इय्योब 21
21
इय्योब
1मग इय्योबाने उत्तर देऊन म्हटले:
2“माझे बोलणे लक्षपूर्वक ऐका;
आणि हेच तुमच्याकडून माझ्यासाठी सांत्वन असे असू द्या.
3मी बोलत असताना धीर धरा,
त्यानंतर खुशाल माझी थट्टा करा.
4“माझी तक्रार मनुष्याविरुद्ध आहे काय?
मी अधीर का असू नये?
5माझ्याकडे पाहा आणि भयचकित व्हा;
आपल्या मुखावर आपला हात ठेवा.
6याविषयी मी विचार करतो, त्यावेळी मी भयभीत होतो;
भीतीने माझे शरीर थरथर कापते.
7दुर्जनांना दीर्घायुष्य का मिळते,
वयाने परिपक्व होऊन ते सशक्त का होतात?
8त्यांची मुले त्यांच्याभोवती स्थिर झालेली त्यांना दिसतात,
आणि त्यांचे वंशज त्यांच्या दृष्टीपुढे असतात.
9त्यांची घरे भयविरहीत व सुरक्षित असतात;
परमेश्वराचा दंड त्यांच्यावर नसतो.
10त्यांचा बैल निष्फळ असत नाही;
त्यांच्या गाई वासरांना जन्म देतात आणि त्यांचा गर्भपात होत नाही.
11ते आपली मुले कळपासारखी बाहेर पाठवितात;
आणि त्यांची लेकरे नाचत बागडतात.
12डफ आणि वीणा यांच्या तालावर ते गीते गातात;
आणि बासरीच्या स्वरावर हर्षनाद करतात.
13ते आपला जीवनक्रम समृद्धीत घालवितात
आणि शांतीने#21:13 किंवा अचानक खाली कबरेत जातात.
14तरी ते परमेश्वराला म्हणतात, ‘आमच्यापासून दूर जा!
तुमचे मार्ग जाणून घेण्याची आमची इच्छा नाही.
15हा सर्वसमर्थ कोण आहे, की आम्ही त्यांची सेवा करावी?
त्यांच्याकडे विनंती करून आम्हाला काय मिळणार?’
16परंतु त्यांची समृद्धी त्यांच्या स्वतःच्या हातात नाही,
म्हणून मी दुष्टांच्या योजनांपासून दूर थांबतो.
17“तरी दुष्टांचा दिवा कितीदा विझला जातो?
आणि कितीदा त्यांच्यावर विपत्ती येते,
परमेश्वर त्यांच्यावर आपला क्रोध कितीदा आणतात?
18ते कितीदा वार्यापुढे वाळलेल्या पेंढ्यांप्रमाणे असतात,
व वादळापुढे उडविलेल्या भुशासारखे उडून जातात?
19असे म्हटले जाते, ‘परमेश्वर दुर्जनांची शिक्षा त्याच्या संततीसाठी राखून ठेवतात.’
दुर्जनालाच स्वतःच्या पापाची परतफेड करू द्यावी,
म्हणजे त्याला त्याचा अनुभव येईल!
20आपला नाश होत आहे हे त्याने स्वतःच्या डोळ्यांनी पाहावे;
सर्वसमर्थाच्या क्रोधाचा प्याला त्याने प्यावा.
21जेव्हा त्याला नेमून दिलेला काळ समाप्त होतो
तेव्हा आपण आपल्यामागे सोडून दिलेल्या कुटुंबाविषयी त्याला काय चिंता?
22“परमेश्वराला कोण ज्ञान शिकवू शकेल,
कारण सर्वोच्च व्यक्तीचा न्याय सुद्धा तेच करतात?
23एखादा मनुष्य पूर्ण जोमात असताना मरण पावतो,
जो सुरक्षित आणि सुखी असतो,
24जो शरीराने सुदृढ,
आणि हाडांनी धष्टपुष्ट आहे.
25आणि दुसरा एखादा जिवाच्या कडूपणात मरतो,
ज्याने जीवनात कोणत्याही चांगल्या गोष्टींचा उपभोग घेतला नसतो.
26तरी ते दोघेही मेल्यानंतर मातीत एकमेका शेजारी पुरले जातात,
आणि दोघेही किड्यांनी झाकले जातात.
27“आता तुम्ही काय विचार करतात हे मला चांगले माहिती आहे,
माझे वाईट होईल अशा योजना तुम्ही करता.
28तुम्ही विचारता, ‘त्या महान व्यक्तीचे घर कुठे आहे,
ज्यात दुष्टाचा डेरा होता?’
29जे प्रवास करतात त्यांना तुम्ही कधीही प्रश्न विचारला नाही काय?
आणि त्यांच्या अनुभवांकडे लक्ष दिले नाही काय—
30अरिष्टाच्या दिवशी बहुधा दुष्टाचा बचाव होतो,
आणि क्रोधाच्या दिवशी ते सोडविले जातात?
31उघडपणे त्यांना कोण दोष लावणार?
त्यांनी जे केले आहे, त्याचे प्रतिफळ त्यांना कोण देणार?
32त्यांना कबरेकडे वाहून नेले जाते,
आणि त्यांच्या धोंड्यावर पहारा ठेवतात.
33दरीतील माती त्याला गोड लागते;
असंख्य त्यांच्यापुढे गेले आहेत,
आणि सर्व लोक त्यांचे अनुसरण करतात.
34“तर तुमच्या निरर्थक शब्दांनी तुम्ही माझे सांत्वन कसे कराल?
कारण तुमची प्रत्युत्तरे केवळ असत्य आहेत!”
सध्या निवडलेले:
इय्योब 21: MRCV
ठळक
सामायिक करा
कॉपी करा
तुमचे हायलाइट तुमच्या सर्व डिव्हाइसेसवर सेव्ह करायचे आहेत? साइन अप किंवा साइन इन
पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती™
ग्रंथाची मालकी © 1978, 1982, 2008, 2021, 2022, 2024 Biblica, Inc.
यांची परवानगी घेऊन केले गेले आहे.
सर्व अधिकार जगभरात राखीव.
Holy Bible, Marathi Contemporary Version™
Copyright © 1978, 1982, 2008, 2021, 2022, 2024 by Biblica, Inc.
Used with permission.
All rights reserved worldwide.