इय्योब 29
29
इय्योबाचे शेवटचे समर्थन
1इय्योब आपला वाद पुढे चालवून म्हणाला:
2“माझे गेलेले महिने, ज्यामध्ये परमेश्वराची नजर माझ्यावर होती,
त्या दिवसांची मला खूप आस आहे,
3जेव्हा त्यांचा प्रकाशदीप माझ्या मस्तकावर पडत असे
मग अंधारातही त्यांच्याच प्रकाशात मी चालत असे!
4माझ्या उत्कृष्ट दिवसात,
जेव्हा माझे घराणे परमेश्वराच्या जिव्हाळ्याच्या संगतीने आशीर्वादित होते,
5जेव्हा सर्वसमर्थाची साथ अजूनही माझ्याबरोबर होती
आणि माझी मुलेबाळे माझ्याभोवती होती,
6जेव्हा माझी वाट लोण्याने भिजली जात असे
आणि खडक माझ्यासाठी जैतुनाच्या तेलाचे झरे ओतून देत असे.
7“जेव्हा मी नगराच्या वेशीमध्ये जाई
आणि माझ्या मानाचे आसन ग्रहण करीत असे,
8तरुण मला पाहून बाजूला होत असत,
आणि वृद्ध आदराने उभे राहत;
9अधिपती बोलणे टाळत स्तब्ध उभे राहत
आणि आपल्या मुखांवर हात ठेवीत;
10सर्वश्रेष्ठ अधिकारीही त्यांची जीभ टाळूला चिकटवून
शांतपणे उभे राहत असत.
11ज्यांनी माझे बोलणे ऐकले ते सर्व माझ्याविषयी चांगले बोलत,
आणि ज्यांनी मला बघितले त्यांनी माझी प्रशंसा केली.
12कारण जे गरीब मदतीसाठी याचना करीत आणि ज्या अनाथांच्या मदतीला कोणी नसे,
त्यांची मी सुटका केली.
13मरत असलेला व्यक्ती मला आशीर्वाद देत असे;
आणि विधवांचे हृदय मी आनंदित केले.
14नीतिमत्वाला मी पांघरले होते;
न्याय हाच माझा झगा व मुकुट असे.
15मी अंधाचे नेत्र
आणि पांगळ्यांचे पाय असा होतो.
16मी गरजवंतांचा पिता होतो;
आणि अनोळखी लोकांच्या वतीने वाद करत असे.
17मी दुष्टांचे जबडे फाडून
त्यांच्या मुखातून पीडितांना बाहेर ओढून काढले.
18“मी विचार केला की, ‘मी माझ्या घरातच मरण पावेन,
मातीच्या कणांइतके माझ्या आयुष्याचे दिवस असतील.
19माझी मुळे खोल पाण्यापर्यंत पोहचतील,
आणि रात्रभर दहिवर माझ्या फांद्यांना भिजवतील.
20माझे वैभव कधीही नष्ट होणार नाही;
आणि माझे धनुष्य सदैव माझ्या हातात नवेच राहील.’
21“लोक माझे बोलणे उत्सुकतेने ऐकत,
माझ्या सल्ल्याची शांतीने वाट बघत.
22माझे बोलणे संपल्यावर;
माझे शब्द त्यांच्या कानावर पडल्यावर ते पुन्हा बोलत नसत.
23पावसाच्या वर्षावाची पाहावी, तशी ते माझी वाट पाहत
माझे शब्द ते वसंत ऋतुतील पावसासारखे प्राशन करीत.
24मी त्यांच्याकडे हसतमुखाने बघितल्यास ते विश्वास करीत नसत;
माझे मुखतेज त्यांना मोलाचे वाटे.
25त्यांचा पुढारी म्हणून मी त्यांच्याबरोबर बसून त्यांना मार्गदर्शन केले;
त्यांच्या सैन्याचा राजा म्हणून मी त्यांच्यात वास केला;
शोक करणार्यांचे सांत्वन करणारा असा मी होतो.
सध्या निवडलेले:
इय्योब 29: MRCV
ठळक
सामायिक करा
कॉपी करा
तुमचे हायलाइट तुमच्या सर्व डिव्हाइसेसवर सेव्ह करायचे आहेत? साइन अप किंवा साइन इन
पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती™
ग्रंथाची मालकी © 1978, 1982, 2008, 2021, 2022, 2024 Biblica, Inc.
यांची परवानगी घेऊन केले गेले आहे.
सर्व अधिकार जगभरात राखीव.
Holy Bible, Marathi Contemporary Version™
Copyright © 1978, 1982, 2008, 2021, 2022, 2024 by Biblica, Inc.
Used with permission.
All rights reserved worldwide.