YouVersion लोगो
सर्च आयकॉन

यिर्मयाह 27

27
यहूदाचे लोक नबुखद्नेस्सरची सेवा करणार
1यहूदीयाचा राजा, योशीयाहचा पुत्र, यहोयाकीम याच्या कारकिर्दीच्या आरंभी हा संदेश याहवेहकडून यिर्मयाहला मिळाला: 2याहवेहनी मला असे म्हटले आहे: “चामड्याच्या वाद्यांचा व गुणाकार चिन्हाच्या सळयांचा एक जू तयार कर आणि तो तुझ्या मानेवर ठेव. 3मग एदोम, मोआब, अम्मोन, सोर व सीदोन यांच्या राजांना, यरुशलेममध्ये यहूदीयाचा राजा सिद्कीयाहकडे आलेल्या दूतांसह हा संदेश पाठव, 4त्यांच्या अधिकार्‍यांसाठी एक संदेश दे आणि सांग, ‘इस्राएलचे परमेश्वर, सर्वसमर्थ याहवेह, असे म्हणतात: “तुमच्या धन्यांना सांगा की: 5माझ्या महान शक्तीने व उगारलेल्या भुजेने मी पृथ्वी, सर्व मानवजात, व प्राणिमात्रेस निर्माण केले आणि या सर्वगोष्टी मी माझ्या इच्छेस येईल त्याला देतो. 6यास्तव आता तुमचे सर्व देश, मी माझा सेवक बाबेलचा राजा नबुखद्नेस्सर याच्या हवाली केले आहेत. मी सर्व वनपशूदेखील त्याच्या अधीन होतील असे केले आहे. 7सर्व राष्ट्रे, त्या देशाची वेळ येईपर्यंत, त्याच्या पुत्राची व त्याच्या नातवाची सेवा करतील, आणि नंतर अनेक राष्ट्रे व मोठमोठे राजे बाबिलोन जिंकून घेतील आणि त्याला आपला गुलाम करतील.
8“ ‘ “जर, कोणतेही राष्ट्र किंवा राज्य बाबेलचा राजा नबुखद्नेस्सरची सेवा करणार नाही किंवा त्याचा जू आपल्या मानेवर ठेवणार नाही, मी त्या राष्ट्राला तलवार, दुष्काळ आणि मरीने शिक्षा करेन, असे याहवेह घोषित करतात, जोपर्यंत मी त्याच्या हाताने त्यांचा नाश करत नाही. 9तुमचे संदेष्टे, दैवप्रश्न करणारे, स्वप्नांचा अर्थ सांगणारे, मांत्रिक व जादूटोणा करणारे म्हणतील, ‘तुम्ही बाबेलच्या राजाची सेवा करणार नाही,’ पण त्यांचे ऐकू नका. 10कारण ते तुम्हाला खोटे संदेश देत आहेत. त्यांचे ऐकून तुम्ही केवळ तुमच्या देशातून दूर जाल; मी तुम्हाला तुमच्या देशातून हाकलून देईन आणि तुमचा नाश होईल. 11परंतु बाबेलच्या राजाच्या गुलामीला शरण जाणार्‍या कोणत्याही राष्ट्राच्या लोकांना त्यांच्याच देशात राहण्याची मुभा असेल आणि त्यांना नेहमीप्रमाणे आपल्या शेतीची मशागत करता येईल, याहवेह असे म्हणतात.” ’ ”
12हा संदेश मी यहूदीयाचा राजा सिद्कीयाह यास सांगितला. मी म्हणालो, “बाबेलच्या राजाचे जू आपल्या मानेवर ठेव; त्याची व त्याच्या लोकांची सेवा कर, म्हणजे तुम्ही जगाल. 13जे राष्ट्र बाबेलच्या राजाला अधीन होणार नाही, त्यांना याहवेहने देऊ केलेल्या युद्ध, दुष्काळ व मरी यांनी तू आणि तुझे लोक का मरावे? 14‘तुम्ही बाबेलच्या राजाची सेवा करणार नाही,’ असे सांगणार्‍या संदेष्ट्यांचे ऐकू नका, कारण ते तुम्हाला खोटे संदेश देत आहेत. 15याहवेह म्हणतात, ‘मी त्यांना पाठविलेले नाही, ते माझ्या नावाने खोटी भविष्यवाणी करतात. म्हणून मी तुमचा आणि या खोट्या संदेष्ट्यांचा नाश करण्यासाठी या देशातून तुम्हाला हाकलून देईन.’ ”
16मी याजकांशी व सर्व लोकांशी बोललो आणि त्यांना सांगितले, “याहवेह म्हणतात: ‘मंदिरातून नेलेली सुवर्णपात्रे लवकरच बाबेलमधून परत आणली जातील,’ असे सांगणार्‍या तुमच्या संदेष्ट्यांचे मुळीच ऐकू नका. ते तुम्हाला खोटे भविष्य सांगत आहेत. 17त्यांचे ऐकू नका. बाबेलच्या राजाच्या अधीन व्हा, तर तुम्ही जिवंत राहाल. हे नगर उद्ध्वस्त का व्हावे? 18जर ते संदेष्टे असतील व त्यांच्याकडे याहवेहचे वचन असेल तर, याहवेहच्या मंदिरातील सुवर्णपात्रे मंदिरात व यहूदीयाच्या राजाच्या महालात आणि यरुशलेममधील महालांमध्येच राहवी, ती बाबेलला नेली जाऊ नयेत, अशी त्यांनी सर्वसमर्थ याहवेहस विनंती करावी. 19कारण स्तंभ, कास्याचे गंगाळ, धातूच्या बैठकी व या नगरात उरलेल्या इतर वस्तूंच्या बाबतीत सर्वसमर्थ याहवेह म्हणतात, 20बाबेलचा राजा नबुखद्नेस्सर याने यहूदीयाचा राजा, यहोयाकीमचा पुत्र यकोन्याह, याच्यासह यहूदीया व यरुशलेम येथील सर्व महत्त्वाच्या व्यक्तींना बाबिलोन येथे कैद करून नेले, 21मंदिरातील उरलेली पात्रे व यहूदीया आणि यरुशलेमच्या राजांच्या महालातील उरलेल्या मौल्यवान वस्तू याविषयी सर्वसमर्थ याहवेह इस्राएलाचे परमेश्वर असे म्हणतात: 22‘होय, त्या आता बाबेलला नेण्यात येतील आणि मी त्यांची भेट घेईपर्यंत त्या तिथेच राहतील,’ याहवेह घोषित करतात. ‘नंतर पुढे मी हे सर्व यरुशलेमला परत आणेन व पुनर्स्थापित करेन.’ ”

सध्या निवडलेले:

यिर्मयाह 27: MRCV

ठळक

सामायिक करा

कॉपी करा

None

तुमचे हायलाइट तुमच्या सर्व डिव्हाइसेसवर सेव्ह करायचे आहेत? साइन अप किंवा साइन इन