1
प्रस्तावना
1ऊस नावाच्या देशात इय्योब नावाचा एक मनुष्य राहत होता. तो निर्दोष आणि सरळ; परमेश्वराचे भय धरणारा व पापापासून दूर राहणारा असा होता. 2त्याला सात पुत्र व तीन कन्या होत्या, 3त्याच्याजवळ सात हजार मेंढ्या, तीन हजार उंट, पाचशे बैलजोड्या, पाचशे गाढवे आणि पुष्कळ नोकरचाकरही होते. तो पूर्वेकडील सर्व लोकात अत्यंत महान पुरुष होता.
4त्याचे पुत्र त्यांच्या वाढदिवसाच्या दिवशी त्यांच्या घरी मेजवानी देत असत, त्यावेळी ते आपल्या तीनही बहिणींना मेजवानीचे आमंत्रण देत असत. 5या भोजनसमारंभाचा कालावधी आटोपल्यावर इय्योब त्यांच्या शुद्धीकरणाची व्यवस्था करी. तो पहाटेस उठून त्या सर्वांकरिता होमार्पणाचा यज्ञ करी; कारण तो विचार करीत असे, “न जाणो माझ्या लेकरांनी पाप केले असेल आणि आपल्या अंतःकरणात परमेश्वराला शाप दिला असेल.” असा इय्योबाचा नित्यक्रम असे.
6एके दिवशी देवदूत#1:6 देवदूत मूळ भाषेत परमेश्वराचे पुत्र याहवेहसमोर स्वतःला सादर करण्यासाठी आलेले असताना, सैतानही#1:6 मूळ भाषेत शत्रू त्यांच्याबरोबर आला. 7याहवेहने सैतानाला विचारले, “तू कुठून आला आहेस?”
सैतानाने उत्तर दिले, “पृथ्वीवर इकडून तिकडून सर्वत्र भटकून आलो आहे.”
8तेव्हा याहवेहने सैतानाला विचारले, “माझा सेवक इय्योब याच्याकडे तू लक्ष दिलेस का? तो निर्दोष आणि सरळ, परमेश्वराला भिऊन वागणारा व वाईटापासून दूर राहणारा आहे; अखिल पृथ्वीवर त्याच्यासारखा तुला कोणीही आढळणार नाही.”
9सैतानाने याहवेहला उत्तर दिले, “इय्योब परमेश्वराचे भय विनाकारण बाळगतो काय? 10आपण त्याचे घरदार व जे सर्वकाही त्याचे आहे त्याभोवती कुंपण घातलेले नाही का? तुम्ही त्याच्या हाताचे श्रम आशीर्वादित केले आहेत व देशात त्याचे कळप आणि गुरे वृद्धी पावत आहेत. 11परंतु आता आपला हात पुढे करून जे सर्वकाही त्याचे आहे ते हिरावून घ्या आणि मग पाहा, आपल्या तोंडावर तो आपल्याला खचितच शाप देईल.”
12याहवेहने सैतानाला म्हटले, “ठीक आहे, मग सर्वकाही जे त्याचे आहे त्यावर तुला अधिकार दिला आहे, मात्र त्या मनुष्याला तू हात लावू नये.”
तेव्हा सैतान याहवेहच्या समक्षतेतून निघून गेला.
13एके दिवशी इय्योबाचे पुत्र व कन्या आपल्या वडील भावाच्या घरी भोजन करीत व द्राक्षारस पीत असता, 14एक निरोप्या इय्योबाकडे आला आणि म्हणाला, “बैल नांगरीत होते व गाढवे जवळपास चरत होती, 15एवढ्यात शबाई लोकांनी आक्रमण करून त्यांना लुटून नेले आणि सर्व चाकरांना तलवारीने वधले. तुम्हाला सांगण्यासाठी मीच एकटा सुटून आलो आहे!”
16तो बोलतच असताना, दुसरा एक निरोप्या आला व म्हणाला, “परमेश्वराचा अग्नी आकाशातून आला, त्याने मेंढरे आणि चाकरे भस्म केले, तुम्हाला सांगण्यासाठी मीच एकटा सुटून आलो आहे!”
17तो बोलतच आहे इतक्यात, आणखी एक निरोप्या आला आणि म्हणाला, “खास्द्यांनी तीन टोळ्या केल्या व उंटांवर आक्रमण करून त्यांना घेऊन गेले; त्यांनी चाकरांना तलवारीने वधले, हे तुम्हाला सांगायला मीच एकटा सुटून आलो आहे!”
18तो बोलतच असताना, आणखी एक निरोप्या आला व म्हणाला, “तुमचे पुत्र आणि कन्या त्यांच्या वडील भावाच्या घरी मेजवानी करीत आणि द्राक्षारस पीत असता, 19वाळवंटातून अचानक प्रचंड वारा आला आणि त्या घराचे चारही कोपरे हादरले. त्यामुळे ते घर त्यांच्यावर कोसळले आणि ते मरण पावले; हे तुम्हाला सांगायला मीच एकटा सुटून आलो आहे!”
20हे ऐकताच इय्योब उठला आणि त्याने आपला झगा फाडला आणि डोक्यावरून वस्तरा फिरविला. नंतर जमिनीवर पडून त्याने उपासना केली 21आणि म्हणाला:
“आईच्या उदरातून मी नग्न आलो,
आणि नग्नच मी परत जाईन,
याहवेहने दिले आणि याहवेहने परत घेतले;
त्या याहवेहचे नाव धन्यवादित असो.”
22या सर्व बाबतीत, इय्योबाने पाप केले नाही किंवा परमेश्वराने अयोग्य केले असा दोष त्यांच्यावर लावला नाही.