28
खोटा संदेष्टा हनन्याह
1त्याच वर्षी, म्हणजे यहूदीयाचा राजा सिद्कीयाह याच्या कारकिर्दीच्या प्रारंभी म्हणजे चौथ्या वर्षातील पाचव्या महिन्यात, गिबोन येथील अज्जूरचा पुत्र हनन्याह नावाचा जो संदेष्टा होता, तो याजक व सर्व लोकांच्या समक्ष मला उद्देशून याहवेहच्या भवनात जाहीरपणे म्हणाला: 2“सर्वसमर्थ याहवेह, इस्राएलचे परमेश्वर जाहीर करतात: ‘तुमच्या मानेवरील बाबेलच्या राजाचे जू मी काढून टाकेन. 3बाबेलचा राजा नबुखद्नेस्सरने लुटून नेलेली याहवेहच्या मंदिरातील सर्व पात्रे मी दोन वर्षात परत आणेन. 4आणि यहोयाकीमचा पुत्र, यहूदीयाचा राजा यकोन्याह व खास्द्यांच्या देशात बंदिवासात पाठविलेले सर्व बंदी यांनाही मी परत आणेन. बाबेलच्या राजाचे जोखड मी तोडून टाकेन,’ असे याहवेह जाहीर करतात.”
5यावर याहवेहच्या मंदिरात उभे असलेले सर्व लोक आणि याजकांच्या समक्ष यिर्मयाह संदेष्टा हनन्याहला म्हणाला, 6यिर्मयाह संदेष्टा म्हणाला, “आमेन! तुझे संदेश याहवेह खरे करोत! तू दिलेल्या संदेशाच्या वचनानुसार याहवेहच्या मंदिरातील पात्र व सर्व बंदिवान बाबेलमधून परत येवोत. 7परंतु तरी देखील, आता या सर्व लोकांसमक्ष व तुझ्यासमक्ष मी जे सांगतो ते तू ऐक: 8तुझ्या आणि माझ्या आधी जे संदेष्टे होऊन गेले, ज्यांनी युद्ध, विनाश व मरी याविषयी अनेक राष्ट्रांना व शक्तिशाली राज्यांना संदेश दिला. 9परंतु जो संदेष्टा शांतीचा संदेश देत असे व त्याचे भविष्य खरे ठरताच, तो खरोखर याहवेहने पाठविला आहे, असे समजले जात असे.”
10यावर संदेष्टा हनन्याह याने यिर्मयाहच्या मानेवरील जू घेतले व ते मोडले; 11आणि तिथे जमलेल्या समुदायाला उद्देशून हनन्याह म्हणाला, “याहवेह असे म्हणतात: याचप्रकारे बाबेलचा राजा नबुखद्नेस्सर याने सर्व राष्ट्रांच्या मानेवर ठेवलेले जोखड मी दोन वर्षात तोडून टाकेन.” हे ऐकताच यिर्मयाह संदेष्टा तिथून चालता झाला.
12संदेष्टा हनन्याहने यिर्मयाहच्या मानेवरील जू मोडल्यानंतर याहवेहचे वचन यिर्मयाहला आले: 13“जा आणि हनन्याहला सांग, ‘याहवेह असे म्हणतात, तू लाकडी जोखड मोडलेस, पण त्याऐवजी तुझ्या मानेवर लोखंडाची जोखड येईल. 14सर्वसमर्थ याहवेह, इस्राएलचे परमेश्वर असे म्हणतात: या सर्व राष्ट्रांच्या मानेवर मी लोखंडी जोखड ठेवले आहे, त्यांना मी बाबेलचा राजा नबुखद्नेस्सरची गुलामगिरी करण्यास लावेन, व ते करतील. मी वनपशूही त्याच्या ताब्यात देईन.’ ”
15मग यिर्मयाह संदेष्टा हनन्याहला म्हणाला, “हनन्याह, ऐक! याहवेहने तुला पाठविलेले नाही, परंतु तू तुझ्या खोट्या संदेशावर विश्वास ठेवण्यास या राष्ट्रास विवश केले. 16म्हणून याहवेह असे म्हणतात: ‘मी तुला पृथ्वीतलावरून काढून टाकणार आहे. याच वर्षी तुला मरण येईल, कारण तू याहवेहशी बंडखोरी करण्याचा संदेश दिला आहेस.’ ”
17यानंतर त्याच वर्षी, सातव्या महिन्यात संदेष्टा हनन्याह मरण पावला.