इय्योब 12
12
इय्योबाचा प्रतिसाद
1मग इय्योबाने उत्तर दिले,
2“खचितच तुम्हीच ते विशिष्ट लोक आहात,
आणि ज्ञान तुमच्याबरोबरच नाहीसे होईल!
3परंतु मलाही तुमच्यासारखी बुद्धी आहे;
मी तुमच्यापेक्षा कमी दर्जाचा नाही.
या सर्वगोष्टी कोणाला ठाऊक नाहीत?
4“मी माझ्या मित्रांच्या चेष्टेचा विषय बनलो आहे,
मी परमेश्वराचा धावा केला आणि त्यांनी मला उत्तर दिले—
नीतिमान आणि निर्दोष असूनही मी केवळ चेष्टेचा विषय झालो आहे!
5सुखी मनुष्याला विपत्तीचा तिरस्कार वाटतो;
मात्र ज्यांचे पाय घसरतात त्यांच्यावर ती वार करते.
6हिंसकांचे डेरे सुरक्षित असतात,
आणि जे परमेश्वराला चेतावणी देतात ते निर्भय राहतात—
ते आपल्या हातच्या सामर्थ्याला आपला देव समजतात.#12:6 किंवा ज्यांची दैवते त्यांच्याच हाती आहेत
7“परंतु प्राण्यांना विचार, ते तुला शिकवतील,
किंवा आकाशातील पाखरे तुला सांगतील;
8अथवा पृथ्वीशी बोलावे आणि ती तुला शिकवेल;
किंवा सागरातील माशांनी तुला माहिती देऊ दे.
9या सर्वापैकी कोणासही ठाऊक नाही का की
याहवेहच्या हाताने हे केले आहे?
10कारण प्रत्येक प्राण्याचा जीव,
आणि सर्व मानवजातीचा श्वास त्यांच्याच हातात आहे.
11जशी अन्नाची चव जिभेला समजते,
तशीच शब्दांची पारख कान करीत नाहीत का?
12वयस्कांमध्ये ज्ञान आढळून येते की नाही?
दीर्घ आयुष्याने समज येते की नाही?
13“ज्ञान आणि सामर्थ्य हे परमेश्वराचे आहेत;
सल्ला आणि समज त्यांचेच आहे.
14ते जे पाडतात, ते पुन्हा बांधता येत नाही;
ते ज्याला बंदिवासात पकडतात, त्याला सुटका नाही.
15परमेश्वराने जर पाऊस रोखून धरला, तर दुष्काळ पडतो;
आणि त्याला मोकळे सोडले, तर पृथ्वी उद्ध्वस्त होते.
16पराक्रम आणि शहाणपण ही त्यांची आहेत;
फसणारे आणि फसविणारे दोन्हीही त्यांचेच आहेत.
17ते मंत्र्यांना विवस्त्र करतात
आणि न्यायाधीशांना मूर्ख ठरवितात.
18राजांनी टाकलेली बेडी ते तोडून टाकतात
आणि त्यांच्या कंबरेस लंगोट बांधतात.
19ते याजकांना अनवाणी चालावयास लावतात
स्थिर झालेल्या अधिकार्यांना ते उलथून टाकतात.
20विश्वासू सल्लागारांची तोंडे ते बंद करतात
आणि वडीलजनांचा विवेक काढून घेतात.
21ते सरदारांवर तिरस्कार ओततात,
आणि सबळांना दुर्बल करतात.
22ते अंधारातील गुप्त गोष्टी प्रकट करतात
आणि घोर अंधकाराला प्रकाशाने उजळून टाकतात.
23ते राष्ट्रांना महान करतात आणि त्याचा नाशही करतात;
ते राष्ट्रे विस्तृत करतात आणि त्यांचा नायनाट करतात.
24ते पृथ्वीवरील अधिकार्यांची बुद्धी काढून घेतात;
आणि त्यांना दिशाहीन असे भटकण्यास लावतात.
25ते अंधारात प्रकाशाविना चाचपडतात;
त्यांना मद्यपीसारखे लटपटण्यास लावतात.
सध्या निवडलेले:
इय्योब 12: MRCV
ठळक
सामायिक करा
कॉपी करा
तुमचे हायलाइट तुमच्या सर्व डिव्हाइसेसवर सेव्ह करायचे आहेत? साइन अप किंवा साइन इन
पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती™
ग्रंथाची मालकी © 1978, 1982, 2008, 2021, 2022, 2024 Biblica, Inc.
यांची परवानगी घेऊन केले गेले आहे.
सर्व अधिकार जगभरात राखीव.
Holy Bible, Marathi Contemporary Version™
Copyright © 1978, 1982, 2008, 2021, 2022, 2024 by Biblica, Inc.
Used with permission.
All rights reserved worldwide.