नावाने आमच्याशी बोलला आहे.”
17नंतर काही वडीलजन पुढे आले व संपूर्ण सभेतील लोकांना उद्देशून बोलू लागले, 18“यहूदीयाचा राजा हिज्कीयाह, याच्या कारकिर्दीत मोरेशेथ येथील संदेष्टा मीखाहने संदेश दिला, ‘सर्वसमर्थ याहवेह म्हणतात:
“ ‘सीयोन शेताप्रमाणे नांगरला जाईल,
यरुशलेम दगडांचा ढिगारा होईल,
मंदिराच्या टेकडीवर दाटीने झाडेझुडपे वाढतील.’
19“परंतु यहूदीयाचा हिज्कीयाह राजा व इतर कोणी या संदेशाबद्दल मिखायाहला ठार केले का? हिज्कीयाहला याहवेहचे भय नव्हते काय व त्याने त्यांच्या कृपेची याचना केली नाही का? मग याहवेहनी ठरविलेली विपत्ती त्यांच्यावर आणण्याचा आपला विचार बदलला नाही का? आपण यिर्मयाहला ठार करून स्वतःवर घोर संकट आणणारच होतो!”
20(आता किर्याथ-यआरीम येथील शमायाहचा पुत्र उरीयाह हा याहवेहच्या नावाने संदेश देणारा दुसरा संदेष्टा होता. त्यानेही यिर्मयाहप्रमाणे नगरांविरुद्ध व देशाविरुद्ध या सारखाच संदेश दिला. 21परंतु यहोयाकीम राजा, सेनाधिकारी व इतर अधिकारी वर्ग यांनी त्याचे शब्द ऐकले. तेव्हा राजाने त्याला मारण्याचे ठरविले. ही बातमी उरीयाहाला कळताच तो घाबरून इजिप्त देशात पळून गेला. 22तेव्हा यहोयाकीम राजाने अकबोरचा पुत्र एलनाथान व बरोबर काही माणसे देऊन त्यांना इजिप्त देशी पाठविले. 23इजिप्त देशातून त्यांनी उरीयाहला परत आणले, त्याला राजा यहोयाकीम राजाकडे परत आणले, त्याने त्याला तलवारीने ठार मारले आणि ज्या ठिकाणी सामान्य लोक पुरले होते तिथे त्याचा मृतदेह फेकून दिला.)
24परंतु शाफानचा पुत्र हा अहीकाम यिर्मयाहच्या बाजूने उभा राहिला व त्याला मारण्यासाठी त्याला जमावाच्या हवाली करण्यात आले नाही.
सध्या निवडलेले:
यिर्मयाह 26: MRCV
ठळक
सामायिक करा
कॉपी करा
तुमचे हायलाइट तुमच्या सर्व डिव्हाइसेसवर सेव्ह करायचे आहेत? साइन अप किंवा साइन इन
पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती™
ग्रंथाची मालकी © 1978, 1982, 2008, 2021, 2022, 2024 Biblica, Inc.
यांची परवानगी घेऊन केले गेले आहे.
सर्व अधिकार जगभरात राखीव.
Holy Bible, Marathi Contemporary Version™
Copyright © 1978, 1982, 2008, 2021, 2022, 2024 by Biblica, Inc.
Used with permission.
All rights reserved worldwide.