इय्योब 14
14
1“स्त्रीपासून जन्मलेल्या मानवाचे जीवन,
अल्पकालीन व त्रासाने भरलेले आहे.
2अशा फुलासारखे, जे फुलते आणि सुकून जाते;
क्षणभंगुर सावलीप्रमाणे ते जास्त काळ टिकत नाही.
3अशा मानवांवर तुम्ही आपली नजर लावता का?
त्यांचा न्याय करण्यासाठी त्यांना आपल्या उपस्थितीत आणणार का?
4अशुद्धतेतून जे शुद्ध ते कोण उत्पन्न करेल?
कोणीही नाही!
5मानवाचे दिवस ठरलेले आहेत;
त्याच्या महिन्यांची संख्या तुमच्या स्वाधीन आहे
आणि त्याची नेमलेली मर्यादा त्याला ओलांडता येत नाही.
6रोजगाराच्या मजुराप्रमाणे त्याची वेळ पूर्ण होईपर्यंत,
आपली दृष्टी त्याच्यावरून काढून त्याला एकटे असू द्या.
7“झाडाला देखील आशा असते:
की त्याला कापून टाकले तरी ते पुन्हा फुटणार,
आणि त्याच्या नवीन फांद्या कोमेजणार नाहीत.
8मातीत त्याची मुळे जुनी झाली असली,
आणि त्याचा बुंधा मातीत मृत झाला असला,
9तरी पाण्याच्या सुगंधाने ते फुलते
आणि रोपट्याप्रमाणे, त्याला पुन्हा कोंब फुटतात.
10परंतु मनुष्य मरण पावतो व त्याला पुरले जाते;
तो आपला शेवटचा श्वास घेतो आणि नाहीसा होतो.
11जसे सरोवराचे पाणी आटते
किंवा नदीचे पात्र आटून कोरडे होते,
12तसा मनुष्य पडल्यावर पुन्हा उठत नाही;
आकाश नाहीसे होईपर्यंत लोक पुन्हा उठणार नाहीत,
ते झोपेतून जागे केले जाणार नाहीत.
13“तुम्ही केवळ मला कबरेमध्ये लपविले असते
तुमचा क्रोध संपेपर्यंत मला गुप्त ठेवले असते!
आपण माझ्यासाठी समय नेमून ठेवावा
आणि मग माझी आठवण करावी!
14जर कोणी मेला तर पुन्हा जिवंत होईल का?
माझ्या सर्व कठीण श्रमाच्या दिवसात
माझ्या सुटकेची मी वाट पाहीन.
15मग तुम्ही मला आवाज द्याल आणि मी तुम्हाला उत्तर देईन;
आपली हस्तकृती पुन्हा पाहावी असे तुम्हाला वाटेल.
16तेव्हा खचित आपण माझ्या पापांची नाही,
तर माझ्या पावलांची मोजणी कराल.
17तुम्ही माझे अपराध एका थैलीत बंद करून;
माझ्या पापांवर पांघरूण घालाल.
18“परंतु जसे पर्वत झिजतात व त्यांचा चुरा होतो,
आणि जसे खडक आपल्या ठिकाणातून ढळविले जातात,
19जल पाषाण झिजवून टाकते
व पूर माती वाहून नेतो,
त्याचप्रमाणे तुम्ही मानवाची आशा नष्ट करता.
20तुम्ही एकदाच मानवावर प्रबळ होता आणि तो नाहीसा होतो;
तुम्ही त्याचा चेहरा बदलता आणि त्याला दूर पाठवून देता.
21जरी त्याच्या संतानाचा सन्मान झाला, तरी त्याला ते माहीत नसते;
किंवा त्यांना नीच करण्यात आले, तरी ते त्याला दिसत नाही.
22त्यांना फक्त त्यांच्या शरीरातील दुःख जाणवते
आणि स्वतःसाठीच ते शोक करतात.”
सध्या निवडलेले:
इय्योब 14: MRCV
ठळक
सामायिक करा
कॉपी करा
तुमचे हायलाइट तुमच्या सर्व डिव्हाइसेसवर सेव्ह करायचे आहेत? साइन अप किंवा साइन इन
पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती™
ग्रंथाची मालकी © 1978, 1982, 2008, 2021, 2022, 2024 Biblica, Inc.
यांची परवानगी घेऊन केले गेले आहे.
सर्व अधिकार जगभरात राखीव.
Holy Bible, Marathi Contemporary Version™
Copyright © 1978, 1982, 2008, 2021, 2022, 2024 by Biblica, Inc.
Used with permission.
All rights reserved worldwide.