YouVersion लोगो
सर्च आयकॉन

इय्योब 10

10
1“मला माझ्या जिवाचा तिरस्कार आला आहे;
म्हणून मनमोकळे करून मी
माझ्या जिवाच्या कडूपणाने बोलेन.
2मी परमेश्वराला म्हणेन: मला दोषी ठरवू नका,
पण माझ्याविरुद्ध काय आरोप आहेत ते मला सांगा.
3माझा छळ करण्यात तुम्हाला आनंद वाटतो का,
दुष्टांच्या योजना पाहून तुम्ही हास्य पावता,
आणि मी तुमची हस्तकृती आहे, त्या मला तुम्ही झिडकारून देता?
4तुम्हाला मानवी डोळे आहेत का?
मनुष्याप्रमाणे तुम्ही पाहू शकता का?
5तुमचा जीवनक्रम मनुष्यासमान आहे का,
किंवा त्या बलवान मनुष्यासारखे तुमचे आयुष्य आहे,
6म्हणून तुम्ही माझे दोष शोधावेत
आणि माझी पापे बारकाईने तपासून पाहावी;
7मी दोषी नाही हे जरी तुम्हाला माहीत आहे
आणि मला तुमच्या हातून सोडविणारा कोणी नाही?
8“तुमच्या हातांनी मला घडवून निर्माण केले आहे.
आणि तुम्हीच फिरून मला नष्ट करणार आहात काय?
9तुम्ही मला मातीच्या कलशाप्रमाणे घडविले याचे स्मरण करा,
पुन्हा तुम्हीच मला धुळीत मिळविणार काय?
10दुधाप्रमाणे तुम्ही मला ओतले नाही का
तरी दह्यासारखे तुम्हीच विरजवले आहे,
11तुम्ही मला त्वचा व मांस दिले,
आणि हाडे व स्नायू यांनी मला जोडले नाही का?
12तुम्ही मला जीवन देऊन दया दाखविली,
आणि तुमच्या निगेत माझा आत्मा सुरक्षित राहिला.
13“परंतु हे तुम्ही तुमच्या हृदयात गुप्त ठेवले,
आणि मला माहीत आहे की हे तुमच्या मनामध्ये होते:
14मी जर पातक केले, तर तुमची नजर माझ्यावर आहे
आणि माझ्या पापांबद्दल शिक्षा दिल्यावाचून राहणार नाही.
15जर मी दोषी असेन; तर माझा धिक्कार असो!
मी निष्पाप असलो, तरीसुद्धा मी माझे डोके उंच करू शकत नाही,
कारण मी लज्जेने व्याप्त झालो आहे
आणि माझ्या दुःखात बुडून गेलो आहे.
16मी माझे मस्तक उंच करू लागलो, की तुम्ही सिंहासारखी मजवर झडप घालणार
आणि पुन्हा तुमच्या अद्भुत शक्तीचे माझ्याविरुद्ध प्रदर्शन करणार.
17तुम्ही माझ्याविरुद्ध नवीन साक्षीदार आणता,
आणि आपला क्रोध माझ्याविरुद्ध वाढविता;
तुमचे सामर्थ्य माझ्याविरुद्ध लाटांप्रमाणे एका पाठोपाठ येतात.
18“मग तुम्ही मला गर्भाशयातून बाहेर का आणले?
कोणीही मला पाहण्यापूर्वी मला मरण आले असते तर बरे झाले असते.
19मी जर कधी अस्‍तित्‍वातच आलो नसतो,
किंवा गर्भाशयातून सरळ कबरेत गेलो असतो तर किती बरे असते!
20माझ्या थोड्या दिवसांची समाप्ती अजून झाली नाही का?
मला आनंदाचे क्षण उपभोगायला मिळावे म्हणून माझ्यापासून दूर जा;
21म्हणजे जिथून परत येणे होत नाही,
जे अंधार आणि मृत्यूचे स्थान, अशा ठिकाणी जाण्यापूर्वी,
22जे मध्यरात्रीच्या काळोखासारखे आहे,
तिथे गाढ अंधकार व अव्यवस्था आहे,
आणि तेथील प्रकाश सुद्धा अंधकारासारखा असतो.”

सध्या निवडलेले:

इय्योब 10: MRCV

ठळक

सामायिक करा

कॉपी करा

None

तुमचे हायलाइट तुमच्या सर्व डिव्हाइसेसवर सेव्ह करायचे आहेत? साइन अप किंवा साइन इन