इय्योब 32
32
एलीहूचे प्रत्युत्तर
1मग त्या तिघांनी इय्योबाला उत्तर देण्याचे थांबविले, कारण आपल्या दृष्टीने तो स्वतः नीतिमान होता. 2परंतु रामाच्या कुळातील, बारकाएल बूजीचा पुत्र एलीहू खूप रागावला, कारण इय्योब परमेश्वरापेक्षा स्वतःलाच न्यायी ठरवीत होता. 3तीन मित्रांवर देखील तो संतापला कारण त्यांनी कोणत्याही प्रकारे इय्योबाचे खंडन केले नाही आणि तरीसुद्धा त्यांनी परमेश्वराला दोषी ठरविले होते. 4एलीहू आता इय्योबाशी बोलायचा थांबला होता, कारण ते त्याच्याहून वयाने मोठे होते. 5परंतु जेव्हा एलीहूने पाहिले की आणखी बोलण्यास त्यांच्याजवळ काहीही उरले नाही, त्याचा राग भडकला.
6आणि बूजी बारकाएलचा पुत्र एलीहू बोलला:
“मी वयाने लहान आहे,
व आपण वयोवृद्ध आहात;
म्हणूनच मी घाबरलो,
आणि मला जे माहीत आहे ते सांगण्याचे धाडस केले नाही;
7मला वाटले की, ‘वयाने मोठे असलेल्यांनी बोलावे;
प्रौढ असलेल्यांनी ज्ञान शिकवावे.’
8परंतु व्यक्तीमध्ये असलेला तो आत्मा,
आणि सर्वसमर्थाचा श्वासच आहे की जो शहाणपण देतो.
9जे वयाने मोठे तेच ज्ञानी आहेत असे नसते,
जे योग्य ते केवळ वृद्धांनाच समजते असेही नाही.
10“म्हणून मी सांगतो ते लक्षपूर्वक ऐका;
मी सुद्धा मला जे माहीत आहे ते सांगतो.
11तुम्ही बोलत असता, मी प्रतीक्षा करीत बसलो,
जेव्हा तुम्हाला शब्द अपुरे पडत होते;
तेव्हा तुमचे ते तर्कवाद मी ऐकले,
12लक्षपूर्वक मी तुमचे ऐकले.
परंतु तुमच्यातील एकानेही इय्योबाला चुकीचे असे सिध्द केले नाही;
तुमच्यापैकी कोणीही त्याच्या वादास प्रत्युत्तर केले नाही.
13‘आम्हाला ज्ञान सापडले आहे’ असे म्हणू नका;
‘परमेश्वराने त्याचे खंडन करावे, मनुष्याने नव्हे.’
14परंतु इय्योबाने माझ्याविरुद्ध शब्द लढवले नाहीत,
आणि तुमच्या वादांच्या साहाय्याने मी त्याला उत्तर देणार नाही.
15“ते निराश झाले आहेत आणि त्यांच्याकडे बोलण्यासाठी आणखी काही उरले नाही;
ते शब्दरहित झाले आहेत.
16आता ते तिथे गप्प उभे आहेत,
ते शांत आहेत म्हणून ते बोलतील याची मी वाट का पाहावी?
17मी देखील माझे म्हणणे सादर करेन;
मला जे माहीत आहे ते मी सुध्दा सांगेन.
18कारण माझ्याकडे भरपूर शब्द आहेत,
आणि माझ्या आत माझा आत्मा मला बोलावयास भाग पाडत आहे;
19बाटलीमध्ये भरून ठेवलेल्या द्राक्षारसा समान,
नवीन बुधला जो फुटायला आला आहे, त्यासारखा मी झालो आहे.
20मला आराम मिळावा म्हणून मी बोलणारच;
उत्तर देण्यासाठी मी माझे मुख उघडलेच पाहिजे.
21मी पक्षपात करणार नाही,
ना मी कोणा मनुष्याची उगीच प्रशंसा करणार;
22कारण मी जर कोणाची फाजील स्तुती करण्यात तरबेज असलो,
तर माझा निर्माणकर्ता मला लवकरच घेऊन जाईल.
सध्या निवडलेले:
इय्योब 32: MRCV
ठळक
सामायिक करा
कॉपी करा
तुमचे हायलाइट तुमच्या सर्व डिव्हाइसेसवर सेव्ह करायचे आहेत? साइन अप किंवा साइन इन
पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती™
ग्रंथाची मालकी © 1978, 1982, 2008, 2021, 2022, 2024 Biblica, Inc.
यांची परवानगी घेऊन केले गेले आहे.
सर्व अधिकार जगभरात राखीव.
Holy Bible, Marathi Contemporary Version™
Copyright © 1978, 1982, 2008, 2021, 2022, 2024 by Biblica, Inc.
Used with permission.
All rights reserved worldwide.